गुंतवणूक म्हटली की, जोखीम ही आलीच! शासनाच्या गुंतवणूक योजनांमध्ये गुंतवणूक केली, तरी त्यातही अल्पशी जोखीम असतेच. कर्ज देताना, कर्ज देणारी संस्थाही जोखीम घेतच असते. सध्या गुंतवणूक करण्यासाठी गुंतवणूकदारांकडे बरेच पर्याय उपलब्ध आहेत. तेव्हा, या कोरोना काळात आणि नंतरही कुठे गुंतवणूक करावी आणि कुठल्या पर्यायांपासून दूर राहावे, याचे मार्गदर्शन करणारा हा लेख....
आपल्या देशाची अर्थव्यवस्था अगोदरच अंथरूण धरून होती. त्यात आता या प्रदीर्घ कोरोनाची भर पडली. त्यामुळे माणसांप्रमाणे अर्थव्यवस्थाही ‘क्वारंटाईन’मध्ये गेली आहे. जगातल्या बर्याच प्रगत देशांमध्ये आणि आर्थिक व्यापाराचे केंद्र असलेल्या अमेरिकेसारख्या देशातही कोरोनाचा कहर संपायचे नाव घेताना दिसत नाही. त्यामुळे प्रत्येक देशाचेच अर्थव्यवस्था सावरण्यासाठी आता विलगीकरण झालेले आहे. म्हणजे प्रत्येक देशच ‘क्वारंटाईन’मध्ये गेला आहे. या महामारीची झळ देशातल्या प्रत्येक माणसाला बसली आहे. प्रत्येक माणूस राज्य व केंद्र शासनाकडून सध्या मदतीची अपेक्षा करतो आहे. राज्य सरकारेही केंद्राकडून मदतीच्या प्रतिक्षेत आहेत. केंद्राकडे कुबेराचा खजिना थोडाच आहे, तरीही केंद्र सरकार जनतेचे जीवन जास्ती जास्त सुसह्य व्हावे, म्हणून योग्य निर्णय घेताना दिसते.
तरीही जे सातत्याने गुंतवणूक करतात, त्यांनी सद्यस्थितीत कुठे गुंतवणूक करावी, हा सध्या महत्त्वाचा प्रश्न आहे. कित्येक ज्येष्ठ नागरिक व अन्य काही नागरिकांची गुजराण ही गुंतवणुकीवर चालते. सध्याच्या परिस्थितीत देशाला आर्थिक मंदीतून बाहेर काढण्यासाठी उद्योगांना कमी दराने कर्जे उपलब्ध करून द्यावी लागणार आहेत व बँका कर्जावर कमी व्याजदर आकारू लागल्यावर, साहजिकच त्या बचतीवरही कमी व्याज देतील. सध्या सर्व सार्वजनिक उद्योगातील बँका बचतीवर साडेतीन ते चार टक्के व ठेव मुदतीवर सहा ते साडेसहा टक्के दराने व्याज देतात. गुंतवणुकीत जेवढी जोखीम जास्त, तेवढा परतावा अधिक व जेवढी जोखीम कमी तेवढा परतावा कमी, हा गुंतवणुकीचा नियम आहे. पैसा कुठे गुंतविला जातो, यावर जोखमीचे स्वरूप अवलंबून असते. जादा व्याजदराच्या भूलथापांना बळी पडणारे किंवा शेअर बाजारात झटपट पैसा मिळविण्यासाठी चुकीची गुंतवणूक करून नंतर पश्चाताप करणारी बरीच मंडळी आपण पाहतो. गुंतवणूक म्हटली की, जोखीम ही आलीच! शासनाच्या गुंतवणूक योजनांमध्ये गुंतवणूक केली, तरी त्यातही अल्पशी जोखीम असतेच. कर्ज देताना, कर्ज देणारी संस्थाही जोखीम घेतच असते. सध्या गुंतवणूक करण्यासाठी गुंतवणूकदारांकडे बरेच पर्याय उपलब्ध आहेत.
सध्याच्या कोरोनामुळे आपलीच काय, इतरही सर्व देशांची अर्थव्यवस्था पुढील तीन ते चार वर्षे अतिशय तणावग्रस्त राहणार आहे. नवीन रोजगार उपलब्ध होतीलच याची खात्री नाही. पण, नोकरदारांचे रोजगार टिकले तरी पुष्कळ झाले. परदेशात स्थायिक झालेले कित्येक भारतीय तेथील पाश तोडून परत मायदेशी परतण्याच्या तयारीत आहेत. अशांनाही आता भारतातच रोजगार मिळावा, अशी आशा असणार. कोणतेही सरकार प्रत्येक भारतीयाचे समाधान करू शकत नाही, हे आपण ध्यानात घ्यावे. ‘सबका साथ, लेकिन सबका आनंद नही’ ही वस्तुस्थिती आहे. पण, शासनाची धोरणे ही जास्तीत जास्त लोकांची जीवन सुखी करणारे असावयास हवे आणि आहे, हेही तितकेच खरे! शेअर बाजार, म्युच्युअल फंड, बँकांतील तसेच कंपन्यांतील मुदत ठेव, सोन्यात गुंतवणूक हे सध्या गुंतवणूदारांसमोरील गुंतवणुकीचे काही पर्याय आहेत. सोन्यात सध्या दोन प्रकारे गुंतवणूक करता येते. एक सोने धातुस्वरुपात विकत घेणे व दुसरे म्हणजे सोने बॉण्ड स्वरुपात विकत घेणे. जमीन खरेदी, सदनिकांमध्ये गुंतवणूक, सरकारी योजनांमध्ये गुंतवणूक असे विविध गुंतवणुकीचे पर्याय उपलब्ध आहेत.
शेअर बाजारात काही दिवस फार मोठी पडझड झाली. काही दिवस तो थोडासा सावरलेलाही दिसला. या पार्श्वभूमीवर नवीन गुंतवणूकदारांनी सध्या तरी शेअर बाजारात गुंतवणूक करु नये. अगोदरपासून ज्यांची गुंतवणूक आहे, त्यांनी परिस्थितीचा अंदाज घेऊनच पुढील निर्णय घ्यावेत. म्युच्युअल फंडातही बाजाराशी निगडित फंडात गुंतवणूक करण्यापेक्षा ‘डेट’मध्ये गुंतवणूक करणार्या फंडात गुंतवणूक केल्यास परतावा कमी मिळाला तरी जोखीमही कमी असते. सद्यस्थितीत जास्त जोखीम घेऊ नये आणि कोणत्याही परिस्थितीत गुंतविलेली मूळ रक्कम बुडता कामा नये, याबाबत दक्ष राहावे. बँकांमध्ये गुंतवणूक करताना, सार्वजनिक उद्योगातील बँकांना प्राधान्य द्यावे. व्याज कमी मिळेल, पण जोखीम नाही. कोरोनामुळे पुढची दोन-तीन वर्षे सर्व बँका तोट्यात जाण्याची शक्यता आहे. सोन्याच्या बॉण्ड्समध्ये गुंतवणूक करावी. हे बॉण्ड्स सरकारमार्फत विक्रीस काढले जातात. त्यामुळे जोखीम कमी. साधारणपणे अडीच टक्के दराने व्याजही मिळते. धातूच्या स्वरुपात खरेदी केले, तर व्याज मिळत नाही. कंपन्या चांगल्या असतील, ज्यांचा ट्रॅक रेकॉर्ड चांगला आहे, अशा कंपन्यांत मुदतठेवींत गुंतवणूक करण्यास हरकत नाही. पण, यात जोखीम फार असते. जमीन खरेदीत कटकटी फार असू शकतात. सर्व कायदेशीर बाजू नीट तपासाव्या लागतात. सद्यपरिस्थितीत या गुंतवणुकीपासून लांब राहावे.
सदनिका गुंतवणुकीलाही सध्या उठाव नाही. अगोदरच कित्येक तयार सदनिका विक्री न होता पडून आहेत. म्हणून सध्या तरी यात गुंतवणुकीचा विचार करू नये. सरकारी योजनांत (सर्व प्रकारच्या) डोळे झाकून गुंतवणूक करावी. सरकारलाही सध्या राष्ट्रउभारणीसाठी पैशाची गरज आहे. एक राष्ट्रीय कर्तव्य म्हणून सरकारी योजनांमध्ये गुंतवणूक करावी. परताव्याचा दर हा गुंतवणुकीनुसार बदलतो. काही परताव्यांचे दर निश्चित असतात, ते म्हणजे मुदत ठेवींतील गुंतवणूक. शेअरचे दर शेअर बाजार चालू असताना सतत वर-खाली होत असतात. याला "Volatile markets' म्हणतात. डॉलरचे दरही Volatile असतात. शेअर विकत घेताना किंवा डॉलर विकत घेताना किंवा विकताना, जो दर बाजारात असेल त्या दराने तुम्हाला व्यवहार करावे लागतील. कुठेही गुंतवणूक केली तरी, बाजारातली स्थिती, शासकीय निर्णय, आंतरराष्ट्रीय परिस्थिती, युद्ध किंवा युद्धसदृश परिस्थिती, आर्थिक मंदी, नैसर्गिक कोप, गुंतवणूक स्वीकारणार्या संस्थांच्या पदाधिकार्यांचा भ्रष्टाचार या सर्वांचा परिणाम गुंतवणुकीवर होत असतो.
गुंतवणूक करताना अव्वल असणारी एखादी कंपनी, संस्था किंवा उद्योगगृह तसेच यंत्रणा कालौघात ती अव्वल राहीलच असे नाही. काही कारणांनी ती अडचणीतही येऊ शकेल. सहारा उद्योगात गुंतवणूक केलेले आज हात चोळीत बसले आहेत. बांधकाम उद्योगातील कंपनी डीएसके समूह त्यांच्या फाजील आत्मविश्वासामुळे आज कंपनीचे प्रवर्तक, भागीदार, संचालक गजाआड आहेत व गुंतवणूकदार ज्यांच्यात प्रामुख्याने मराठीभाषिक फार मोठ्या प्रमाणावर आहेत, ते रडत बसले आहेत. त्यामुळे गुंतवणूकदाराने अधिक परताव्याच्या मागे न पळता, सुरक्षित गुंतवणूक करावी हे उत्तम! पैसे एकाच ठिकाणी न गुंतविता ते अनेक ठिकाणी गुंतवावेत. कारण, सर्व गुंतवणुकीचे पर्याय एकाचवेळी अडचणीत येण्याची शक्यता फार कमी असते. व्याज किंवा लाभांश कमी मिळाला तरी चालेल, पण मुद्दल सुरक्षित राहावयास हवी, हा गुंतवणूकदाराचा दृष्टिकोन असावयास हवा. सार्वजनिक उद्योगातील बर्याच बँका, ज्यांचे बुडित कर्जांचे प्रमाण बरेच असल्यामुळे त्या गेली काही आर्थिक वर्षे तोट्यात होत्या. परिणामी, भागधारकांना लाभांश देत नव्हत्या आणि आता तर केंद्र सरकारने फतवा काढून कोरोनामुळे आर्थिक संकट उभे राहिले असल्यामुळे कोणत्याही कंपनीने, बँकांनी, पतसंस्थांनी लाभांश देऊ नये, असे सांगितले आहे.
सहकारी बँकांचे शेअर ज्यांच्याकडे आहेत त्यांनी ते परत करावेत व स्वतःचे पैसे घ्यावेत. या शेअरमुळे अगोदरसारखी करसवलतही मिळत नाही व लाभांशही नाही. मग ही ’Dead Investment' हवी कशाला? एखाद्या गुंतवणुकीबाबत संशय वाटत असेल, तर अशा गुंतवणुकीतील परताव्याचा विचार सोडून देऊन, या गुंतवणुकीतून आपली मुद्दल घेऊन बाहेर पडावे. प्रत्येकाने आपल्या गुंतवणुकीबाबत सदैव दक्ष राहायला हवे.
हलगर्जीपणा नको
हलगर्जीपणे गुंतवणूक करणे हा सर्वात मोठा धोका व जोखीम मानली जाते. मुद्दल व व्याज हे दोन्ही गमावण्याची भीती यात असते. अनेक कंपन्या, खासगी वित्तीय संस्था या कमी दिवसांत जादा व्याज दराची प्रलोभने दाखवितात. गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी नवनवीन योजना जाहीर करतात. याला गुंतवणूकदार भरीस पडतो. परिणामी त्याचे पैसे अडकतात, बुडतात. मार्केटचा व्याजाचा जो ‘ट्रेण्ड’ आहे, त्यातून जर अधिक व्याज देणारी योजना असेल, तर त्यात धोका आहे. हे समजून अशा योजनांमध्ये गुंतवणूक करू नये. अशा योजनांमध्ये बुडालेले पैसे मिळण्यासाठी न्यायालयात दाद मागायलाही बराच पैसा लागतो. कुठेही गुंतवणूक करताना त्या कंपनीचे, पतसंस्थेचे ‘क्रेडिट रेटिंग’ तपासून घ्यावे. कर्जरोख्यांत गुंतवणूक करताना ‘क्रेडिट रेटिंग’ न तपासता गुंतवणूक करू नये. कोणत्याही कंपनीचे शेअर फार घसरले आहेत, कमी किंमतीत मिळत आहेत, म्हणून विकत घेऊ नयेत. अशांत गुंतवणूक करणे ही फार मोठी जोखीम ठरू शकते. शेअर बाजारात गुंतवणूक असणार्यांनी रोजच्या रोज त्यांची गुंतवणूक असलेल्या शेअरच्या किंमतीकडे लक्ष द्यावे. एखाद्या कंपनीचे शेअर सारखे घसरत असतील, तर ती धोक्याची घंटा समजून ते विकून आपले मिळतील तेवढे पैसे घ्यावेत. आपल्याला कधी कधी अकस्मात पैशाची गरज भासू शकते. त्यामुळे आपली काही गुंतवणूक ही सहज ‘लिक्विड’ होणारी हवी.