धक्कादायक : कोरोना पॉझिटिव्ह व क्वारंन्टाइन रूग्ण एकाच ठिकाणी!

    19-Jun-2020
Total Views | 102
Wada_1  H x W:

रूग्णांत भितीचे वातावरण; सोयी सुविधांचाही अभाव 

वाडा : पालघर जिल्ह्यासाठी तीनशे खाटा असलेले कोविड सेंटर हे तालुक्यातील पोशेरी येथे सुरू केले आहे. मात्र या सेंटर मध्ये कोरोना पॉझिटिव्ह व क्वारंन्टाइन असे दोन्हीही रुग्ण एकाच ठिकाणी असल्याने व एकाच प्रसाधनगृहाचा वापर दोन्ही रूग्ण करीत असल्याने क्वारंन्टाइन रूग्णांत भीतीचे वातावरण पसरले आहे. याचबरोबर येथे सुविधांचाही तुटवडा असल्याने रूग्ण नाराजी व्यक्त करीत आहेत.

तालुक्यातील पोशेरी येथील कोविड सेंटर मध्ये अनेक कोरोना पॉझिटिव्ह व क्वारंन्टाइन केलेले रुग्ण उपचार घेत आहेत. दोन्हीही रूग्ण एकाच ठिकाणी असल्याने क्वारंन्टाइन केलेल्या रूग्णांत भीतीचे वातावरण पसरले आहे. या सेंटर मध्ये एकच प्रसाधनगृह असल्याने पॉझिटिव्ह व क्वारंन्टाइन रूग्णांना एकाच प्रसाधनगृहाचा वापर करावा लागत असल्याने क्वारंन्टाइन केलेल्या रूग्णांना कोरोनाची बाधा होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे. विशेष म्हणजे प्रसाधनगृहात घाणीचे साम्राज्य पसरले आहे. शौचालयात स्वच्छता नाही, वॉश बेसिन पाण्याने तुंबून भरले आहेत. अशा प्रकारे कोविड सेंटर हे घाणीचे साम्राज्यत असल्याची माहिती क्वारंन्टाइन केलेल्या रूग्णांनी दिली. दरम्यान एकट्या वाडा तालुक्याची रुग्णांची संख्या १२३ च्या घरात आहे.


सुरुवातीला आहारामध्ये खीर, दूध, काढा ह्यांचा सामावेश असायचा, परंतु आता तसं काहीच दिसत नाही. खोलीमधे स्वच्छता केली जात नाही. एकंदरीत येथील वातावरण बघता एखादी चांगली व्यक्ती देखील आजारी पडू शकेल असे वातावरण कोविड सेंटर मध्ये असल्याचे रूग्णांनी नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले. मात्र यासंदर्भात कोविड सेंटरचे प्रमुख तथा ग्रामीण रूग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. प्रविण जाधव यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी वरील आरोपाचे खंडन केले आहे.
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121