इसापच्या काळात आजच्या प्रमाणे कोरोना व्हायरस नव्हता. पिसू आपल्या हाताला दिसते, पण कोरोना व्हायरस काही दिसत नाही. असा न दिसणारा हा विषाणू आहे. त्याला समूळ नष्ट करायला पाहिजे. कोरोनाला नष्ट करण्याचे काम आपल्यापैकी प्रत्येकाला करायचे आहे.
एका माणसाला एका पिसूने चावून चावून हैराण केले. त्याने आपल्या कपड्यात लपलेली पिसू शोधून काढली. आता आपण काही वाचत नाही, हे तिच्या लक्षात आले. ती म्हणते, “मालक, मला सोडून द्या. मी तर तुमच्या दृष्टीने अगदीच लहान जीव आहे. ”
माणूस म्हणतो, “तू लहान जरुर आहेस, पण उपद्रव देण्याची तुझी शक्ती फारच मोठी आहे. तुला जीवंत ठेवल्यास तू मला सुखाने जगू देणार नाहीस.” असे म्हणून तो तिला मारुन टाकतो.
इसाप सांगतो की, शत्रू लहान आहे, दयेची भीक मागतो आहे, म्हणून त्याला सोडून देऊ नये. आज लहान दिसत असला तरी त्याची उपद्रव देण्याची शक्ती खूप मोठी असते. म्हणून त्याला ठार मारणेच केव्हाही चांगले.
राजनीतीच्या ज्या मोजक्या इसापकथा आहेत, त्यातील ही एक कथा आहे. राजनीतिशास्त्रावर शेकडो पुस्तके आहेत. युद्धशास्त्रावरही तेवढीच पुस्तके आहेत. युद्धशास्त्रावरील चिनी सेनापती ’सनल्झ्यू’ याचे ’दी आर्ट ऑफ वॉर’ हे पुस्तक मौलिक समजण्यात येते.
तो म्हणतो, जर तुम्ही आपली शक्ती कशात आहे आणि शत्रूची शक्ती कशात, हे उत्तम जाणत असाल, तर शेकडो लढायांतही तुम्ही पराभव पत्करणार नाहीत. पण, जर तुम्ही फक्त स्वत:लाच जाणत असाल तर, एक लढाई तुम्ही जिंकाल दुसरी हराल आणि जर तुम्हाला तुमची आणि शत्रूचीही शक्तीस्थाने माहीतच नसतील, तर सर्व लढाया तुम्ही हराल. यासाठी शत्रू लहान की मोठा, यापेक्षा त्याची उपद्रवक्षमता किती आहे, याचाच विचार केला पाहिजे.
आर्य चाणक्य आपल्या ‘अर्थशास्त्र’ ग्रंथात शत्रूविषयी लिहितात, “ज्याप्रमाणे कर्ज शेवटच्या पैशापर्यंत फेडावे लागते, त्याप्रमाणे शत्रूचा शेवटचा सैनिक असेपर्यंत, त्याचा नाश करावा लागतो. रोग आणि शत्रू सारखेच; त्याचा समूळ नाश केला नाही तर ते वाढतच जातात.”
पृथ्वीराज चौहानने महम्मद घोरी हातात सापडला असताना त्याला ठार करण्याऐवजी सोडून दिले. तो पुन्हा दिल्लीवर चालून आला आणि पुढे मुसलमानी राजवटीचा कालखंड सुरू झाला. १९४७ साली तिचा शेवट भारतमातेचे दोन तुकडे करण्यात झाला. आपल्याच भूमीत महम्मद ’घोरी राज्य’ निर्माण झाले. (पाकिस्तान) जगाच्या इतिहासातही अशा चुका ज्या ज्या राज्यकर्त्यांनी केलेल्या, त्यांना त्यांचे परिणाम भोगावे लागले आहेत. रॉबर्ट ग्रीनने ‘४८ लॉज ऑफ पॉवर’ या पुस्तकात पंधराव्या नियमात सांगतो, “मोझेस सहित सर्व महान नेते हे सांगतात की, पराभूत शत्रूचा समूळ नाश केला पाहिजे. आगीची एक ठिणगी ठेवली तरी ती प्रचंड आग निर्माण करु शकते. शत्रूचा अर्धवट नाश विनाशाचे कारण बनतो. शत्रू स्वत:ला सावरतो. पुन्हा तयारी करतो आणि सूड घेण्यासाठी सिद्ध होतो. म्हणून केवळ त्याच्या शरीराचाच नाही, तर त्याच्या विचारधारेचाही नाश करा.”
रॉबर्ट ग्रीनने चाणक्य यांना उद्धृत केले आहे. चाणक्य म्हणतात, “रोग आणि अग्नीप्रमाणे शिल्लक राहिलेला शत्रू पुन्हा डोके वर काढतो. तो दुर्बळ आहे म्हणून शत्रूकडे कधीही दुर्लक्ष करु नये. गवताच्या गंजीवर ठेवलेल्या ठिणगीप्रमाणे तो केव्हाही धोकादायक ठरू शकतो.”
रॉबर्ट ग्रीनने युरोपच्या इतिहासातील आणि चीनच्या इतिहासातील एकेक उदाहरणे नियमाच्या विवरणासाठी दिली आहेत. या दोन्ही उदाहरणातील राज्यांची नावे, माणसांची नावे आपल्या अजिबात परिचयाची नाहीत. चीनचे उदाहरण इ.स.पूर्व २०८चे आहे आणि युरोपचे उदाहरण इ.स. १५०२चे आहे. दोन्ही उदाहरणात, ज्या पक्षाने आपला शत्रू दुर्बळ आहे, आपण त्याचा सहज बिमोड करु शकतो, असे मानले त्यांचा समूळ नाश झालेला आहे. शत्रूला दुर्बळ समजण्याची चूक त्यांना फारच महागात पडलेली आहे.
ज्यांचा जन्म आपल्याला त्रास देण्यासाठीच झाला आहे, त्यांच्यावर दया-माया दाखविता कामा नये. पिसवा, डास, ढेकूण यांचा जन्मजात गुण प्राण्यांचे रक्त पिण्याचा आहे. त्यांच्यावर दया करता येत नाही. शत्रूचेही असेच असते. नेपोलियन म्हणतो, “अंतिम विजय प्राप्त करण्यासाठी तुम्हाला निर्दय व्हावे लागते.” चाणक्यही म्हणतात, “ज्यांना यश प्राप्त करायचे आहे, त्यांनी दयेच्या आहारी जाऊ नये.”
शत्रूबाबाबतीत असा व्यवहार का करावा लागतो? कारण, जो आपल्या धर्म-संस्कृती-जीवनमूल्यांचा शत्रू आहे, त्यांचा अंतिम हेतू आपल्याला पूर्णपणे संपवून टाकण्याचा असतो. ‘मीही जगतो, तुम्हीही जगा’ हे त्याला मान्य नसते. ‘मीच जगणार’ हा त्याचा मंत्र असतो. अशा शत्रूला पूर्णपणे संपविणेच आवश्यक असते.
एखादी लहान गोष्टही कसा अनर्थ घडवून आणते, हे सांगणारी अमेरिकन लेखकाची ही काल्पनिक कथा. (विलियम कीन) जॉन नावाचा तरुण फूटपाथवरुन चालत होता. चालता चालता त्याच्या डोक्यावर पान पडते. वारा वाहत असतो. डोक्यावरील पान हाताने तो झटकून देतो. थोड्या अंतरावरुन चालणार्या एका मुलीच्या मोबाईलवर ते पान पडते. ती ‘पोकेमॉन गो’ हा खेळ खेळत जात असते. अचानक पान पडल्यामुळे ती हात झटकते. तिचा मोबाईल खाली आपटतो आणि फुटतो. ती चित्रपट बघायला निघालेली असते. तिकीट तिच्या मोबाईलमध्ये असते.
ती वेळेवर चित्रपटगृहात पोहोचत नाही. तिची सीट जॉनीला दिली जाते. सिनेमात कामुक प्रसंग खूप असतात. ते पाहून जॉनी चेकाळतो. द्वाररक्षक त्याला बाहेर काढतो. जॉनी संतापतो. रस्त्याने चालताना त्याचा धक्का दुसर्याला लागतो. संतापलेला जॉनी त्याला मारतो. ज्याला मार बसतो तो सीआयए एजंट असतो. छातीच्या बरगड्यात फॅक्चर होते.
डॉक्टर त्याचे ऑपरेशन करतात. त्याच्या छातीत अतिशय गोपनीय कागदपत्रे सापडतात. रशियन हेरांची त्यात नावे असतात. डॉक्टर ही नावे सोशल मीडियावर टाकतो. त्यामुळे अमेरिकेत हडकंप माजतो. रशिया-अमेरिकेचे संबंध तणावाचे होतात. युद्धापर्यंत मजल जाते. एका क्षूद्र पानाचा हा प्रताप असतो.
म्हणून पिसू असो की पान असो, वेळीच खबरदारी घेणे नेहमीच चांगले. आजच्या संदर्भात इसापच्या या कथेचा विचार करायचा तर थोड्या वेगळ्या अर्थाने करावा लागेल. इसापच्या काळात आजच्या प्रमाणे कोरोना व्हायरस नव्हता. पिसू आपल्या हाताला दिसते, पण कोरोना व्हायरस काही दिसत नाही. असा न दिसणारा हा विषाणू आहे. त्याला समूळ नष्ट करायला पाहिजे. कोरोनाला नष्ट करण्याचे काम आपल्यापैकी प्रत्येकाला करायचे आहे. इसापचा मंत्र असा आहे की, जो आपल्याला त्रास देतो, त्याला जिवंत राहण्याचा काही अधिकार नाही. मनुष्यजातीचा विचार करताना या नियमाचे पालन केले पाहिजे.