काँग्रेसच्या नेत्यांचा आपल्याच पक्षाच्या आमदारांवर विश्वास नाही. ते कधीही फुटतील, अशी भीती त्या पक्षाच्या नेत्यांना वाटत आहे, ही वस्तुस्थिती आहे. मात्र, या सर्व कृतीचे खापर भाजपवर फोडून भाजपला लक्ष्य करण्याचे उद्योग काँग्रेसने चालविले आहेत.
कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे पुढे ढकललेल्या राज्यसभेच्या निवडणुका येत्या १९ जून रोजी घेण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतल्यानंतर आपले आमदार पक्षाशी एकनिष्ठ राहतील की नाही, या भीतीने काँग्रेसच्या पोटात भीतीचा गोळा उठला आहे. या निवडणुका घोषित झाल्या असतानाच दुसरीकडे काँग्रेसच्या तीन आमदारांनी राजीनामा दिल्याने काँग्रेसच्या गोटामध्ये अस्वस्थता पसरली आहे. राज्यसभेच्या चार पैकी दोन जागा मिळणार की केवळ एकाच जागेवर आपली बोळवण होणार, या भीतीने काँग्रेसला ग्रासले असल्याने आणखी आमदार फुटू नयेत म्हणून काँग्रेसने मोर्चेबांधणीस प्रारंभ केला आहे. काँग्रेसने नेहमीप्रमाणे ‘रिसॉर्ट पॉलिटिक्स’चा आधार घेऊन आपल्या ६५ आमदारांना तीन ठिकाणच्या रिसॉर्टमध्ये हलविले आहे. आपले आमदार फुटतील या भीतीतून काँग्रेसने ही कृती केली आहे, हे उघडच आहे.
गुजरात काँग्रेसने आपल्या आमदारांपैकी काहींना राजस्थानमध्ये अंबाजीलगतच्या ‘वाईल्ड विंड रिसॉर्ट’मध्ये, काहींना राजकोटमधील ‘नील सिटी रिसॉर्ट’ मध्ये, तर काहींना वडोदरालगत उमेटा येथील ‘हेएरीस रिव्हरसाईड फार्म हाऊस’मध्ये ठेवले आहे. उत्तर गुजरातमधील आमदार एके ठिकाणी, सौराष्ट्र भागातील आमदार दुसर्या ठिकाणी आणि मध्य आणि दक्षिण गुजरातमधील आमदार तिसर्या ठिकाणी अशी ही वर्गवारी करण्यात आली आहे. राज्यसभा निवडणूक लक्षात घेऊन, भाजपने आमच्या आमदारांना गळाला लावू नये म्हणून आम्ही आमच्या आमदारांना सुरक्षित स्थळी ठेवण्याचा निर्णय घेतला असल्याचे काँग्रेसच्या एका ज्येष्ठ नेत्याने म्हटले आहे.
“गुजरातमधील भाजप सरकारवर आमचा विश्वास नसल्याने आम्ही आमच्या आमदारांना तीन स्वतंत्र ठिकाणी ठेवले,” असा युक्तिवाद काँग्रेसकडून करण्यात आला. सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने गुजरात सरकार आमच्याविरुद्ध महामारी कायद्याचा वापर करून काहीही कारवाई करू शकते, हे लक्षात घेऊन आम्ही सर्वांना एकत्र न ठेवता वेगवेगळ्या ठिकाणी ठेवले असल्याचे काँग्रेसने म्हटले आहे. काँग्रेसच्या नेत्यांचा आपल्याच पक्षाच्या आमदारांवर विश्वास नाही. ते कधीही फुटतील, अशी भीती त्या पक्षाच्या नेत्यांना वाटत आहे, ही वस्तुस्थिती आहे. मात्र, या सर्व कृतीचे खापर भाजपवर फोडून भाजपला लक्ष्य करण्याचे उद्योग काँग्रेसने चालविले आहेत.
‘कोविड-१९’ मुळे देशातील राज्यसभेच्या १८ जागांसाठी होणार्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या होत्या. त्या आता १९ जूनला होत आहेत. गुजरातमधील चार, आंध्र प्रदेशातील चार, मध्य प्रदेश आणि राजस्थानमधील प्रत्येकी तीन, झारखंडमधील दोन आणि मणिपूर व मेघालयातील प्रत्येकी एक अशा १८ जागांसाठी या निवडणुका होत आहेत. गुजरातमधील चार जागांपैकी दोन जागा, तर भाजप मिळविणार आहेच, पण तिसरी जागाही भाजप मिळवू शकतो, या भीतीने काँग्रेसने आपल्या ६५ आमदारांना ‘बंदोबस्ता’त ठेवण्याचा निर्णय घेऊन तो कृतीतही आणला आहे.
गुजरात विधानसभेच्या १८२ सदस्यांमध्ये आता काँग्रेसचे ६५ आमदार उरले आहेत. काँग्रेसच्या तीन आमदारांनी राजीनामे दिल्याने काँग्रेसची ही संख्या ६५वर आली आहे. २०१७ साली झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसने ७७ जागा जिंकल्या होत्या. राज्यसभेच्या चार जागांसाठी खरे म्हणजे गेल्या २६ मार्च रोजीच निवडणुका होणार होत्या. पण, कोरोना प्रादुर्भावामुळे त्या पुढे ढकलण्यात आल्या होत्या. त्यावेळी काँग्रेसच्या पाच आमदारांनी राजीनामे दिल्याने त्या पक्षाचे संख्याबळ ६८ वर आले होते. आमदारांची आणखी फाटाफूट होऊ नये, म्हणून त्यावेळी पक्षाच्या ६८ आमदारांना जयपूरमधील ‘हॉटेल शिव विलास’मध्ये ठेवण्यात आले होते. पण, २४ मार्च रोजी ‘लॉकडाऊन’ झाल्याने या निवडणुका पुढे ढकलल्या गेल्या. आता त्या १९ जून रोजी होत आहेत.
गुजरातमधील राज्यसभेच्या ज्या चार जागा रिकाम्या झाल्या, त्यातील तीन जागा भाजपकडे होत्या. भाजपला दोन जागा मिळणारच आहेत, पण तिसरी जागा मिळविण्यासाठी दोन मते कमी पडत आहेत, तर काँग्रेसला दोन जागा जिंकण्यासाठी चार मते कमी पडत आहेत. गुजरात विधानसभेत भाजपचे १०३, काँग्रेसचे ६५, राष्ट्रवादी काँग्रेस एक, अपक्ष एक आणि छोटू वसावा यांच्या भारतीय आदिवासी पक्षाचे दोन आमदार असे पक्षीय बलाबल आहे. २०१७ मध्ये झालेल्या राज्यसभा निवडणुकीच्यावेळी त्यावेळी जनता दल संयुक्तमध्ये असलेल्या छोटू वसावा यांनी काँग्रेसचे नेते अहमद पटेल यांच्या पारड्यात मत टाकून त्यांना मदत केल्याची चर्चा होती. पण नंतरच्या काळात छोटू वसावा यांचा भारतीय आदिवासी पक्ष आणि काँग्रेस यांचे लोकसभेच्या जागा वाटपावरून फाटल्याने वसावा काँग्रेसच्या बाजूने उभे राहण्याची शक्यता नाही.
२०१९ मध्ये झालेल्या राज्यसभा निवडणुकीत वसावा पिता-पुत्राने परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्या पारड्यात मते टाकल्याची चर्चा होती. नंतर वसावा पिता-पुत्रांनी जाहीरपणे त्याचे खंडन केले होते. तसेच त्यावेळी काँग्रेसचे दोन आमदार अल्पेश ठाकूर आणि धवलसिंह झाला या दोघांनीही ‘क्रॉस वोटिंग’ केले होते. नंतर त्या दोघांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. २०१९च्या राज्यसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने पक्षादेश काढला असतानाही राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार कंधल जाडेजा यांनी भाजपला मत दिल्याची चर्चा होती. या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस कोणाच्या पारड्यात मत टाकणार, याकडे सर्वांचे लक्ष आहे. महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस सहभागी आहेत. पण, त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचा आमदार उमेदवारास मत देईलच, असे काही सांगता येणार नाही. ते सर्व पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर अवलंबून आहे, हे काही सांगायला नको!
भाजपने या निवडणुकीत राजकोटचे प्रसिद्ध वकील अभय भारद्वाज, माजी शासकीय अधिकारी रमिलाबेन बारा यांना उतरविले आहे. रमिलाबेन या वनवासी असून बनासकांठातील आहेत. काँग्रेसने राष्ट्रीय प्रवक्ते शक्तीसिंह गोहिल आणि आणि माजी मंत्री भारतसिंह सोलंकी यांना मैदानात उतरविले आहे. पण, भाजपने नरहरी अमीन यांची उमेदवारी घोषित केल्याने विरोधी काँग्रेसमध्ये अस्वस्थता पसरली आहे. अमीन हे माजी काँग्रेस नेते असून ते पाटीदार समाजाचे आहेत. २०१२ मध्ये त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता.
या सर्व पार्श्वभूमीवर गुजरातमध्ये राज्यसभेच्या चार जागांसाठी निवडणुका होत आहेत. काँग्रेसमध्ये अंतर्गत धुसफूस असल्याने पक्षाने ठरविलेल्या उमेदवारासच काँग्रेसचे आमदार मत देतील, असा विश्वास काँग्रेसच्या नेत्यांनाही वाटत नाही. १९ जूनला अजून बराच वेळ असल्याने त्या दरम्यानच्या काळात भाजप फोडाफोडीचे राजकारण करून आपला तिसरा उमेदवार निवडून आणील, असे काँग्रेसला वाटत आहे. खरे म्हणजे, आपल्या आमदारांवर विश्वास नसल्याने काँग्रेसने नित्याप्रमाणे ‘रिसॉर्ट पॉलिटिक्स’ याही वेळी खेळायचे ठरविले आहे. आपले आमदार हातातून निसटून जातील, अशी भीती काँग्रेसला वाटत आहे. तसेच हे निमित्त साधून भाजपवर वाटेल ते आरोप काँग्रेसकडून केले जात आहेत. या निवडणुकीमध्ये नेमके काय होणार, याचे चित्र १९ जून रोजी स्पष्ट होणार आहे. पण, या निवडणुकीच्या धसक्यानेच काँग्रेसने आपल्या आमदारांना तीन स्थानी जखडून ठेवले आहे. एवढी सर्व मोर्चेबांधणी केल्यावर काँग्रेस पक्ष आपल्या दोन जागा जिंकण्यात यशस्वी होतो का, याच्या उत्तरासाठी काही काळ प्रतीक्षा करावी लागणार आहे.