देशात साडेनऊ हजार कोरोनारुग्ण पूर्णपणे बरे

    02-May-2020
Total Views |

health ministry_1 &n

देशात साडेनऊ हजार कोरोनारुग्ण पूर्णपणे बरे


नवी दिल्ली: देशात आतापर्यंत एकुण ९ हजार ९५० रुग्ण पूर्णपणे बरे झाले असून कोरोनाग्रस्तांचा एकुण आकडा ३७ हजार ३३६ एवढा झाला आहे. त्याचप्रमाणे महाराष्ट्र, गुजरात आणि दिल्ली या तीन राज्यांमध्येच रुग्णसंख्या २० हजाराच्या घरात गेली आहे.

 

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या माहितीनुसार देशात आतापर्यंत एकुण ९ हजार ९५० कोरोनाग्रस्त पूर्णपणे बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. रुग्ण बरे होण्याचा दर आता २६.६५ टक्के एवढा झाला आहे. विशेष म्हणजे गेल्या २४ तासात १०६१ रुग्ण बरे झाले आहेत, तर देशात सध्या एकुण ३७ हजार ३३६ कोरोनाग्रस्त आहेत. आतापर्यंत एकुण १ हजार २२३ रुग्णांचे मृत्यू झाले आहेत.

 

देशातील एकुण रुग्णसंख्येपैकी १९ हजार ९६५ रुग्ण महाराष्ट्र, गुजरात आणि दिल्ली या तीन राज्यांमध्ये आहेत. देशाच्या राजधानी दिल्लीमध्ये दक्षिण – पश्चिम दिल्लीतील कापसहेडा भागातील एकाच रहिवासी भागात तब्बल ४१ कोरोना रुग्ण आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. यापूर्वी येथील ठेकेवाली गल्लीमध्ये १८ एप्रिल रोजी पहिला रुग्ण आढळल्यानंतर इमारत सील करण्यात आली होती. त्यातील रहिवासी, आसपासचे नागरिक, दुध आणि भाजी विक्रेते असे ९५ जणांचे नमुने २० एप्रिल तर अन्य ८० जणांचे नमुने २१ एप्रिल रोजी तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. आतापर्यंत एकुण ६७ जणांचे अहवाल आले असून त्यात ४१ जण कोरोनाबाधित असल्याचे समोर आले आहे.