‘वेदा निलायम’चे स्मारकात रुपांतर होणार का?

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    01-Jun-2020   
Total Views |

vicharvimarsh_1 &nbs



२०१९मध्ये चेन्नईच्या जिल्हाधिकार्‍यांनी या स्मारकास हिरवा कंदील दिल्याने त्या वास्तूचे स्मारकात रुपांतर करण्याच्या दिशेने पावले टाकण्यात आली. पण, मद्रास उच्च न्यायालयाने जयललिता यांच्या दोन भाचरांच्या बाजूने अनुकूल असा निकाल दिल्याने या स्मारकाबद्दल सध्या तरी अनिश्चिततेचे वातावरण आहे.



देशातील अन्य राज्यांप्रमाणेच तामिळनाडू राज्यामध्येही कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाल्याने त्या राज्यातही अनेक उपाययोजना केल्या जात आहेत. शेकडो नवीन रुग्ण आढळून येत असल्याने त्या राज्यातील ‘लॉकडाऊन’ काही सवलती देऊन येत्या ३०जूनपर्यंत कायम ठेवण्यात येणार आहे. कोरोनाच्या संकटावर मात करण्याचा प्रयत्न सुरु असतानाच दुसरीकडे तामिळनाडू सरकारने दिवंगत मुख्यमंत्री जयललिता यांचे ‘पॉईस गार्डन’ या उच्चभ्रू वस्तीत असलेली ‘वेदा निलायम’ ही सुप्रसिद्ध वास्तू स्मारकासाठी ताब्यात घेण्याची प्रक्रिया गेल्या महिन्याच्या प्रारंभी सुरु केली. अण्णाद्रमुक पक्षाच्या सर्वेसर्वा असलेल्या जयललिता यांच्या निवासस्थानाचे स्मारकामध्ये रुपांतर व्हावे, अशी जयललिता यांच्या अनेक अनुयायांची इच्छा आहे. पण, या मालमत्तेचा वाद सध्या न्यायालयात गेला असल्याने या वास्तूचे स्मारकात रुपांतर होणार की नाही, याचे चित्र अद्याप स्पष्ट झालेले नाही.


स्मारक होणार की नाही, अशी शंका येण्यास तसे सबळ कारणही आहे. अम्मा उर्फ जयललिता यांचे निवासस्थान ‘स्मारक’ म्हणून रुपांतरित करण्यासाठी तामिळनाडू सरकारने एक वटहुकूमही जारी केला आहे. पण, दिवंगत जयललिता यांच्या दोन भाचरांनी या मालमत्तेचे वारसदार आपणच असल्याचा दावा करून न्यायालयात धाव घेतली. मद्रास उच्च न्यायालयाने अलीकडील आपल्या अंतिम आदेशामध्ये कायदेशीर वारसदारासंदर्भात काही स्पष्टीकरण केल्याने जयललिता यांच्या भाचरांना हा एकप्रकारे आपला विजय झाला असल्याचे वाटत आहे. जयललिता यांचा दिवंगत भाऊ जयकुमार यांची दोन मुले दीपा आणि दीपक यांनी, आपल्या आत्याच्या मालमत्तेचे आपण वारसदार असल्याचे सांगून न्यायालयाचे दरवाजे ठोठावले आहेत. मद्रास उच्च न्यायालयाने गेल्या शुक्रवारी जो आदेश दिला तो लक्षात घेऊन, हा आदेश म्हणजे आमचा विजय असल्याचे दीपा यांनी म्हटले आहे. “हा खटला आम्ही बहीण-भाऊ एकत्रित लढवीत आहोत. आता आम्ही तामिळनाडू सरकारने जो वटहुकूम काढला आहे त्यास आम्ही आव्हान देणार आहोत,” असेही दीपा यांनी स्पष्ट केले आहे. जयललिता यांच्या मालमत्तेचा ताबा कोणाकडे आहे, हे आम्हास माहीत नाही. पण, आता आम्ही त्या संदर्भातील कागदपत्रांची तपासणी करणार आहोत. पण, काही झाले तरी आम्ही ही मालमता सरकारला ताब्यात घेऊ देणार नाही, असेही दीपा यांनी सांगितले आहे. मद्रास उच्च न्यायालयाने दीपा आणि दीपक यांना जयललिता यांचे ‘कायदेशीर वारसदार’ घोषित केल्याने या दोघा बहीणभावांना हुरूप आला असून, आता आपल्या आत्याची मालमत्ता आपणास मिळणार, असे त्यांना वाटू लागले आहे.




पण, जयललिता या इस्पितळात आजारी असताना त्यांच्या या भाचीला आत्याची भेट घेऊ देण्यास प्रतिबंध करण्यात आला होता. भाचा दीपक इस्पितळात जाऊ शकत होता, पण त्याच्या बहिणीला मात्र अनुमती देण्यात आली नव्हती. जयललिता यांची उत्तराधिकारी म्हणून शशिकला यांचे नाव घेतले जात होते. पण, बेहिशोबी मालमत्तेचा संचय केल्यासंदर्भातील खटल्यामध्ये शशिकला दोषी ठरल्याने त्या सध्या बंगळुरूच्या कारागृहात आहेत. शशिकला यांची ऑक्टोबर २०२०मध्ये कारागृहातून सुटका होण्याची शक्यता आहे. त्यानंतर जयललिता यांच्या मालमत्तेच्या वादाला आणखी फाटे फुटण्याची शक्यता नाकारता येत नाही. जयललिता यांची नेमकी मालमत्ता किती होती? जयललिता यांच्याविरुद्ध बेहिशोबी मालमत्ता जमा केल्यासंदर्भात जो खटला सुरु होता, त्यामध्ये जी प्रतिज्ञापत्रे सादर करण्यात आली ती लक्षात घेता, त्यांची मालमत्ता सुमारे एक हजार कोटी असल्याचे सांगण्यात येते. या संपत्तीमध्ये स्थावर आणि जंगम अशा दोन्ही मालमत्तांचा अंतर्भाव आहे. या बेहिशोबी संपत्तीप्रकरणी जयललिता यांनाही त्यांच्या मृत्युपश्चात दोषी ठरविण्यात आले होते. जयललिता यांची मालमत्ता एक हजार कोटी रुपयांची असली तरी दीपा आणि दीपक यांच्या हाती केवळ १८० कोटी रुपयांच्या मालमत्तेचीच प्रतिज्ञापत्रे आहेत.


एकीकडे, जयललिता यांची संपत्ती त्यांचे ‘कायदेशीर वारसदार’ दीपा आणि दीपक यांना मिळणार, अशी चर्चा होत असताना, अण्णाद्रमुकमधील एका गटास, जयललिता यांची मालमत्ता शशिकला यांच्या कुटुंबीयांकडे जाईल, अशी भीती वाटत आहे. जयललिता यांच्या निधनानंतर शशिकला या अण्णाद्रमुकच्या सरचिटणीस म्हणून काम पाहत होत्या. पक्षाची सूत्रे त्यांच्या हाती होती. पण, त्यानंतर काही काळातच त्यांची कारावासात रवानगी झाली आणि त्यामुळे त्यांची पक्षावरील पक्कड सुटली. पण, येत्या ऑक्टोबरमध्ये त्या सुटून परत आल्यावर त्यांच्यामागे पक्षातील किती लोक उभे राहतात, त्यावर त्यांचे पक्षातील स्थान ठरणार आहे. पण, ती ‘दूर की बात’ झाली! सध्या दीपा आणि दीपक यांनी आपल्या आत्याच्या संपत्तीवर हक्क सांगितला आहे. जयललिता ज्या ‘वेदा निलायम’मध्ये राहत होत्या, त्या निवासस्थानास जयललिता यांच्या मातोश्री ‘वेदावल्ली’ यांच्या नावावरून ‘वेदा निलायम’ असे नाव देण्यात आले होते. जयललिता यांच्या अभिनेत्री आईने १९६७ साली सदर वास्तू १.३० लाख रुपयांना खरेदी केली होती, असे सांगण्यात येते. जयललिता यांचे ‘८१, पाईस गार्डन’ या उच्चभ्रू वस्तीतील निवासस्थान हे सत्ताकेंद्र बनले होते. ‘वेदा निलायम’ हे आपले सरकारी निवासस्थान म्हणून त्यांनी रुपांतरीत केले होते. राज्यातीलच नव्हे, तर राष्ट्रीय पातळीवरील अनेक नेत्यांची जयललिता यांच्या या निवासस्थानी वर्दळ असे. जयललिता यांच्या अभिनेत्री आईचे नाव संध्या होते. पण, त्यांचे जन्मनाव ‘वेदावल्ली’ असे होते. त्यामुळे या वास्तूला ‘वेदा निलायम’ असे नाव देण्यात आले. मध्यवर्ती वस्तीमध्ये ते निवासस्थान असले तरी, या निवासस्थानी उटी किंवा कोडइकॅनाल येथे असल्याचा भास येथे होतो, असे स्वत: जयललिता यांनीच एका तामिळ नियतकालिकास दिलेल्या मुलाखतीत म्हटले होते.



तामिळनाडूचे मुख्यमंत्री इ. के. पलानीस्वामी यांनी, जयललिता यांच्या ‘वेदा निलायम’ या वास्तूचे स्मारकात रुपांतर केले जाईल, असे घोषित केले होते, तर चेन्नई येथे जयललिता यांचे सुमारे ५१कोटी रुपये खर्चून स्मारक उभारण्यात येणार असल्याची घोषणा राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांनी आपल्या अभिभाषणात केली होती. २०१९मध्ये चेन्नईच्या जिल्हाधिकार्‍यांनी या स्मारकास हिरवा कंदील दिल्याने त्या वास्तूचे स्मारकात रुपांतर करण्याच्या दिशेने पावले टाकण्यात आली. पण, मद्रास उच्च न्यायालयाने जयललिता यांच्या दोन भाचरांच्या बाजूने अनुकूल असा निकाल दिल्याने या स्मारकाबद्दल सध्या तरी अनिश्चिततेचे वातावरण आहे. सरकारने वटहुकूम काढला असला तरी त्यास आव्हान देण्याचे दीपा आणि दीपक यांनी ठरविले आहे. त्यामुळे सध्या तरी हे स्मारक लांबणीवर पडण्याची चिन्हे आहेत. तामिळनाडूच्या राजकारणाचे कित्येक दशके सत्ताकेंद्र असलेले हे निवासस्थान स्मारक म्हणून अस्तित्वात येणार की, ही सर्व संपत्ती जयललिता यांच्या कायदेशीर वारसदारांच्या हातात जाणार, हे काही काळ गेल्यानंतरच स्पष्ट होणार आहे!


@@AUTHORINFO_V1@@