‘मिरॅकल मॉम’

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

Total Views |


man kour_1  H x


महिला सशक्तीकरणात दिलेल्या उत्तुंग योगदानाबद्दल १०४ वर्षीय धावपटू मन कौर यांना २०१९चा ‘नारी शक्ती सन्मान’ देण्यात आला आहे. त्यांच्या कार्यावर धावती नजर...


‘अनंत आमुची ध्येयासक्ती अन् अनंत आशा, किनारा तुला पामराला...हे कोलंबसचे गौरवगीत ऐकले की समोर चित्र उभे राहते ते एखाद्या गौरवशाली, जिद्दी व प्रचंड आशावादी असणार्‍या व्यक्तीचे. माणसाच्या जीवनात आशावादाला किती महत्त्व आहे, हे या ओळीतच व्यक्त होत आहे. किनारा शोधणार्‍याला त्यांनी पामर म्हणजेच दुबळा ठरवला आहे. माणसाजवळ आशा-अपेक्षा, ध्येयासक्ती इतकी प्रबळ असावी की, आकाशालासुद्धा मर्यादा पडाव्यात आपल्या ध्येयवादाला अंत असू नये, मर्यादा असू नयेत. ध्येयवादी माणसाने एक लक्ष्य गाठले की, दुसर्‍या लक्ष्याकडे आगेकूच करायला पाहिजे, असे या ओळी सुचवत आहेत आणि या ओळी खर्‍या ठरविणार्‍या आज असंख्य व्यक्ती आपल्या आजूबाजूला आहेत. अशाच मन कौर यांच्या जीवनप्रवासावर एक नजर...

 


एका वृत्तपत्राला मुलाखत देताना मन कौर सांगतात, “मी जोपर्यंत शक्य असेल तोपर्यंत धावणार आहे. या स्पर्धांमध्ये सहभागी होणे चालूच ठेवणार आहे. यातून मला खूप आनंद मिळतो.कौर यांनी जगभरातील मास्टर्स गेम्समध्ये ३०हून अधिक पदके जिंकली आहेत आणि आता २०२०मध्ये होणार्‍या जपानमधील मास्टर्स क्रीडा स्पर्धांमध्ये सुवर्णपदक जिंकण्याची त्यांची इच्छा आहे. २०१६मध्ये अमेरिकन मास्टर्स गेम्स व्हँकुव्हरमध्ये १०० वर्षांची जगातील सर्वात वेगवान धावपटू महिला होण्याचा सन्मान त्यांनी मिळविला होता. विशेष म्हणजे याच वर्षी त्यांना ऑस्टियोपोरोसिस आजार असल्याचे निदान झाले होते, तरीही त्यांनी हार मानली नाही. मन कौर या एक आंतरराष्ट्रीय धावपटू असून त्यांनी जागतिक स्तरावरील स्पर्धांमध्ये त्यांच्या वयोगटात सुवर्णपदके जिंकून अनेक विक्रम आपल्या नावे केले आहेत. आजपासून दहा वर्षांपूर्वी वयाच्या ९३व्या वर्षी प्रथमच धावपट्टीवर उतरलेल्या मन कौर आज १०३ वर्षांच्या असून त्या पटियाला येथील पंजाब विद्यापीठाच्या आवारात त्या सराव करीत आहेत.

 


मन कौर यांच्या तीन मुलांपैकी थोरले पुत्र गुरदेव स्वतः एक अ‍ॅथलिट आहेत आणि विविध स्पर्धांमध्ये पदकेजिंकली आहेत. त्यांनी एका मुलाखतीत सांगितले की, आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये सहभागी होताना ते पाहत असत की विदेशात वयस्क महिलाही तंदुरुस्त असतात. त्याने पाहिले की वयाची नव्वदी ओलांडलेली त्याची आईदेखील तंदुरुस्त आहे म्हणून त्याने तिला धावण्याची प्रेरणा दिली. मन कौर यांनीही वयाच्या ९३व्या वर्षी आपल्या मुलाची आज्ञा पाळत सराव सुरू केला. चालण्यापासून सुरुवात करत त्याने हळूहळू आपला वेग वाढविणे सुरू केले. सुरुवातीला त्या विविध कार्यक्रमांमध्ये आपल्या वयोगटात सहभाग घेऊ लागल्या. २००७ मध्ये ‘चंदिगढ मास्टर्स अ‍ॅथलेटिक्स’ स्पर्धेत १०० मीटर प्रकारात मन कौर यांनी पहिले पदक जिंकले. २०११मध्ये अमेरिकेच्या सॅक्रॅमेन्टो येथे आयोजित ‘वर्ल्ड मास्टर्स अ‍ॅथलेटिक चॅम्पियनशिप’मध्ये १०० आणि २०० मीटर स्पर्धांमध्ये सुवर्णपदके जिंकली. २०११ मध्ये त्यांना ‘अ‍ॅथलिट ऑफ दी इयर’ म्हणून गौरविण्यात आले. त्यानंतर मात्र त्यांची विजयी घोडदौड सुरू झाली. २०१२ मध्ये तैवानमध्ये झालेल्या ‘आशियाई मास्टर्स अ‍ॅथलेटिक’ स्पर्धेत त्यांनी भारताचे प्रतिनिधित्व केले आणि १०० मीटर शर्यतीत सुवर्णपदक जिंकले. दरवर्षी या कार्यक्रमांमध्ये सहभाग नोंदवित त्यांनी ३०हून अधिक पदके जिंकली आहेत. २०१७मध्ये ऑकलंड येथे आयोजित वर्ल्ड मास्टर्स अ‍ॅथलेटिक चॅम्पियनशिपमध्ये १०० मीटर स्प्रिंटमध्ये सुवर्णपदक मिळवल्यानंतर मन कौर एक ‘चॅम्पियन अ‍ॅथलिट’ ठरल्या. त्यांच्या या उत्कृष्ट कार्याबद्दल व सामर्थ्याबद्दल त्यांचे जगभरात कौतुक झाले. त्यानंतर त्यांनी पोलंडमधील वर्ल्ड मास्टर्स अ‍ॅथलेटिक चॅम्पियनशिपमध्ये चार सुवर्णपदके जिंकली आणि आजपर्यंत अनेक जागतिक विक्रम त्यांच्या नावावर आहेत.

 


‘पिंकेथॉन’ ही विविध सामाजिक विषयांबद्दल जागरूकता निर्माण करणे व महिलांसाठी सर्वात मोठी मॅरेथॉन आयोजित करणारी संस्था आहे. या संस्थेचे आयोजक व अभिनेते योगेश सोमण मन कौर यांच्याविषयी म्हणतात की, “ज्या वयात लोक आपली जगण्याची सर्व आशा सोडून देतात, त्या वयात मन कौर यांनी जिद्दीने धावण्याचा निर्णय घेतला. केवळ त्यांनी स्पर्धांमध्ये सहभागच नाही नोंदविला तर संपूर्ण जगाला त्यांची नोंद घेण्यास भाग पडले. संपूर्ण जगाचे लक्ष वेधले जाईल, अशी उल्लेखनीय कामगिरी केली. म्हणूनच त्यांना ‘पिंकेथॉन’चे शुभंकर (मस्कॅट) बनविले आहे. केवळ भारतातच नव्हे तर जगभरातील महिलांसाठी त्या प्रेरणास्थान आहेत. जगभरात त्यांना चंदिगढच्या ‘मिरॅकल मॉम’ या नावाने सर्वजण ओळखतात. याविषयी बोलताना त्या सांगतात की कशारितीने त्यांनी सर्व रूढी परंपरांना छेद देत हे सिद्ध केले की, वय ही तर केवळ एक संख्या आहे. अशा या प्रेरणादायी व ध्येयाच्या दिशेने धाव घेणार्‍या ‘मिरॅकल मॉम’ला २०१९च्या ‘नारीशक्ती सन्माना’ने गौरविण्यात आले. मन कौर यांच्या कार्याविषयी सन्मान म्हणून त्यांना प्रमाणपत्र व दोन लाख रुपये देण्यात आले. भारत सरकारने दिलेल्या मानपत्रात असे म्हटले आहे की, ‘महिला सक्षमीकरणामध्ये दिलेल्या अमूल्य योगदानाच्या पार्श्वभूमीवर त्यांना वर्ष २०१९च्या नारीशक्ती पुरस्कार’ प्रदान करण्यात येत आहे,’ अशा या जिद्दी महिलेस दै. ‘मुंबई तरुण भारत’चा सलाम!
 
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@