
१२ कर्मचारी क्वारंटाईन; ग्राहकांना कार्यालयात गर्दी टाळण्याचे आवाहन
कल्याण : लॉकडाऊन कालावधी व त्यांनतरही वीज ग्राहकांना अखंडित वीजपुरवठा मिळावा, यासाठी कार्यरत महावितरणच्या कल्याण परिमंडलातील सहा कर्मचाऱ्यांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे. तर या कर्मचाऱ्यांच्या संपर्कातील १२ कर्मचाऱ्यांचे विलगीकरण (क्वारंटाईन) करण्यात आले आहे. वीज मीटरचे रीडिंग सुरु झाल्यानंतर ग्राहकांना लॉकडाऊन व त्यानंतरच्या तीन महिन्याच्या कालावधीचे वीज वापरानुसार अचूक व एकत्रित वीजबिल देण्यात येत आहे. वीजबिल प्राप्त झाल्यानंतर बिल अधिक असल्याच्या तक्रारी घेऊन महावितरणच्या कार्यालयात येणाऱ्या ग्राहकांची संख्या वाढली आहे. ग्राहकांनी स्वतःला कोरोना विषाणूच्या संसर्गापासून सुरक्षित ठेवण्यासाठी व महावितरण कर्मचाऱ्यांचा संभाव्य धोका टाळण्यासाठी कार्यालयातील गर्दी टाळावी, असे आवाहन मुख्य अभियंता दिनेश अग्रवाल यांनी केले आहे.
कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी मार्चच्या शेवटच्या आठवड्यात लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर कल्याण परिमंडलात ग्राहकांच्या वीज मीटरचे रीडिंग व वीजबिलांच्या प्रतींचे वाटप बंद करण्यात आले. लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर जूनच्या पहिल्या आठवड्यापासून प्रतिबंधित भाग वगळता इतर ठिकाणी मीटर रीडिंग व वीजबिलांचे वाटप सुरु करण्यात आले. तत्पूर्वी एप्रिल व मे महिन्याचे वीजबिल जानेवारी ते मार्च या तुलनेने कमी वीज वापर असलेल्या महिन्याच्या सरासरी युनिटनुसार आकारण्यात आले. केवळ ऑनलाइन वीजबिल स्वीकृतीच्या पर्यायामुळे या वीजबिलाचा भरणा करणाऱ्या ग्राहकांचे प्रमाणही अत्यल्प आहे. आता मीटर रीडिंगनंतर दरमहाच्या स्लॅब बेनेफिटचा लाभ देऊन तीन महिन्याचे एकत्रित व वीज वापरानुसार अचूक वीजबिल देण्यात येत आहे. ग्राहकांनी प्राप्त वीजबिल बारकाईने अभ्यासावे तसेच बिलावरील रीडिंग व प्रत्यक्ष मीटरवरील रीडिंग यांची तुलना करावी. यात तफावत नसल्यास वीजबिल योग्य आहे, तफावत असल्यास वीजबिल दुरुस्त करून देण्यात येईल. वीजबिलावर 'आरएनटी' असा उल्लेख असल्यास मीटर रीडिंगशिवाय बिल पाठवले असल्याचे लक्षात घ्यावे.
लॉकडाऊन व त्यानंतर आलेल्या निसर्ग चक्री वादळात ग्राहकांना अखंडित वीजपुरवठा व्हावा, यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करणाऱ्या सहा कर्मचाऱ्यांना दुर्दैवाने कोरोना विषाणूची बाधा झाली आहे. त्यांच्या संपर्कातील १२ कर्मचाऱ्यांचे विलगीकरण करण्यात आले आहे. यात अधिक बिजबिल आल्याच्या तक्रारी व डुप्लिकेट वीजबिल मिळविण्यासाठी वीज ग्राहक महावितरणच्या कार्यालयात गर्दी करत आहेत. कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी www.mahadiscom.com या संकेतस्थळावरील ग्राहकांसाठीचे पोर्टल व मोबाईल अँपच्या माध्यमातून तक्रारी नोंदवाव्यात व या दोन्ही पर्यायांसह विविध पेमेंट वॅलेटचा वापर अथवा बिल भरणा केंद्रात वीजबिल भरून सहकार्य करावे. वीज कर्मचाऱ्यांमध्ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढल्यास मनुष्यबळाच्या उपस्थितीवर व पर्यायाने वीज सेवेवर विपरीत परिणामाचा धोका लक्षात घेऊन कार्यालयातील गर्दी टाळण्याचे आवाहन मुख्य अभियंता दिनेश अग्रवाल यांनी केले आहे.
प्रतिनबंधात्मक उपाययोजना
कल्याण परिमंडलात सर्वच कार्यालये व वीजबिल भरणा केंद्रांमध्ये तापमापक यंत्र, सॅनिटायजर, मास्क, हॅन्ड ग्लोव्हज, शारीरिक अंतराचे पालन करून कामकाज सुरु आहे. ग्राहकांच्या गर्दीमुळे शारीरिक अंतराचे पालन करण्यावर मर्यादा येत आहेत. कोरोना विषाणूची बाधा झालेले रुग्ण आढळलेल्या ठिकाणांसह सर्वच कार्यालयांमध्ये निर्जंतुकीकरण करण्यात येत आहे.