शिखर नंदा देवी आणि हेरगिरी (भाग-२)

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

Total Views |
9-1506516034_1  



 
उपकरण तिथेच व्यवस्थित बर्फात पुरून झाकून ठेवायचं आणि पायथ्याकडे सुटायचं. आम्ही त्याप्रमाणे केलं. मोहीम आवरली. १९६६च्या मे महिन्यात आम्ही परत तिथे पोहोचलो आणि आश्चर्याने थक्क होऊन पाहत राहिलो. १२० किलो वजनाचं उपकरण चक्क गायब झालं होतं.




कॅप्टन मोहनसिंग कोहली आज ८९ वर्षांचे आहेत. काराकोरम पर्वतरांगेच्या पायथ्याशी नि सिंधू नदीच्या काठावर असलेलं हरिपूर हे त्यांचं मूळ गाव. वयाच्या १६व्या वर्षी मोहनसिंग आणि त्यांच्या कुटुंबातली काही माणसं कशीबशी जीव वाचवून दिल्लीत आली. कारण, हरिपूर पाकिस्तानात गेलं. मोहनसिंगच्या डोळ्यांसमोर किमान दोन हजार हिंदू आणि शिखांना ठार मारण्यात आलं.


हा भूतकाळ मागे टाकून मोहनसिंग भारतीय नौदलात भरती झाले. इंग्रजांच्या काळातल्या भारतीय नौदलात खेळ वगैरे प्रकारच नव्हते. ते एक व्यावसायिक नौदल सैन्य होतं, एवढंच. मोहनसिंग कोहली या तरुण अधिकार्‍याने नौदल उच्चाधिकार्‍यांना पटवून नौदल सैनिकांसाठी विविध साहसी खेळ सुरू केले. यात पाण्यावरचे खेळ होतेच, पण गिर्यारोहणसुद्धा होतं. त्यामुळे नौदल चमूला सोबत घेऊन जेव्हा मोेहनसिंगांनी ‘ससेर कांगडी’ हे हिमालयातलं २५,१७० फूट उंचीचं शिखर सर केलं, तेव्हा जाणत्या मंडळींना खूप गंमत वाटली. अरेच्चा! या दर्यावर्दी लोकांचं डोंगरावर काय काम? ते १९५६ साल होतं आणि मोहनसिंग ऐन पंचविशीत होते.


यानंतर त्यांनी नंदा देवी शिखराच्या परिसरातली ‘नंदा कोट’ (२२,५१० फूट) आणि ‘अन्नपूर्णा-२’ (२४,७८७ फूट) ही शिखरंदेखील सर केली. १९६२ साली एव्हरेस्टवर भारतीय लष्करातर्फे झालेल्या मोहिमेतही ते सहभागी होते. ही मोहीम अयशस्वी झाली. एव्हरेस्टच्या वाटेवर २७,६५० फूट उंचीवर त्यांना अत्यंत भीषण अशा हिमवादळाने गाठलं. तीन रात्री त्यांना कसलीही हालचाल करता आली नाही. यापैकी दोन रात्री तर ऑक्सिजन नळकांडीही संपली होती. भारतीय पथक जीव बचावून आणि मोलाचा अनुभव गाठी बांधून परतलं.

आता १९६२चा हिमालयीन मोहिमांचा मोसम संपला आणि एक थारेपालटी घटना घडली. २० ऑक्टोबर १९६२ या दिवशी चीनने भारताच्या ‘नेफा’ (नॉर्थ ईस्ट फ्रंटियर एरिया) प्रदेशावर म्हणजे आताच्या अरुणाचल प्रदेशावर प्रचंड लष्करी आक्रमण केलं. संपूर्ण देश खडबडून जागा झाला. घटनाचक्र अत्यंत वेगानं फिरू लागलं. २४ ऑक्टोबर १९६२ या दिवशी ‘इंडो-तिबेटन बॉर्डर पोलीस’ या नावाचं एक केंद्रीय राखीव पोलीस दल उभं करण्यात आलं. ‘इंटेलिजन्स ब्युरो’ उर्फ ‘आय.बी.’ म्हणजेच गुप्तचर खात्यातले एक उच्चाधिकारी बलबीरसिंग यांना ‘इन्स्पेक्टर जनरल’ (आय.जी.)चा हुद्दा देऊन या दलाचं प्रमुख नेमण्यात आलं. पश्चिमेला लद्दाखमधली काराकोरम खिंड ते पूर्वेला नेफामधली ‘दिफू ला’ (ला म्हणजे खिंडच) एवढी ३४८८ किमीची उत्तर सीमा अखंड सुरक्षित ठेवणं, हे या दलाचं काम ठरवण्यात आलं.

साहजिकच तीनही सैन्यदलं आणि विविध पोलीस दलांमधले पर्वतीय प्रदेशाची उत्तम माहिती असणारे लोक उचलून या दलात आणण्यात आले. त्यातच कॅप्टन मोहनसिंगही आले. योग्य माणूस योग्य ठिकाणी आला. चीनबरोबरचं युद्ध महिन्याभरात आटोपलं. पण, पराभवाचा फटका खाऊन जागे झालेल्या राजकारण्यांनी सैन्यदलं आणि सुरक्षादलं यांचं पूर्ण अत्याधुनिकीकरण सुरू केलं. इंडो-तिबेटन बॉर्डर पोलीसतर्फे ३४८८ किमीच्या उत्तर सीमेवर ठिकठिकाणी चेक पोस्ट्स उभी करतानाच कॅप्टन कोहलींनी इथेही गिर्यारोहण मोहिमा सुरू केल्या.

१९६५मध्ये एव्हरेस्ट जिंकून परतल्यावर त्यांना गुप्तचर अधिकारी रामेश्वरनाथ काव भेटले, हा भाग अगोदरच्या लेखात आलाच आहे. त्याबद्दल बोलताना स्वतः कॅप्टन कोहली किंचित वेगळी माहिती देतात. ते सांगतात, “१९६५च्या एप्रिल-मेमध्ये मी एव्हरेस्ट मोहिमेच्या पूर्वतयारीत पार बुडून गेलो होतो. अशा वेळी बॅरी बिशप हा अमेरिकन गिर्यारोहक मला भेटायला आला. बिशप हा सुप्रसिद्ध नॅशनल जिओग्राफिक सोसायटीचा छायाचित्रकार होता. शिवाय तो उत्तम गिर्यारोहक होताच. १९६३ साली एका अमेरिकन तुकडीने एव्हरेस्टवर जाण्याचा अयशस्वी प्रयत्न केला होता. त्यात बिशप होता.


बॅरी बिशप मला म्हणाला, ’‘तू माझ्याबरोबर सिक्कीममधल्या झेमू ग्लेशियरवर चल.” मी म्हटलं, “शक्यच नाही. मी एव्हरेस्टवर निघतोय. तू दुसर्‍या कुणाला ने.” बिशप निघून गेला. पण, मला या प्रस्तावात काहीतरी गडबड असल्याचा संशय आला. म्हणून मी सरळ ‘इंटेलिजन्स ब्यूरो’चे प्रमुख भोलानाथ मल्लिक यांना गाठलं आणि सगळा प्रकार त्यांना सांगितला. मग ठरल्याप्रमाणे मी एव्हरेस्ट मोहिमेवर निघून गेलो. २० मे १९६५ रोजी पहिला भारतीय गिर्यारोहक लेफ्टनंट कर्नल अवतारसिंग चीमा याने एव्हरेस्टवर पाय ठेवला.”


“जून १९६५मध्ये आम्ही दिल्लीत परतलो,” कॅप्टन कोहली पुढे म्हणतात, “तेव्हा रामेश्वरनाथ कावनी आमच्या समोर प्रस्ताव नाही ठेवला, तो लष्करी आदेश होता. तुमचे सगळे कागदपत्र, तिकिटं तयार आहेत. आठवडाभर एव्हरेस्टवीर म्हणून काय सत्कार-बित्कार करायचे ते करून घ्या नि मग अमेरिकेकडे सुटा,” काव म्हणाले, “मी लष्करी पद्धतीनुसार ‘आय आय सर’ म्हटलं.” वरिष्ठांच्या आदेशाला ‘येस सर’ म्हणण्याऐवजी ‘आय आय सर’ असं उत्तर देण्याची पद्धत मुख्यतः ब्रिटिश नौदलात आहे. पण, इतरही सेना दलात ती वापरली जाते. ब्रिटिशांमुळे भारतीय सैन्यदलांमध्येही ती पद्धत रूढ झाली.


जून १९६५मध्येच आम्ही अमेरिकेत वॉशिंग्टन प्रांतात सिऍटलला नि तिथून पुढे अलास्का प्रांतात गेलो. उत्तर अमेरिकेतलं अलास्कन पर्वत रांगेतलं सर्वोच्च शिखर ‘माऊंट मॅक्किनले’ (६१४० मीटर्स किंवा २०,१४६ फूट) तिथे आहे. आता त्या शिखराला ‘माऊंट देनाली’ म्हणतात. तिथे मला आमच्यासोबत येणार्‍या अमेरिकन पथकाचा प्रमुख रॉबर्ट उर्फ बॉब शाल्लर भेटला. त्याने मला एक जड उपकरण दाखवलं आणि तो म्हणाला की, ही मूळ यंत्राची प्रतिकृती आहे. आपण ‘माऊंट मॅक्किनले’वर हे उपकरण चढवून, अ‍ॅसेंबल करून, कार्यान्वित करण्याचा सराव करणार आहेत आणि मग आपल्याला ते नंदा देवीवर न्यायचंय.


चार भागातलं ते जड यंत्र २१ हजार फूट उंचीवर वाहून न्यायचं? मी थक्कच झालो. मग मला सगळी कथा कळली. अमेरिकन वायुदलाचा चीफ ऑफ स्टाफ एअर मार्शल कर्टिस ल मे आणि छायाचित्रकार बॅरी बिशप यांच्या सुपीक डोक्यातून कल्पना निघाली की, चीनने झिजियांग प्रांतात उभारलेल्या अणुचाचणी प्रकल्पावर नजर ठेवण्यासाठी हिमालयाच्या एखाद्या शिखरावर एक अत्यंत संवेदनशील उपकरण बसवायचं. या उपकरणाद्वारे चीनचे नेमके काय उद्योग चाललेत, हे अमेरिकेला कळू शकेल. या गुप्त प्रकल्पाला राष्ट्राध्यक्ष लिंडन जॉन्सन यांच्याकडून होकार मिळाल्यावर, उच्च राजनैतिक वर्तुळात हालचाली सुरू झाल्या. अमेरिकन गुप्तचर खातं सीआयएची माणसं ते ‘हायली सेन्सेटिव्ह’ उपकरण हिमालयातल्या शिखरावर उभारतील. त्यांना तिथवर नेण्याचं काम भारतीय गुप्तचर खातं ‘आयबी’ने करायचं, असं ठरलं. त्यानुसारच बॅरी बिशप मला भेटायला आला होता. म्हणजे भोलानाथ मल्लिक यांनीच त्याला माझ्याकडे पाठवलं होतं. पण, त्यावेळी मला यातलं काहीही माहिती नव्हतं.


आम्ही आवश्यक तो सराव करून अलास्काहून परतलो.” कॅप्टन कोहली पुढे म्हणतात, “ऑगस्ट १९६५मध्ये सीआयएचं पथकही भारतात आलं. त्यांची नावं, पत्रे, व्यवसाय सगळं पूर्णपणे बदलण्यात आलं होतं आणि १ सप्टेंबर १९६५ या दिवशी पाकिस्तानने भारतावर आक्रमण केलं. अधिकृतपणे युद्ध सुरू झालं. आम्हाला सांगण्यात आलं, तुम्ही इतर कशाहीकडे लक्ष न देता मोहिमेवर निघा. आम्ही निघालो.

 
चमोली जिल्ह्यात गौचार इथल्या दुसर्‍या महायुद्ध काळातल्या एका धावपट्टीवर उतरून आम्ही नंदा देवीच्या पायथ्याकडे निघालो, तेव्हा तिकडे काश्मीर आणि पंजाबमध्ये रणांगण धगधगलं होतं. आमची चढाई सुरू झाली.” कोहली पुढे म्हणतात, “२५,६४३ फूट उंचीच्या नंदा देवीच्या माथ्यावर पोहोचायचं आणि चार सुट्या भागांमधलं ते जवळपास १२० किलो वजनाचं उपकरण नीट ‘अ‍ॅसेंबल’ करून, उभं करून, कार्यान्वित करायचं, या कामातली मुख्य अडचण म्हणजे विरळ हवेत ज्याप्रमाणे तुम्हाला श्वास घ्यायला अडचण पडते, तसंच तुम्ही नीट विचार पण करू शकत नाही.
 


आम्ही ७,२३९ मीटर्स म्हणजे ‘कॅम्प-४’ या ठिकाणी पोहोेचलो आणि एका भीषण हिमवादळाने आम्हाला गाठलं. चूक निसर्गाची नव्हती, आमची होती. सप्टेंबर महिना हा हिमालयन मोहीम काढण्याचा काळच नव्हे. खरं म्हणजे शिखराचा माथा आता अगदी नजरेच्या टप्प्यात होता. पण, वादळ थांबायलाच तयार नव्हतं. शेवटी पथकप्रमुख म्हणून मी निर्णय घेतला, उपकरण तिथेच व्यवस्थित बर्फात पुरून झाकून ठेवायचं आणि पायथ्याकडे सुटायचं. आम्ही त्याप्रमाणे केलं. मोहीम आवरली. १९६६च्या मे महिन्यात आम्ही परत तिथे पोहोचलो आणि आश्चर्याने थक्क होऊन पाहत राहिलो. १२० किलो वजनाचं उपकरण चक्क गायब झालं होतं.”


 
त्यानंतर आजपर्यंत उपकरण शोधण्यासाठी बर्‍याच मोहिमा झाल्या. पण, अगदी आजतागायत उपकरण मिळालेलं नाही. यातला भारताच्या दृष्टीनं काळजीचा भाग म्हणजे उपकरणाच्या बॅटरीसाठी वापरलेलं उच्च दर्जाचं प्लुटोनियम जर बाहेर पडलं तर ऋषिगंगा नदीच्या पाण्यात अत्यंत घातक असं प्रदूषण होईल. सीआयएने म्हणजेच अमेरिकेने उपकरणाचा शोध घेणं थांबवलं. कारण, १९६६पासून पुढे ‘नासा’चा अंतराळात उपग्रह पाठवण्याचा कार्यक्रम एकदम जोरात सुरू झाला. अमेरिकेला हिमालयात उपकरण बसवून चीनच्या अणुविकास कार्यक्रमावर नजर ठेवायची होती. ते काम आता उपग्रह अधिक चांगलं करू लागले. त्यामुळे उपकरणाची गरजच संपली.



काही अमेरिकन पत्रकारांना मात्र असा पक्का संशय आहे की, भारताने मे १९६६ पूर्वी दुसरं पथक पाठवून ते उपकरण गुपचूप खाली आणलं आणि आपल्या अणुशास्त्रज्ञांकडे सोपवलं. त्यांच्या मते, रामेश्वरनाथ काव फार वस्ताद माणूस होता. त्यानेच ही कारवाई केलेली असणं शक्य आहे.










ms-kohli2 (1)_1 &nbs
@@AUTHORINFO_V1@@