शहीद कर्नल बिक्कुमल्ला संतोष बाबू यांच्या वीरमातेची प्रतिक्रिया!
नवी दिल्ली : आई म्हणून एकुलता एक मुलगा गमावल्याचे दुःख आहे, मात्र माझ्या मुलाने देशासाठी प्राणार्पण केले, याचा अभिमान असल्याची प्रतिक्रिया चीनी सैन्यासोबत झालेल्या संघर्षात धारातीर्थी पडलेल्या शहीद कर्नल बिक्कुमल्ला संतोष बाबू यांच्या मातोश्रींनी दिली.
शहीद कर्नल संतोष यांच्या आई मंजुळा या दुःखद वृत्तालाही मोठ्या धीराने सामोऱ्या गेल्या. “आता तो मला अम्मा म्हणून हाक मारणार नाही. एकुलता एक मुलगा गमावल्याचे दुःख आहे. पण देशासाठी त्याने आपल्या प्राणाचे बलिदान दिले, याचा मला अभिमान आहे”, असे त्या म्हणाल्या.
शहीद कर्नल बिक्कुमल्ला संतोष बाबू यांची हैदराबादमध्ये पोस्टिंग झाल्याची ऑर्डर ३ महिन्यांपूर्वीच हाती आली होती. मात्र लॉकडाऊन व चीनसोबत असलेल्या तणावामुळे पोस्टिंग लांबली होती. त्यांची पत्नी, मुलगा आणि मुलगी कित्येक दिवसांपासून वडिलांच्या प्रतीक्षेत होते, मात्र दुर्दैवाने त्यांच्या हौतात्म्याचे वृत्त धडकले. १५ जूनच्या रात्री भारत-चीन सीमेवर गॅल्वान खोऱ्यात झालेल्या दोन्ही सैन्यांमध्ये झालेल्या हिंसक झडपेत २० भारतीय जवान शहीद झाले आहेत.