मुंबईतील मान्सूनपूर्व कामांची सद्यस्थिती

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    26-May-2020   
Total Views |

vicharvimarsh_1 &nbs



कोरोना महामारीमुळे मुंबईतील मान्सूनपूर्व कामांचा वेग मंदावला असून पूरपरिस्थिती उद्भवण्याची शक्यता नाकारता येत नाही. तेव्हा, यंदाच्या मान्सूनचा सामना करण्यासाठी पालिकेची किती तयारी आहे, त्याचा या लेखात घेतलेला आढावा...


मुंबई महापालिका एकीकडे कोरोना संकटावर उपाययोजना करण्यासाठी गुंतली असताना, पावसाळ्याच्या तोंडावर मुंबईकरांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या अशा नालेसफाई, रस्ते बांधणी वा दुरुस्ती आणि डासांचा बंदोबस्त करण्याच्या कामांनाही पालिकेकडून वेगाने सुरुवात करण्यात आली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यांत्रिक पद्धतीने नालेसफाई करण्यास सध्या प्राधान्य दिले जात असून त्यात मानवी हस्तक्षेप कमीत कमी होईल यावर भर देण्याचे पालिकेने ठरविले आहे. ‘अम्फान’ चक्रीवादळामुळे पावसाळा उशिरा सुरू होणार आहे, असा अंदाज मान्सून तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेला मान्सूनपूर्व कामांना जास्त वेळ मिळेल.


(१) मुंबईतील सुमारे २६४ किमी लांबींच्या २८०मोठ्या नाल्यांची साफसफाई केली जाणार आहे. यामध्ये शहर भागातील सुमारे २२किमी लांबीचे २७मोठे नाले, पूर्व उपनगरातील १०२किमी लांबीचे १११मोठे नाले व पश्चिम उपनगरातील १४०किमी लांबींच्या १४२ मोठ्या नाल्यांचा समावेश आहे. कंत्राट कालावधीत एकूण ३लाख, ६२ हजार, ६३८ मेट्रिक टन गाळ उपसला जाईल. शहर भागातील ३६हजार, ४२७ टन; पूर्व उपनगरातील १ लाख, २२ हजार, ७७० टन; व पश्चिम उपनगरातील २ लाख, ३ हजार, ४४१ टन गाळ मोठ्या नाल्यांमधून काढला जाईल, असा अंदाज आहे.



नालेसफाईच्या दरवर्षीच्या पद्धतीनुसार व कंत्राटातील अटी व शर्तीनुसार सुमारे ७०टक्के गाळ पावसाळ्यापूर्वी, उर्वरित १५टक्के गाळ पावसाळ्यादरम्यान व पावसाळ्यानंतर १५टक्के गाळाचा उपसा केला जाणार आहे. पूर्व उपनगरातील नालेसफाईचे काम समाधानकारक सुरू असून, आतापर्यंत ६०टक्के काम पूर्ण झाले आहे. पावसाळ्यापूर्वी आवश्यक ती रस्त्यांची कामे निर्धारित वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव यांनी संबंधित महापालिका अधिकार्‍यांना २१मे रोजी दिले आहेत. नालेसफाई व रस्त्याची कामे जलदगतीने पूर्ण करण्यात येत असल्याचे त्यानी सांगितले. पश्चिम उपनगरातील अंधेरी मरोळ परिसरातील कृष्णनगर येथे अल्पवयीन मुलांकडून नालेसफाईची कामे करवून घेणार्‍या कंत्राटदाराला महापालिकेने कारणे दाखवा नोटीस पाठविली आहे. एका आठवड्यात समाधानकारक उत्तर न मिळाल्यास कंत्राटदारावर योग्य ती कारवाई केली जाईल. दहिसर पश्चिम पूर्व व अंधेरी पश्चिम पूर्व येथील नागरिकांच्या नालेसफाई कामाकरिता तक्रारी येत आहेत. गाळ काढून झाल्यावर तो रस्त्याच्या बाजूला ढिगारा करून ठेवला जातो व तो सुकल्यावर उचलून दुसरीकडे नेला जातो. नागरिकांनी या गाळाच्या ढिगार्‍यांना आठवडाहून जास्त काळ झाल्यामुळे घाण वास येत आहे अशा तक्रारी केल्या आहेत. पालिकेने यात लक्ष घालावे असे ठरले.



(२) मुंबईतील नदी-नाल्यांचे पालिकेने ड्रोनद्वारे सर्वेक्षण सुरू आहे. हे सर्वेक्षणाचे काम पूर्ण झाल्यावर सविस्तर अभ्यास करून अहवाल सादर केला जाईल. नदी- नाले यामधील गाळ काढण्याची कामे करताना बॉटलनेक अडथळ्यांची मुख्य ठिकाणांची कामे तातडीने एका आठवड्यात स्वच्छ केली जातील.



(३) २१.४किमी लांबीच्या मिठी नदीच्या साफसफाईचे कामही सुरू झाले आहे. त्यातून सुमारे १लाख, ३७हजार, ८३० मेट्रिक टन एवढा गाळ उपसला जाणार आहे. यापैकी ७०टक्के गाळ पावसाळ्यापूर्वी काढला जाणार आहे. उर्वरित काम नेहमीच्या पद्धतीने केले जाईल. शहर भागाच्या ६.२ किमीए लांबीच्या मिठी नदीमधून सुमारे ५९ हजार, ५८०टन; पूर्व उपनगरातील १३किमी लांबीच्या नदीमधून ५४हजार, २५० टन; आणि पश्चिम उपनगरातील २.२ किमी नदीमधून २४ हजार टन एवढा गाळ उपसला जाणार आहे. मिठी नदीचे गाळ काढण्याचे काम ६० टक्के पूर्ण झाल्याचा दावा पालिकेने केला आहे व पर्जन्यवृष्टीच्या कालावधीत मिठी नदी धोक्याची पातळी ओलांडणार नाही, याची काळजी घेण्याचे आदेशही पालिका आयुक्त इकबालसिंग चहल यांनी दिले आहेत.



(४) हवामान खात्याने यंदा जूनच्या दुसर्‍या आठवड्यात मान्सून मुंबईत दाखल होईल, असा अंदाज व्यक्त केला आहे. यंदा तब्बल २९१ठिकाणी पाणी तुंबू शकते. यावरच्या उपाययोजनांकरिता, पालिकेने यंत्रणा कामाला लावली आहे.



नवनिर्वाचित आयुक्त इकबालसिंग चहल यांनी आयुक्तपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर कोरोनासोबतच मान्सूनपूर्व कामाचा आढावा घेतला. पर्जन्यजलवाहिन्या, मलनिस्सारणवाहिन्या, विद्युत आणि देखभाल इत्यादींकरिता संपूर्ण यंत्रणेला झटून कामाला लागण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत. गेल्या वर्षी २२५ठिकाणी पाणी तुंबण्याची शक्यता होत असल्यामुळे २९८ पंप बसविले होते व पंपांसाठी रुपये ५५ कोटी खर्च झाले होते. यावर्षी २९१ठिकाणी पाणी तुंबण्याची शक्यता आहे व त्याकरिता त्या ठिकाणांसह अन्य ठिकाणी ३५०हून अधिक पंप सज्ज ठेवण्यात येणार आहेत. यंदा पंपांसाठी पालिका रुपये ७०कोटी खर्च करणार आहे. (५) मुंबईतील २६ जुलै २००५ च्या मोठ्या पुरात १०९४ माणसे मृत्युमुखी पडली. त्यानंतर ब्रिम्स्टोवॅड प्रकल्पाचे काम मुंबईतील एकोणिसाव्या शतकात बांधलेले मोठे नाले वा वाहिन्या नूतनीकरण करणे वा बदलणे याकरिता सुरू केले. पण १५ वर्षे झाली तरी त्या प्रकल्पाचे काम अजून संपलेले नाही. याचे कारण अजून काही कामाच्या ठिकाणी अतिक्रमणे व कोर्टातील सुरू असलेले खटले इत्यादी कारणांसाठी कामाला भूखंड मिळत नाहीत.



५८ ठिकाणी नाल्यांचे रुंदीकरण करण्याच्या कामापैकी २७ ठिकाणची कामे संपली आहेत व उर्वरित ठिकाणांचे काम बाकी आहे. शिवाय आठ पम्पिंग केंद्राच्या कामांपैकी दोन पम्पिंग केंद्रांची माहूल व मोग्रा येथील कामे बाकी आहे. माहूलच्या पंपकेंद्राचे काम झाल्यावर शीव, कुर्ला व माटुंगा येथील पाणी तुंबणे कमी होईल. माहूलचा भूखंड सॉल्ट आयुक्तांच्या ताब्यात आहे आणि तो भूखंड हातात मिळाल्यावरही जमिनीची रीतसर तपासणी व सर्वेक्षण करायला हवे. मोग्रा पंपकेंद्राचा भूखंड दोन मालकांच्या भाडणात अडकलेला आहे. न्यायालयाने मालकाला भूखंडाच्या किंमतीचे रु. ४२ कोटी द्यावे, असा निकाल दिला आहे. ब्रिम्स्टोवॅड प्रकल्प रचनेमध्ये नाल्यांची क्षमता वाढविण्यात आली आहे. कारण, पर्जन्य पाण्याचा स्पर्श वेग तासाला २५ मिमीऐवजी ५० मिमी प्रमाण धरून रचित केला आहे. मुंबईच्या पश्चिम व पूर्व भागात अनुक्रमे सरासरी वर्षाला ३२९ मिमी व ३०९ मिमी पाऊस पडला आहे, असे प्रमाणात धरले आहे. प्रकल्पाच्या र्चाचा अंदाज रु. १२०० कोटी वाढीव बनविलेला होता, तो आता चार हजार कोटींहून अधिक झाला आहे. शहरामधील विकसित जमिनींमुळे नैसर्गिक नाले वाहण्यासाठी जागाच राहिलेली नाही.



पावसाळ्यात डासांचे साम्राज्य वाढू नये म्हणून जंतुनाशक टाकणार्‍या पालिकेच्या विभागाने मुंबईत १३मे ते २१मे असे नऊ दिवसांचे मान्सूनपूर्व काळात सोसायटींच्या घरांजवळ जाऊन ‘कोंबिंग ऑपरेशन’ केले व त्यांनी डास निर्माण होण्याची पाणी साचलेली १ ,४७९ ठिकाणे शोधून काढली. या ठिकाणात ‘मच्छर लारव्हा’ तयार होऊन १,१४६ ठिकाणी डेंग्यू व ३३३ ठिकाणी मलेरिया होण्याची शक्यता दर्शविली. जंतुनाशक विभागाचे अधिकारी व तज्ज्ञ राजन नारिंगेकरनी समजावले की एड्स एजीप्ती (Aedes aegipti) डासांच्या जातीमुळे डेंग्यू होतो व अ‍ॅनोफिलीस स्टेफेन्सी (Anopheles stephensi) डासांच्या जातीमुळे मलेरिया होतो. कोरोना संकटासाठी ‘लॉकडाऊन’ची कामे हातात असताना जंतुनाशक विभागातील १५००जण या डासांच्या मोहिमेसाठी झटत आहेत. परंतु, अनेक नागरिक घरात पाणी उघड्या पिंपात वा उघड्या थाळीतल्या फ्लॉवर पॉट्समध्ये बराच काळ भरून ठेवतात. आरोग्याधिकारी व त्यांच्या बरोबरोबरचे कर्मचारी सर्व वर्षभर डासांच्या जागा शोधत व तपासणी करत फिरत असतात.


२०१९मध्ये जानेवारी ते जुलैमध्ये त्यांनी १९ ,१७२ डासांची ठिकाणे शोधली व त्याना ती नष्ट करणे भाग पडले. परंतु, यावर्षी ‘लॉकडाऊन’मुळे त्यांना जास्त घरे तपासायला मिळाली नाहीत. परंतु, त्यांनी ‘कोंबिंग ऑपरेशन’ चालू ठेवले. झोपडपट्ट्यांमधील अशा साचलेल्या पाण्याच्या जागा शोधून काढणे सोपे असते. पण, निवासी सोसायट्यांच्या घरात जाऊन ठिकाणे शोधणे महाकठीण असते. घरांचे मालक घरात या कामासाठी शिरकाव करू देत नाहीत. आमच्या डाटाप्रमाणे २०१७ मध्ये डेंग्यूमुळे शहरात सगळ्यात जास्त १७मृत्यू झाले. डेंग्यूमुळे २०१८मध्ये १४ मृत्यू झाले; २०१९ मध्ये हे डेंग्यू मृत्यू फक्त तीनवर आले. २०१६मध्ये डेंग्यूच्या केसेस ११८०होत्या, तर २०१९मध्ये त्यांचे प्रमाण ९२०वर आणून ठेपले. पावसाळ्यात नागरिकांना पुराचा त्रास होऊ नये म्हणून नालेसफाई व पम्पिंग केंद्राची कामे व डेंग्यू मलेरियाच्या केसेस उद्भवू नये, म्हणून मुंबई महापालिका चांगले काम करत आहे.
@@AUTHORINFO_V1@@