आता ‘बी’ नाही, पण ‘सी’ आहे. हा ‘सी’ कोरोना व्हायरसचा आहे. तो ही अकस्मात आलेला आहे. पहिल्या चार ‘बी’चे परिणाम भौगोलिक क्षेत्रापुरते काहीसे मर्यादित राहिले आहेत. या कोरोनाचा परिणाम मात्र जागतिक आहे. त्याला देशांच्या सीमा नाहीत. त्याचे तात्कालिक आणि दीर्घकालीन असे दोन परिणाम आहेत.
मानवी इतिहासाला कलाटणी देणार्या घटना अकस्मित घडत असतात. अठराव्या आणि विसाव्या शतकात अशा घटनादेखील घडल्या, त्याची अद्याक्षरे ‘बी’पासून सुरू होतात, ती अशी - बोस्टन, बॅस्टाइल, बर्लिन आणि बाबरी. बोस्टन बंदरात १७ डिसेंबर १७७३ ला स्वातंत्र्यप्रेमी युवकांनी ईस्ट इंडिया कंपनीच्या दोन जहाजांवरील सर्व चहा समुद्रात ओतून दिला. त्याला ‘बोस्टन टी पार्टी’ म्हणतात. त्याचा सूड म्हणून ब्रिटनने बोस्टन बंदर बंद केले. ब्रिटिश सैनिक पाठविले. त्यांना ‘रेड कोट्स’ म्हणत. त्यांनी गोळीबार केला. त्यात काहीजण ठार झाले. मेलेला पहिला युवक निर्गो होता. येथून अमेरिकेच्या स्वातंत्र्य युद्धाला प्रारंभ होतो. ‘बोस्टन टी पार्टी’ ही अकस्मित घडलेली घटना आहे. फ्रेंच जनतेने १४ जुलै, १७८९ला बॅस्टाइल तुरुंग फोडला. बॅस्टाइल तुरुंग जुलुमाचे प्रतीक झाला होता. राजा, सामंत आणि चर्च अशा तीन शक्ती, जुलुमी शक्ती झाल्या होत्या. सामंत आणि चर्च यांना राजा अटकेचे परवाने विकत असे. असे हजारो बंदी बॅस्टाइलच्या तुरुंगात होते. खरे गुन्हेगार फार थोडे होते, राजकीय विरोधकच खूप होते. तुरुंग फोडणार्यांनी कैद्यांना मुक्त केले. राजाच्या सैनिकांना कापून काढले. फ्रेंच राज्यक्रांतीला सुरुवात झाली. बॅस्टाइलची घटनादेखील अकस्मित आहे.
नोव्हेंबर १९९१ला बर्लिनची भिंत, बर्लिनच्या नागरिकांनी भुईसपाट केली. ही भिंत कम्युनिझमचे तत्त्वज्ञान आणि लोकशाहीचे मानवी अधिकाराचे तत्त्वज्ञान यांच्यामधील भिंत होती. पूर्व जर्मनीने ती बांधली होती. २४ तास तिच्यावर सैनिकी पहारा असे. तिच्या जवळपास येणार्यावर गोळ्या घातल्या जात. अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष रिगन जर्मनीच्या प्रवासात असताना ही भिंत पाहून म्हणाले होते की, “ही दानवी विचारांची भिंत आहे आणि ती कोसळेल.” त्याप्रमाणे ही भिंत कोसळली. भिंत कोसळल्यानंतर तीन गोष्टी झाल्या. जर्मनीचे एकीकरण झाले आणि शीतयुद्धाची समाप्ती झाली. तसेच रशियाचा कम्युनिझम कोसळला. रशियाने बळकावलेले देश स्वतंत्र होत गेले. पोलंड, हंगेरी, उझबेकिस्तान असे अनेक देश स्वतंत्र झाले. रशियाचा पोलादी पडदा हवेत विरून गेला. बर्लिनची भिंतदेखील अकस्मितपणे कोसळली. ती जनतेनेच पाडून टाकली.
चौथा ‘बी’ आहे, बाबरीचा. ६ डिसेंबर १९९२ला बाबरी कोसळली. ढोंगी सेक्युलरवाद संपला. मुस्लीम तुष्टीकरण राजनीतीला जबरदस्त थप्पड बसली. हिंदूंच्या मनातील मुस्लीम भयगंड संपला. यानंतर खर्या अर्थांनी हिंदूहिताच्या राजकारणाचा प्रारंभ झाला. पूर्ण बहुमताने मोदींचा विजय हा बाबरीचा चमत्कार आहे. त्याचे आणखी खूप धक्के आहेत. त्याचे आकलन फार कमी लोकांना झालेले आहे. बाबरी कोसळल्यामुळे काश्मीरला विशेष दर्जा देणारे ‘३७० कलम’ गेले. मुस्लीम दहशतवाद्यांना वेचून वेचून ठार करण्यात येते. आज तर अशी परिस्थिती निर्माण झाली आहे की, सामान्य हिंदूंच्या मनात मुसलमानांच्या विषयी अतिशय अविश्वास निर्माण झालेला आहे. जे न्यायालय रामजन्मभूमी वादावर ७० वर्षे झाली तरी निर्णय करीत नव्हते, त्या न्यायालयाने हिंदूंच्या बाजूने निर्णय दिलेला आहे. डाव्या लोकांची एक एक वस्त्रे उतरवली जात आहेत. त्यांच्या पूर्ण नामशेषाचा कालखंड फार दूर नाही.
आता ‘बी’ नाही, पण ‘सी’ आहे. हा ‘सी’ कोरोना व्हायरसचा आहे. तो ही अकस्मात आलेला आहे. पहिल्या चार ‘बी’चे परिणाम भौगोलिक क्षेत्रापुरते काहीसे मर्यादित राहिले आहेत. या कोरोनाचा परिणाम मात्र जागतिक आहे. त्याला देशांच्या सीमा नाहीत. त्याचे तात्कालिक आणि दीर्घकालीन असे दोन परिणाम आहेत. तात्कालिक परिणाम ‘लॉकडाऊन’चा आहे. सध्या आपण ते परिणाम भोगत आहोत. त्याविषयी विस्ताराने लिहून वेळ घालविण्यात अर्थ नाही. आपण सर्व ते जाणतोच. हा कोरोना व्हायरस लगेचच संपणारा नाही. तज्ज्ञांचा अंदाज असा आहे की, पूर्वीसारखी परिस्थिती निर्माण व्हायला खूप काळ जाईल. एक वर्ष तर कुठेच गेले नाही. कोरोना व्हायरस आहे, हे गृहीत धरून जीवन जगावे लागेल.
पहिल्या चार ‘बी’नी समाजव्यवस्था, राज्यव्यवस्था, अर्थव्यवस्था आणि धर्मव्यवस्था यांना जबरदस्त धक्के दिले. हा ‘सी’देखील असेच धक्के देणारा आहे. यासाठी या ‘सी’ चा थोडा वेगळा विचार करावा लागतो. कोरोना व्हायरसचे धक्के जगातील सर्व समाजव्यवस्था, राज्यव्यवस्था आणि अर्थव्यवस्था यांना आहे. कोणताही मानवसमूह यातून वाचणार नाही. हा कोरोना चीनने आणला की अमेरिकेने आणला, याबाबत सध्या वाद चालू आहे. आपण ईश्वराचे अस्तित्व मानणारे आहोत. म्हणून देवानेच कोणाच्या तरी डोक्यातून हा व्हायरस सोडला असावा. भारतापुरता त्याचा विचार आपण करुया. भांडवलशाही समाजरचना असो की, समाजवादी समाजरचना असो. दोन्ही ठिकाणी हितसंबंधांची जपवणूक करणारा श्रीमंत वर्ग असतो. त्याला हाल भोगावे लागत नाहीत. तो सुखवस्तू परिघात राहतो. भारतात कोरोना श्रीमंतांनी विदेशातून आणला. त्याचे परिणाम गरिबांना भोगावे लागतात.
या गरिबांच्या नोकर्या गेल्या, त्यांचे लहानसहान व्यवसाय बंद झाले. हाताला काम नाही. पोटाला अन्न कुठून आणायचे, ही चिंता त्यांना सतावू लागली. ते आपापल्या प्रांतात जायला निघाले. त्यांचे हाल हृदय पिळवटून टाकणारे आहे. कोरोना आणणारा श्रीमंत वर्ग आरामात आहे. भारतात श्रमजीवींची संख्या २०-२५ कोटींपेक्षा कमी नसावी. हा एक स्फोटक दारुगोळा आहे. त्याच्याकडे योग्य प्रकारे लक्ष दिले नाही तर ते सगळी समाजव्यवस्था हादरुन टाकू शकतात. श्रमिक प्रधान अर्थव्यवस्थेकडे जर देश गेला नाही तर दीर्घकाळात प्रश्नच प्रश्न असतील. कोरोनाचे संकट जातिनिरपेक्ष आहे. या रोगात जातिवादाला काही थारा नाही. हा रोग जातीची बंधने शिथील करत जाईल. रोगापासून बचावासाठी एकमेकांपासून सामाजिक दूरता आणि जीवंत राहण्यासाठी परस्परांवर अवलंबून राहणे, या दोन्ही गोष्टी होत जातील. उच्च-नीचता पाळायचे ठरवले तर उच्चता पाळणार्यांनाच त्याचे परिणाम भोगावे लागतील. म्हणून जे परंपरेने वरती बसले आहेत, त्यांना कोरोना खाली उतरवेल. मनुष्याला सर्व बाबतीत स्वावलंबी होता येत नाही. एकमेकांवर अवलंबित राहूनच त्याला जगता येत.
दीर्घकालीन राजकीय परिणामदेखील असेच असतील. कोणतीही राज्यव्यवस्था आदर्श आणि परिपूर्ण नसते. व्यवस्थेचे फायदे ज्यांना मिळतात, असा वर्ग तयार होतो. आपल्या संसदीय लोकशाहीने असा एक वर्ग तयार केलेला आहे. या वर्गात वंशपरंपरेने सत्ता भोगणारे घराणी निर्माण झाली आहेत. ती राजकीय क्षेत्रात आहेत, तशी न्यायदानाच्या क्षेत्रातही आहेत. ही घराणी आपल्या हितसंबंधाचे रक्षण एकमेकांना मदत करुन अतिशय कौशल्याने करीत असतात. ती हितसंबंध जपणार्यांची, घराणेशाही वाढविणार्यांची राज्यव्यवस्था गरीब आणि श्रमिकांचे शोषण करणारी झालेली आहे. ही व्यवस्था अशीच दीर्घकाळ चालू शकणार नाही. आपली परंपरा हिंसक क्रांती करण्याची नाही, पण आपण क्रांतीच्या उंबरठ्यावर आलेलो आहोत.
जगाच्या इतिहासाचा अभ्यास केला असता, ज्या ज्या राजवटीत गरीब आणि श्रमिक पिसले गेले आहेत, त्या राजवटी टिकल्या नाहीत. फ्रेंच राज्यक्रांतीने सर्व प्रस्थापित वर्गाची कत्तल करून टाकली. रशियन राज्यक्रांतीनेदेखील हेच केले. आपल्या देशातील गरीब आणि श्रमिक हा शोषिक आहे. त्याच्यावर खोलवरचे धार्मिक संस्कार आहेत. सहन करण्याची त्याची शक्ती अफाट आहे. तसेच परिवर्तनाची त्याची शक्ती अफाट आहे. त्याची सेवा करणे यावेळचे कर्तव्य आहे. सेवेने भूक शमते, कष्ट कमी होतात. त्याने परिवर्तन होत नाही. परिवर्तनासाठी विचार लागतो. विचाराची शास्त्रशुद्ध मांडणी करावी लागते. सर्वांना समजेल अशा भाषेत ते सांगावे लागते. नवीन परिस्थितीचा नवा विचार द्यावा लागतो. दीर्घकाळ काळाची ही भूक कोणीतरी भागवील. अकस्मात आलेल्या या ’सी’ चे धार्मिक परिणामही असेच होणार आहेत. भारतात मुसलमान आणि ख्रिश्चन असे दोन मुख्य अन्य धर्म आहेत. त्यांना हिंदू जीवनपद्धतीत कसे आणायचे, हा एक नाजूक प्रश्न आहे. ते जोपर्यंत अरबी आणि रोमच्या संस्कृतीत राहतील, तोपर्यंत राष्ट्रीय एकात्मता निर्माण होणार नाही. त्यांना ए.पी.जे. अब्दुल कलाम किंवा जॉर्ज फर्नांडिस व्हावे लागेल.
कोरोनाचे संकट जीवनपद्धतीविषयी आत्मचिंतन करायला भाग पाडणारे झाले आहे. शारीरिक आरोग्यासाठी आयुर्वेद, मनाच्या आरोग्यासाठी आणि प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी योगमार्ग, निरोगी जीवन जगण्यासाठी पर्यावरणपूरक जीवन व्यवहार, हिंदू जीवनपद्धतीच्या या संकल्पना आहेत. कोरोनाला बरोबर घेऊन जगायचे आहे, तर या जीवनपद्धतीचा स्वीकार करावा लागेल. हाच कोरोनाचा संदेश आहे. ‘सी’च्या तात्कालिक आणि दीर्घकालीन परिणामांचा हा थोडक्यात आढावा आहे. मानवी जीवन हे कधीही यथास्थितीवादी राहिलेले नाही. नित्य परिवर्तन हाच मानवी जीवनाचा विशेष आहे. ही परिवर्तने कधी स्वाभाविकपणे होतात तर कधी आकस्मिक होतात. माणसाने त्याच स्थितीत राहावे, असे निर्मात्याला वाटत नाही. हजारो वर्षांपूर्वी पशू, पक्षी, किटक, ज्या स्थितीत होते, तसेच आजही आहेत. मनुष्याचे तसे नाही. यासाठी भविष्यकाळातील परिवर्तनाला सामोरे जाण्यासाठी आपण सर्वांनी आतापासून तयारी केलेली बरी.