‘फास्ट फूड’पेक्षा थोड्याशाच जास्त वेळात जर चांगलं, सकस अन्न बनवता येत असेल आणि निरोगी राहता येत असेल, तर तसं का करू नये; असं ‘स्लो फूडवाल्यां’चं म्हणणं आहे.
अलीकडचीच गोष्ट. स्थळ- अमेरिकेच्या कॅलिफोर्निया राज्याची राजधानी सान फ्रान्सिस्को शहर. शहरातील प्रमुख भाग असणार्या म्हणजे सर्व राज्य सरकारी कार्यालयं, नगरभवन इत्यादी वास्तू असणार्या भागात एक तात्पुरतं निसर्ग उद्यान उभं करण्यात आलं होतं. त्यातली सर्व झाडं नैसर्गिक सेंद्रीय खतांवरच वाढवण्यात आलेली होती. त्यात फुलझाडं होतीच, पण मुख्य भर होता विविध प्रकारच्या फळझांडावर आणि भाज्यांवर. उद्यानात बरेचसे स्टॉल्सही लावण्यात आले होते. तिथे उभी असलेली माणसं अतिशय निरोगी दिसत होती आणि ती प्रेक्षकांना नैसर्गिक खतांवर वाढवण्यात आलेल्या फळं, भाज्या यांच्याबद्दल भरपूर माहिती तत्परतेने देत होती. तिथे भाज्या तर विक्रीला होत्याच, शिवाय कोणतीही प्रीझर्व्हेटिव्ह रसायनं न वापरता बनवलेली विविध प्रकारची चीज, मेयॉनीज इत्यादीसुद्धा होती. हे झालं शाकाहारी लोकांसाठी. चवीने मांसाहार करणार्यांसाठी ‘हॅम’ म्हणजे डुकराचं मांसदेखील होतं. पण, त्याचंदेखील हेच वैशिष्ट्य होतं की, त्यात कोणतीही रासायनिक संरक्षकं घातलेली नव्हती. लोक उत्सुकतेने निसर्ग उद्यान पाहत होते. रसरशीत ताज्या भाज्या पाहून खूश होत होते. स्टॉलवरच्या निरोगी वाटाड्यांकडून प्रदर्शनाची नि त्याच्या प्रवर्तक संघटनेची माहिती ऐकून प्रभावित होत होते. अखेर ‘स्लो फूड’ चळवळ अमेरिकेच्या किनार्यावर उतरली होती. ‘फास्ट फूड’ संकल्पनेची जननी असलेल्या कॅलिफोर्नियात जाऊन थडकली होती.
दुसर्या महायुद्धाने अनेक आधुनिक गोष्टींना जन्म दिला किंवा पूर्वी प्रचलित असलेल्या अनेक गोष्टी नव्याने प्रचारात आणल्या. ‘फास्ट फूड’ ही त्यातलीच एक गोष्ट. १९४० साली डिक आणि मॉरिस या मॅक्डोनाल्ड बंधूंनी कॅलिफोर्निया राज्यात सान बर्नार्डिनो इथे पहिलं मॅक्डोनाल्ड फास्ट फूड रेेस्तराँ सुरू केलं. व्यवस्थित बांधलेले हॅमबर्गर किंवा चीजबर्गर, फ्रेंच फ्राईज, केचप आणि कोकाकोला हे मॅक्डोनाल्ड बंधूंचं पहिलं उत्पादन होतं. भलामोठा बनपाव. तो मधोमध कापायचा. त्यावर चविष्ट चटणी, किसलेली कोबी, चीजचा तुकडा आणि वर एक हॅमचा म्हणजे डुकराच्या मांसाचा तुकडा ठेवला की झाला ‘हॅमबर्गर’ तयार. यात हॅमऐवजी चीजचा भलामोठा तुकडा ठेवला की झाला ‘चीजबर्गर.’ शिजवलेल्या बटाट्याच्या मोठ्यामोठ्या फोडी करून डीप फ्रीजमध्ये ठेवायच्या आणि आयत्या वेळी बाहेर काढून वळायच्या; म्हणजे त्या फुलतात. त्यावर झकास चटक-मटक मसाला फासला की ‘फ्रेंच फ्राईज’ तयार. थोडेसे पोटभरीचे; बरेचसे चटक-मटक असे हे पदार्थ खायचे नि वर कोकाकोला किंवा तत्सम कोणतंही सॉफ्ट ड्रिंक ढोसायचं की नाश्ता आटपला. अमेरिका हे नवं राष्ट्र आहे. गती, वेग हा त्या राष्ट्राचा विशेष आहे. सगळ्या गोष्टी तिथे झटपट चालतात. थांबायला कुणाला वेळ नसतो. म्हणून तर मोटार हा अमेरिकन माणसाचा प्राण आहे. एक वेळ तो अन्नपाण्यावाचून राहील, पण मोटारीशिवाय जगूच शकणार नाही. मोटारीतून दर दिवशी मोठमोठी अंतरं पार करणार्या अमेरिकन माणसाला मॅक्डोनाल्ड बंधूंचं हे झटपट खाणं फारच पसंत पडलं. मोटारीतून उतरायचीही गरज नाही. मॅक्डोनाल्डच्या रस्त्याकडेच्या टपरीसमोर गाडी थांबवायची. खाद्यपदार्थांची पुडकी नि पेयाच्या बाटल्या घ्यायच्या. गाडी चालवता चालवता ते पदार्थ हादडायचे की झाले मोकळे. अशा सगळ्या झटपट मामल्यामुळे हळूहळू या पदार्थांना ‘फास्ट फूड’ हा शब्द रूढ होत गेला.
नंतर क्रमाक्रमाने यात पास्ता, पिझ्झा, नूडल्स इत्यादी अनेक पदार्थांची भर पडत गेली. पुढे तर विशिष्ट जाड कागद, प्लास्टिक यांच्या नवनवीन आवरणांमुळे अनेकच पदार्थ आणि पेयं पॅकबंद स्थितीत मिळू लागली आणि त्या सर्वांचाच समावेश ‘फास्ट फूड’मध्ये होऊ लागला. अगदी काटेकोरपणे पाहायचं झालं तर ‘फास्ट फूड’ हा शब्द आधुनिक असला तरी ती संकल्पना त्याहीपूर्वी होतीच. अमेरिकेपुरतं बोलायचं, तर सन १८६७ मध्ये चार्ल्स फेल्टमन नावाच्या माणसाने न्यूयॉर्कमध्ये ब्रुकलिन भागात ‘हॉट डॉग’ हा पदार्थ मिळणारी रस्त्याकडेची टपरी सर्वप्रथम सुरू केली. ‘हॉट डॉग’ म्हणजे एका लांबट बनपावाच्या मध्यभागी त्याच आकाराचं सॉसेज भरून वर मसाले, चीज, चिरलेल्या भाज्या वगैरे सजावट करतात. सॉसेज म्हणजे प्राण्याच्या मांसापासून विशेषतः त्याच्या आतड्यांपासून विशिष्ट रीतीने बनवलेला पदार्थ. हे सॉसेज गरम असतानाच बनपावात भरतात, म्हणून तो ‘हॉट डॉग’. चार्ल्स फेल्टमनची ही ‘हॉट डॉग’ टपरी त्यावेळी खूपच लोकप्रिय झाली होती. त्यापासून स्फूर्ती घेऊन 1893 साली शिकागो शहरात भरलेल्या ‘वर्ल्ड कोलंबियन एक्स्पोझिशन’ नावाच्या जागतिक प्रदर्शनात, ‘हॉट डॉग’बरोबरच आईस्क्रीम कोन आणि थंडगार चहा असे पदार्थही ठेवण्यात आले होते. ते लोकप्रियही झाले. आता चार्ल्स फेल्टमनला हा ‘हॉट डॉग’ पदार्थ कसा सुचला; तर फेल्टमन हा मुळात ‘फेल्टमान’ म्हणजे जर्मन. स्थलांतरित होऊन अमेरिकेत आलेला आणि हा ‘हॉट डॉग’ जर्मनीत फ्रँकफर्टमध्ये नि बाजूच्या ऑस्ट्रियाची राजधानी व्हिएन्नाममध्ये पंधराव्या शतकापासून लोकप्रिय आहे. जर्मनीत तर त्या पदार्थाला ‘फ्रँकफर्टर’ असंच म्हणतात.
इंग्लंडची तर्हा आणखीनच वेगळी. सतराव्या शतकात एडवर्ड माँटेग्यू हा इंग्लंडमधला एक मोठा सरदार होता. ऑलिव्हर क्रॉमवेलने इंग्लंडचा राजा पहिला चार्ल्स याचा शिरच्छेद करून राज्यक्रांती केली. दहा वर्षांनी क्रॉमवेल मेला. तेव्हा पहिल्या चार्ल्सचा मुलगा दुसरा चार्न्स याला विजनवासातून पुन्हा इंग्लंडच्या गादीवर आणून बसवण्यात एडवर्ड माँटेग्यूचा मोठा सहभाग होता. या कामगिरीबद्दल दुसर्या चार्ल्सने त्याला ‘अर्ल ऑफ सॅण्डविच’ ही सरदारकी बहाल केली. ‘अर्ल’, ‘ड्युक’, ‘काऊंट’ या वेगवेगळ्या दर्जाच्या सरदारक्या होत्या. इंग्लंडच्या आग्नेयेला आजच्या डोव्हर बंदराजवळ ‘सॅण्डविच’ नावाचं एक बंदर त्या काळी होतं. ते बंदर आणि आजूबाजूचा काही भाग जहांगीर म्हणून देऊन एडवर्ड माँटेग्यूला ‘अर्ल ऑफ सॅण्डविच’ बनवण्यात आलं. या एडवर्डचा नातू जॉन माँटेग्यू हाही मोठा सरदार होता. ‘अर्ल’ किताब नि जहांगिरी वंशपरंपरा असल्यामुळे त्यालाही ‘अर्ल ऑफ सॅण्डविच’ हा किताब होताच. हा जॉन इंग्लंडच्या नौदलाचा मुख्य दर्यासारंग होता. तो अट्टल जुगारी होता. एकदा जुगार खेळायला बसला की त्याला तहानभुकेचंही भान राहत नसे. एकदा जुगार खेळताना फारच भूक लागली म्हणून त्याने जुगाराच्या टेबलावरच पाव आणि सुकं मटण मागवलं. स्वतःच पावाच्या लांबट फांकी म्हणजे स्लाईस केल्या. पावाच्या दोन फाकांमध्ये सुक्या मांसाची एक पातळ फांक घातली आणि तो पदार्थ गट्ट करून टाकला. आजूबाजूच्या लोकांना ही युक्ती आवडली. त्यांनीही ती करून पाहिली. जॉनच्या आचार्याला हा प्रकार कळल्यावर त्याने पावात मांसाबरोबरच इतरही चवदार गोष्टी भरून पाहिल्या. अल्पावधीतच हा नवीन पदार्थ इंग्लंडभर लोकप्रिय झाला. जॉन माँटेग्यू उर्फ ‘अर्ल ऑफ सॅण्डविच’ने तो शोधून काढला, म्हणून लोकांनी त्या पदार्थालाच ‘सॅण्डविच’ हे नाव बहाल करून टाकलं. ही घटना 1762 सालची. त्यामुळे इंग्रजांचं म्हणणं असं की, हॉट डॉग, हॅमबर्गर, चीज बर्गर हे सगळे पदार्थ पावात भरलेला वेगवेगळ्या प्रकारचा मालमसाला अशाच स्वरुपाचे असल्यामुळे, ते एका दृष्टीने सॅण्डविचचेच प्रकार आहेत आणि सॅण्डविचचे जनक आम्ही आहोत.
पण, आणखीन मागे जायचं तर तुर्क साम्राज्याच्या काळात इस्तंबूल, दमास्कस, बगदाद इत्यादी मोठ्या शहरांमध्ये कोपर्याकोपर्यावर कबाब किंवा तत्सम पदार्थांची छोटी दुकानं असत. त्यांना ‘कुश्क’ म्हणत. सध्या फैनाबाज म्हणजे फॅशनेबल अमेरिकन इंग्लिशमध्ये ज्यांना ‘किओस्क’ म्हणतात, तो या कुश्कचाच अपभ्रंश. त्याच्याही अगोदर रोमन साम्राज्याच्या काळात रोम, बायझंटियम, जेरुसलेम अशा तत्कालीन मोठ्या शहरांमध्ये कोपर्यांवर अशीच पाव आणि ऑलिव्ह फळं मिळणारी छोटी दुकानं असत. या सर्व माहितीचा तपशील लक्षात घेता एक महत्त्वाचा मुद्दा असा दिसतो की, हे झटपट तयार खाद्यपदार्थ दर्जाने हलके असतात. झटपट, चटकमटक आणि तात्पुरते पोटभरीचे पदार्थ हे यांचं वैशिष्ट्य असले तरी तीच त्यांची मर्यादाही आहे. कारण, हे माणसाच्या शरीराचं पोषण करणारे सकस अन्नपदार्थ नव्हेत. तात्पुरतं पोट भरणे आणि पोषणापेक्षा जिभेला आवडेल असा चटकदारपणा असणं, एवढंच त्यांचं मर्यादित उद्दिष्ट असतं. म्हणूनच ते स्वस्त आणि मस्त असतात. पण, हे गुण नि अवगुण विसरून ‘फास्ट फूड’लाच जर कुणी मुख्य अन्न ठरवलं तर काय होईल? जे काय घडतंय ते अमेरिकन लोकांच्या रुपाने आपल्यासमोरच आहे. ‘ओबेसिटी’ म्हणजे अतिलठ्ठपणा हा रोग अमेरिकेत सर्दी-खोकल्याइतकाच सर्रास झाला आहे. दर तीन नागरिकांपैकी एक जण अतिलठ्ठपणाने ग्रासलेला आहे. त्यातही हे प्रमाण लहान मुलांमध्ये भयंकर आहे. वैश्वीकरण आणि उदारीकरण या अमेरिकन आर्थिक धोरणांमुळे मॅक्डोनाल्ड आणि इतर अमेरिकन ‘फास्ट फूड’ कंपन्या जगभर धुमाकूळ घालीत सुटल्या आहेत.
या सगळ्यांची प्रतिक्रिया म्हणून इटलीत म्हणजे पिझ्झा आणि पास्ताच्या देशातच 1986 साली ‘स्लो फूड मूव्हमेंट’ ही चळवळ सुरू झाली. कार्लो पेट्रिनी हा इटालियन बल्लवाचार्य या चळवळीचा निर्माता आहे. चटकमटक फास्ट फूडमुळे केवळ लठ्ठपणाच वाढतो असं नव्हे, तर हृदयविकार आणि त्याहीपेक्षा घातक असा मधुमेह अपरिहार्यपणे होतोच, असं ‘स्लो फूडवाले’ म्हणतात. विज्ञानही तेच म्हणतं. ‘फास्ट फूड’ पदार्थ, त्यासाठी वापरले जाणारे इतर पदार्थ, मग ते चीज असो, भाज्या असोत वा वेगवेगळ्या प्रकारचं मांस असो, हे सगळंच माणसाच्या आरोग्याला घातक आहे. तेव्हा आरोग्य आणि दीर्घायुष्य हवं असेल तर रासायनिक खतं न घातलेल्या भाज्या, फळं, धान्य वापरा. मांसदेखील शक्य तितकं ताजं वापरा. या सर्वांचा वापर करून उत्तम खाद्यपदार्थ बनवणं ‘फास्ट फूड’ इतकं झटपट नसेल कदाचित, पण त्याला खूपच वेळ लागतो असंही नाही. ‘फास्ट फूड’पेक्षा थोड्याशाच जास्त वेळात जर चांगलं, सकस अन्न बनवता येत असेल आणि निरोगी राहता येत असेल, तर तसं का करू नये; असं ‘स्लो फूडवाल्यां’चं म्हणणं आहे. गंमत म्हणजे, निरोगीपणा ही स्थिती झपाट्याने संपुष्टात येत चाललेल्या अमेरिकेत ही ‘स्लो फूड चळवळ’ लोकप्रिय होत आहे.