‘बॉयकॉट चायना’चा नारा देणारे सोनम वांगचुक!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    11-Jun-2020   
Total Views |
Sonam Wangchuk_1 &nb




आमीर खानच्या ’थ्री इडियट्स’ चित्रपटामुळे प्रसिद्धीझोतात आलेले सोनम वांगचुक त्यांच्या ‘बॉयकॉट चायना’ घोषणेमुळे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. त्यांच्याविषयी...



“चिनी मालावर बहिष्कार टाका, भारतातल्या कारखान्यांमध्ये तयार झालेल्या जास्तीत जास्त वस्तू वापरा. चिनी स्वतःचा माल विकून मिळणारा पैसा भारताविरोधात सैन्याची ताकद वाढवण्यासाठी वापरतात,” असा संदेश सोनम वांगचुक यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून समस्त भारतवासीयांना दिला आणि आणि अनेकांनी त्यांना आपला पाठिंबा दर्शविला. त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत, अनेकांनी चिनी वस्तूंवर बहिष्कार घातला. काही जणांनी मोबाईलमधील अनेक चिनी अॅपप्स काढून टाकले. ‘बॉयकॉट चायना’ या त्यांच्या मोहिमेला संपूर्ण भारतीयांनी प्रतिसाद दिला आणि त्यामुळे सोनम वांगचुक हे पुन्हा एकदा प्रसिद्धी झोतात आले आहेत.


लेह जिल्ह्यातील अलचीमधील एका गावात जन्मलेल्या सोनम वांगचुक यांना प्रदेशात शाळेची सोय नसल्याने वयाच्या नवव्या वर्षांपर्यंत शिक्षण घेता आले नव्हते. त्याचवेळी त्यांनी भविष्यात मुलांच्या शिक्षणाची सोय इथेच करायची, असा निर्धार मनाशी पक्का केला. सोनम यांच्या खेडेगावात शाळा नसल्याने आईच त्यांची शिक्षक. वयाच्या नवव्या वर्षांपर्यंत ते मातृभाषेतून शिकले. पुढे शिक्षणासाठी श्रीनगरला गेल्यानंतर त्यांना भाषेच्या अडचणी जाणवू लागल्या. शिक्षणात भाषेचा अडथळा निर्माण झाल्याने त्यांनी दिल्लीच्या केंद्रीय विद्यालयात प्रवेश घेतला. लडाखच्या इतर मुलांवर परकीय भाषा लादली जात असताना, भलत्याच भाषेतून शिकण्याच्या शिक्षेतून वांगचुक मुक्त झाले.

१९८७ मध्ये त्यांनी श्रीनगरमधील ‘नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी’ या संस्थेतून मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये बी. टेक पदवी घेतली. नंतर दोन वर्षे फ्रान्समध्ये जाऊन मातीच्या बांधकामांचे धडे ‘क्राटेरे स्कूल ऑफ आर्किटेक्चर’ या संस्थेतून घेतले. बालपणी केलेला निर्धार पूर्ण करण्यासाठी वांगचुक यांनी त्यांचे भाऊ व इतर पाच जणांसमवेत १९८८ मध्ये ‘एज्युकेशनल अॅ्ण्ड कल्चरल मूव्हमेंट ऑफ लडाख’ ही संस्था सुरू केली. विद्यापीठातील शिक्षण संपल्यानंतर विद्यार्थी खेड्यातील मुलांना शिकवायला येऊ लागले. भाषेच्या अडचणीमुळे ९५ टक्के लडाखी मुले परीक्षांमध्ये नापास होत असत, ती त्यांच्या या उपक्रमामुळे उत्तीर्ण होऊ लागली.


१९९४ पासून वांगचुक यांनी ‘ऑपरेशन न्यू होप’ हा शैक्षणिक कार्यक्रम राबवला. शिक्षण क्षेत्रात सुधारणा घडवून आणण्यासाठी त्यांनी लेहपासून १३ किमीवर शाळा सुरु केली. या शाळेत मुलांच्या बुद्धीला चालना देत शक्य तेवढे नवीन शोध लावण्याचा प्रयत्न केला जातो. या शाळांमध्ये विद्युत उर्जेचा जराही वापर केला जात नाही. सौरशक्तीवर चालणाऱ्या शाळा वांगचुक यांनी पर्यावरणस्नेही पद्धतीने तयार केल्या. उणे तीस अंश सेल्सिअस तापमानात लडाख, नेपाळ व सिक्कीममध्ये त्यांनी सुरू केलेल्या शाळा उबदार राहू लागल्या. २००५ मध्ये वांगचुक यांची मनुष्यबळ विकास मंत्रालयाने राष्ट्रीय प्राथमिक शिक्षण मंडळावर निवड केली. वांगचुक यांनी ‘आइस स्तुपा’ नावाची कृत्रिम हिमनदीही तयार केली आहे. त्यात हिवाळ्यात पाण्याचे प्रवाह बर्फाच्या स्वरूपात गोठतात व उन्हाळ्यात वितळतात, त्यातून शेतीला पाणी मिळते. लडाखमध्ये त्यांनी २०१६ मध्ये ‘फार्मस्टे लडाख’ हा कार्यक्रम सुरू केला. त्यात पर्यटक लडाखमधील स्थानिक कुटुंबांबरोबर जीवन शिक्षण घेत राहतात.

पेशाने अभियंता असणार्याल सोनम यांनी नेहमीच स्वदेशीचा आग्रह धरला. मग त्या वस्तू असो वा भाषा! वेळोवेळी ते या सर्व बाबतीत आग्रही राहिले. कोरोनाकाळात चीनच्या भूमिकेवर सगळ्याच देशांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. एकीकडे कोरोनाचे संकट देशावर घोंगावत होते, तर दुसरीकडे चिनी सैन्य लडाखच्या सीमेवरून भारतात घुसखोरी करत होते. देशभरातून यावर संताप व्यक्त केला जात होता. त्याचवेळी सोनम वांगचुक यांनी यासंदर्भात विश्लेषण करणारा एका व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसिद्ध केला.


स्वदेशीचा आग्रह धरत, ‘बॉयकॉट चीन’ म्हणत त्यांनी चीनच्या उत्पादनांवर बहिष्कार घालण्याची मोहीम सुरू केली. चीनला धडा शिकवण्यासाठी आणि त्यांची आर्थिक परिस्थिती कमकुवत करण्यासाठी त्यांनी ही मोहीम सुरू केली. चिनी उत्पादनांवर बहिष्कार टाकला तर आपल्या देशाची अर्थव्यवस्था उच्चस्तरावर नेण्यास, तसेच नवीन उद्योग-कंपन्याना भारतात आणून इथे रोजगार निर्मिती करण्यास खूप मोठा हातभार लागेल, हे त्यांनी सर्वसामान्यांना पटवून दिले.त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत अनेकांनी चिनी वस्तूंचा वापर बंद करायला सुरुवात केली. काही जणांनी मोबाईलमधील अनेक चिनी अॅेप्स काढून टाकली. बिथरलेल्या चीनने आपला संताप ‘ग्लोबल टाईम्स’मधून जाहीर केला. लडाखमधील एखाद्या व्यक्तीचा उल्लेख करुन ‘ग्लोबल टाईम्स’ने लेख छापण्याची ही पहिलीच वेळ आहे.


सोनम वांगचुक यांना २०१६ मध्ये सामाजिक उद्योजकतेसाठी प्रतिष्ठेचा ‘रोलेक्स पुरस्कार’ मिळाला. त्याचबरोबर त्यांना २०१७ मध्ये ‘ग्लोबल अवार्ड फॉर सस्टेनेबल आर्कीटेक्चर’, २०१८ मध्ये ‘रॅमन मॅगेसेसे’ या मानाच्या पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे.


स्वदेशीचा आग्रह धरत, देशासाठी सतत काम करणाऱ्या लडाख सुपुत्र सोनम वांगचुक यांना दै. ‘मुंबई तरुण भारत’चा मानाचा सलाम!



@@AUTHORINFO_V1@@