या नव नवल नयनोत्सवा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

Total Views |


drama_1  H x W:


ब्रिटिशांनी जसं प्रदर्शनरुपात आपल्या नाटक आणि संगीताच्या प्रेक्षक-श्रोत्यांचा इतिहासच लोकांसमोर मांडला, तसं आपल्याला करता येईल का? याचा विचार करताना असं आढळतं की, अशा प्रकारची संग्राहक वृत्ती आपल्याकडे अभावानेच आहे.


इ. स. १७१४ ते इ. स. १८३० हा साधारण १००-१२५ वर्षांचा कालखंड ब्रिटनमध्ये ‘जॉर्जियन कालखंड’ म्हणून ओळखला जातो. ब्रिटिश सिंहासनाच्या वारसाहक्काच्या असंख्य गुंतागुंतीच्या भानगडींमधून, जॉर्ज लुई हा इसम सन १७१४ साली ‘जॉर्ज पहिला’ या नावाने ब्रिटनचा राजा बनला. त्याच्या नंतर जॉर्ज दुसरा, जॉर्ज तिसरा, जॉर्ज चौथा असे थेट १८३० सालापर्यंत ‘जॉर्ज’ याच नावाने इसम राजे बनत गेले, असं का? इंग्रजी भाषेत नावांचा इतका दुष्काळ पडला होता की काय, या प्रश्नाकडे तूर्त न वळता, आपण जॉर्जियन कालखंडातली काही वैशिष्ट्यं पाहू. या कालखंडात एक राष्ट्र म्हणून ब्रिटन उत्तरोत्तर भरभराटातच गेलं. जगाच्या पाचही खंडांमध्ये त्याच्या वसाहती सतत वाढतच गेल्या. सन १७७६ साली अमेरिका स्वतंत्र होऊन त्याच्या साम्राज्यातून निसटली खरी, पण सन १८१८ साली संपूर्ण भारत त्याच्या घशात पडला. युरोपात नेपोलियन बोनापार्टसारखा जबरदस्त शत्रू खलास करून ब्रिटनने फ्रान्सचं आव्हानही संपवलं.


राजकीय आणि सामरिक विजयांच्या या चढत्या भांजणीमुळे ब्रिटनचं सामाजिक जीवनही भरभराटलं. ही भरभराट दाखवणारी काही ठळक वैशिष्ट्यं म्हणजे लंडन शहरात होणारे नाट्यप्रयोग आणि ऑर्केस्ट्रा. जोहान बाख किंवा लुडविग बीथोवन यांच्यासारखे उदंड कीर्ती मिळवणारे संगीतकार ब्रिटनमध्ये झाले नाहीत. पण, त्यांच्या अजरामर संगीत रचना वाजणारे अनेक उत्कृष्ट वाद्यवृंद होते. ते युरोपभर फिरून आपले कार्यक्रम सादर करीत असत. पाश्चिमात्य संगीत रचनांच्या छापील पुस्तिका असतात. वाद्यवृंद ऐकताना आणि पाहताना, हवं तर तुम्ही त्या पुस्तिका समोर ठेवूनही आस्वाद घेऊ शकता. नाटकांबद्दल बोलायचं तर विल्यम शेक्सपिअरसारखा दिगंत कीर्ती नाटककार इंग्लंडचा स्वतःचाच होता. हॅम्लेट, ऑथेल्लो, मॅकबेथ आणि किंग लिअर या अतिभव्य शोकांतिकांसह शेक्सपिअरची सगळीच नाटकं कायमच सुरू असायची. अनेक नाटक कंपन्या एकाच वेळी वेगवेगळ्या प्रेक्षागृहात शेक्सपिअरच्या कुठच्या ना कुठच्या नाटकाचा प्रयोग करीतच असायच्या.


या नाटकांना किंवा वाद्यवृंदांच्या कार्यक्रमांना जाणं, ही लंडनमधल्या खानदानी लोकांसाठी एक मोठी घटनाच असायची. म्हणजे रंगमंचावर सादर होणार्‍या कार्यक्रमाचा आनंद घेणं, हा एक भाग झाला. पण, त्या कार्यक्रमासाठी स्त्री-पुरुषांनी आपापल्या सामाजिक दर्जाला शोभेलशी वेशभूषा करणं. त्यावेळी मोटारी नव्हत्याच. त्यामुळे उत्तम सजवलेल्या घोडागाडीतून प्रेक्षागृहावर जाणं, तिथे इतर प्रेक्षकांमध्ये आपण उठून कसे दिसू, याची काळजी घेणं, अशी अनेक उपनाटकं असायची. त्यातून पुष्कळ गमतीजमती व्हायच्या. रंगमंचावर होणार्‍या विनोदांपेक्षाही भारी विनोद प्रेक्षागृहात घडायचे. कधी त्यातून रोमिओ-ज्युलिएट नाटकातल्या कथेपेक्षाही प्रखर वैर निर्माण व्हायची. कधी तिकडे बीथोवनची सुंदर सिंफनी वाजत असताना इकडे प्रेक्षागृहात खूनसुद्धा व्हायचे. शिवाय रंगमंचावरच्या प्रसंगानुसार खदाखदा हसणं, धो-धो रडणं, स्वर्गीय सुरावटींवर तल्लीन होऊन देहभान विसरणं, अशा स्वाभाविक प्रतिक्रियाही व्हायच्या. काही कल्पक चित्रकारांनी नाटक पाहणार्‍या प्रेक्षकांच्या अशा प्रतिक्रियांची झटपट ‘स्केचेस’ करून ठेवलेली आहेत. आता तुम्ही म्हणाल, हे चित्रकार तिथे कशाला गेले होते? तर त्याकाळी नाटकाचे पडदे रंगवणं हे एक फार महत्त्वाचं काम असे. अनेक चित्रकार एवढे कुशल होते की, लोक त्यांच्या पडद्यालासुद्धा टाळी देत असत. इथे अपरिहार्य आठवण येते ती आपल्याकडच्या पु. श्री. काळे या कलावंताची. बालगंधर्वांच्या गाण्या नि अभिनयाइतकीच कडाडून दाद पु. श्री. काळ्यांनी रंगवलेल्या गंधर्व कंपनीच्या नाटकाच्या पडद्याला मिळत असे. या पु. श्री. काळ्यांचे चिरंजीव म्हणजे लेखक आणि कथाकथक व. पु. काळे.


तर हे पडदे रंगवणारे चित्रकार प्रेक्षकांची ‘स्केचेस’ करायचे. कल्पना करा की, ड्यूक ऑफ वेलिंग्टन, नेपोलियनचा पराभव करणारा पराक्रमी इंग्रज सेनापती, बायकोमुलांसह शेक्सपिअरचं ‘ऑथेल्लो’ बघायला आलाय नि ऑथेल्लोने केवळ संशयाने नायिका डेस्डेमोनाचा गळा आवळलेला पाहून गहिवरलाय. त्याची बायको आणि मुलगी तर अश्रूच ढाळतायत. त्या चित्रकारांच्या हातात त्यावेळी कॅमेरा नव्हता. कारण, कॅमेर्‍याचा शोधच लागला नव्हता. पण, पेन्सिल होती. कोळशाचा तुकडा होता. त्यांनी भराभर या प्रसंगाची ‘पेन्सिल स्केच’, ‘चारकोल स्केच’ केली. विशेष गोष्ट पुढची आहे की, त्यावेळच्या अशा असंख्य छोट्या-मोठ्या वस्तू, चित्रं, कपडे, नाटकांच्या नेपथ्याचे आराखडे, पडदे, वाद्यं, जाहिराती, तिकिटं हे त्यांच्या मुलांनी, वारसदारांनी, संग्राहकांनी जपून ठेवलं. ते जपण्यासाठी विश्वस्त संस्था निर्माण केल्या आणि हर प्रयत्नाने हा वारसा जपला.

 
ब्रिटनमध्ये असंख्य सरकारी आणि खासगीसुद्धा म्युझियम्स आहेत. त्यापैकी एका संग्रहालयाने ‘जॉर्जियन कालखंडा’मध्ये लोक नाटक किंवा वाद्यवृंद अशा सार्वजनिक मनोरंजन कार्यक्रमात कसे जात असत, ही संकल्पना धरून एक प्रदर्शन भरवलं होतं. या कालखंडात जुन्या नाटकांबरोबरच कोणती नवी नाटकं आली. त्यांचे लेखक, दिग्दर्शक, संगीतकार, नट-नटी, गवय्ये-बजवय्ये, चित्रकार, नेपथ्यकार या सगळ्यांची नुसती माहिती नव्हे, तर चित्रं, वस्तू, कपडे, रंगभूषा साहित्य, नेपथ्य रचनेचे आराखडे, तिकिटं अशा असंख्य संबंधित चीजा होत्याच. पण, नाटकाला जायचं म्हटल्यावर प्रेक्षक कशी तयारी करायचे, कोणत्या फॅशनचे कपडे घालायचे, अशा घोडागाड्यांमधनं यायचे, कसे दाद द्यायचे, हे सगळं दृश्य स्वरुपात मांडलं होतं. प्रदर्शन खूप लोकप्रिय झालं होतं. त्याला मुदतवाढही मिळाली असती. पण, तेवढ्यात कोरोना प्रकरण सुरू झालं आणि सगळेच सार्वजनिक कार्यक्रम बंद करण्यात आले. हे सगळं वाचल्यावर आपल्याकडची दृश्यं डोळ्यांसमोर उभी राहतात. आधुनिक मराठी रंगभूमीची सुरुवात १८४३ साली सांगलीला विष्णुदास भाव्यांच्या ‘सीतास्वयंवर’ नाटकाने झाली. अण्णासाहेब किर्लोस्करांच्या १८८० सालच्या ‘शाकुंतल’ नाटकाने मराठी रंगभूमीच्या वैभवाच्या कालखंडाला सुरुवात झाली. भाऊराव कोल्हटकर ऊर्फ ‘भावड्या’ या गायक-अभिनेत्याने महाराष्ट्राला नाटकाचं वेड लावलं. १९०६ साली नारायण श्रीपाद राजहंस ऊर्फ ‘बालगंधर्व’ या अवघ्या १८ वर्षांच्या तरुणाने मराठी रंगभूमीवर पदार्पण केलं. मराठी नाटकाचा सुवर्णकाळ सुरू झाला.
 
हिंदुस्थानी संगीत पद्धतीने गाणारे श्रेष्ठ गायक उत्तर हिंदुस्थानात विपुल होतेच. १८५७ नंतर ते महाराष्ट्रातही येऊ लागले. त्यांच्या रागदारीतल्या चीजांवरूनच भास्करबुवा बखले, रामकृष्णबुवा वझे, गोविंदराव टेंबे यांनी नाटकातल्या गाण्यांच्या चाली बांधल्या. ते स्वर्गीय सूर आज शंभरावर वर्षे उलटून गेली, तरी महाराष्ट्राच्या कानात जसेच्या तसे आहेत. या खाँसाहेब आणि पंडितजींच्या बैठकाही मोठमोठ्या श्रीमंतांच्या दिवाणखान्यात किंवा सार्वजनिक सभागृहात होत.
 
या नाटकांना आणि संगीत जलशांना जाताना पूर्वी ही मंडळी नटूनथटून जात असत नि आजही जातात. सुबोध भावे, मुक्ता बर्वे, भरत जाधव यांचं नवं नाटक असेल किंवा सवाई गंधर्व संगीत महोत्सवाला हजेरी लावायची असेल, तर सगळे कसे टकाटक वेशभूषा करून जातात, ती गंमत प्रेक्षणीय असते. पण, अण्णासाहेब किर्लोस्कर ते आज अभिराम भडकमकर किंवा संजय पवार आणि अब्दुल करीम खाँसाहेब ते आज राहुल देशपांडेपर्यंत कार्यक्रमाला जाणार्‍या रसिक प्रेक्षकांच्या वेशभूषेत, आस्वाद घेण्याच्या प्रक्रियेत, पद्धतीत कसकसा फरक पडत गेला, हे कुणी मांडू शकेल का? वसंत शांताराम देसाई, पु. ल. देशपांडे, अरविंद गजेंद्रगडकर अशा नाटकं आणि संगीत या दोन्हींवर लिहिणार्‍या जाणकारांच्या लेखनातून आपल्याला याबद्दल माहिती मिळते, पण ती शब्दरुपात. ब्रिटिशांनी जसं प्रदर्शनरुपात आपल्या नाटक आणि संगीताच्या प्रेक्षक-श्रोत्यांचा इतिहासच लोकांसमोर मांडला, तसं आपल्याला करता येईल का?
 
याचा विचार करताना असं आढळतं की, अशा प्रकारची संग्राहक वृत्ती आपल्याकडे अभावानेच आहे. बालगंधर्वांच्या स्वर्गीय सुराला तितकीच तोलामोलाची साथ देणारी कादरबक्षांची सारंगी आणि थिरखवांचा तबला आज कुठे आहेत? इथे इंग्रज असते, तर त्यांनी ही दोन्ही वाद्यं जपून ठेवली असती. पडद्याला टाळी घेणारे पु. श्री. काळ्यांनी रंगवलेले पडदे. कुठे आहेत ते? चित्रकलेच्या बाबतीत तर आपण खूपच मागे आहोत. स्वयंवर नाटकात ‘स्वकुल तारक सुता’ हे एक प्रसिद्ध गीत आहे. बालगंधर्व ते गाताना कोयल निषादावरून षड्जावर जाताना कोमल निषादाला एक नाजूक हेलकावा देत असत. ती करामत इतकी गोड असे की, श्रोते बेभान होत. एकदा कोल्हापूरच्या एका प्रयोगाला ‘संगीतमहर्षी’ अशी सार्थ पदवी ज्यांना होती, ते खाँसाहेब अल्लादियाखाँ हे उपस्थित होते. कोमल निषादावरून षड्ज गाठतानाची बालगंधर्वांची ती स्वर्गीय सुरावट ऐकून खाँसाहेबांच्या डोळ्यांत आनंदाश्रू उभे राहिले. त्यांनी जागेवर उभं राहून दाद दिली. कल्पना करा, कुणीतरी तो सगळा प्रसंग चित्रामध्ये पकडून ठेवला असता तर?

 
 
@@AUTHORINFO_V1@@