कोरोना आला कुठून, कोरोनाचा फैलाव कुणी केला, कोरोनाला कारणीभूत कोण, विश्वासघात करणारा देश कोण, माहिती लपविणारा देश कोण, असा एकच आरडाओरडा डोनाल्ड ट्रम्प ते इतर सर्वसामान्य व्यक्तींनी चीनबद्दल सुरू केला आहे. त्यातील काही शंका नाकारताही येत नाहीत. मात्र, याच देशातील हाँगकाँग शहराने जगाला आपल्या कृतीतून एक प्रतीकात्मक संदेश दिला आहे.
चीनच्या वुहान मार्केटमधून कोरोनाचा फैलाव झाल्याचा दावा केला जातो. चिनी जवळपास सगळ्याच प्राण्यांचे मांस खातात, असेही म्हटले जाते. त्यातूनच हा विषाणू जगभरात पोहोचला, असा आरोप अमेरिकेने वारंवार केला आहे. वटवाघळांमुळे कोरोना पसरल्याचा दावाही अधूनमधून डोके वर काढतो. मात्र, याला अधिकृत दुजोरा अद्याप जागतिक आरोग्य संघटनाही देऊ शकलेली नाही. यावर तूर्त संशोधन सुरू आहे, तसेच हा विषाणू चीनच्या प्रयोगशाळेत तयार करण्यात आला का, यावरही वादंग उठला. तो यापुढे कित्येक वर्षे सुरूच राहील, पण सध्या ‘जर...तर’ हा वाद सुरू ठेवण्यापेक्षा सर्वांनी एकत्र येऊन लढणे हाच एकमेव पर्याय उपलब्ध आहे.
महाराष्ट्रातही ‘लॉकडाऊन’नंतर ‘मीच माझा रक्षक’ ही संकल्पना आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी राबविली. मात्र, त्याला नागरिकांनी किती प्रतिसाद दिला हे आपण पाहिलेच. चीनमध्ये वुहान शहरापासून ९०० किमी अंतरावर असलेल्या हाँगकाँगमध्ये नागरिकांनी मात्र, स्वतःची जबाबदारी वेळीच ओळखली. इथे ‘लॉकडाऊन’ नाही किंवा कुठल्याही प्रकारची प्रशासकीय यंत्रणा लोकांनी घरी थांबावे, यासाठी २४ तास राबत नाही. प्रत्येकजण ‘सोशल डिस्टन्सिंग’चे नियम पाळून आपापले काम करत आहे. मग ते ऑफिस असो, मॉल्समध्ये शॉपिंग असो वा रेस्टॉरंटमध्ये आपल्या आवडत्या पदार्थांवर ताव मारणे, सारंकाही अगदी पूर्ववत सुरू आहे.
फक्त इथल्या नागरिकांनी स्वतःला कोरोनासोबत जगण्याची सवय लावून घेतली. सरकारने घालून दिलेले सर्व नियम काटेकोरपणे पाळणे, ‘सोशल डिस्टन्सिंग’चे पालन करणे, स्वच्छता आणि सुरक्षा राखणे या सवयी इथल्या ७४ लाख लोकसंख्या असलेल्या जनतेने अंगीकारल्या आहेत. याच ‘हाँगकाँग मॉडेल’ची जगभर चर्चा आहे. एप्रिलमध्ये ’जर्नल द लैंसेट’मध्ये प्रकाशित माहितीनुसार, हद्दबंदी, क्वारंटाईन, आयसोलेशन, सोशल डिस्टन्सिंग आदींच्या कडक अंमलबजावणीनेच हाँगकाँगमध्ये कोरोना आटोक्यात आला.
तिथे राहणार्या भारतीयांनीच हा अनुभव सांगितला आहे. २००२मध्येही ‘सार्स’ विषाणूने चीनवर आक्रमण केले होते. तेव्हापासूनच तिथले लोक या विषाणूशी दोन हात कसे करायचे हे शिकले. विषाणूचा फैलाव झाल्यानंतर सर्वात आधी करायचे काय, याची माहिती लोकांना पूर्वीपासूनच होती. त्यामुळे कोरोनाचा फैलाव झाल्यानंतर तेथील नागरिकांना समजवण्याची गरज सरकारला भासलीच नाही. सरकार जे आदेश देत होते, त्याचे तंतोतंत पालन आजही केले जाते.
हाँगकाँगमध्ये ‘लॉकडाऊन’ नाही. मात्र, तिथल्या जनतेला आपण काय कृती करायची याची पूर्ण जाणीव आहे. तिथल्या बाजारात, दारुच्या दुकानांमध्ये, रेल्वे स्थानकात झुंबड उडालेली दिसत नाही. लोक आजही मेट्रोमध्ये बिनधास्त प्रवास करतात. मात्र, एकत्र येणे टाळतात. प्रत्येक व्यक्ती सॅनिटायझर स्वतःकडे बाळगतो. सार्वजनिक ठिकाणांवर कडक शिस्तीची स्वच्छता, खबरदारी बाळगत सर्व नियमांचे काटेकोर पालन केले जाते. मास्क वापरण्याचे बंधन लोकांनी स्वतःला लावूनच घेतले आहे. कुठल्याही गोष्टीला स्पर्श केल्यास टीश्यू पेपरचा वापर केला जातो. मास्क आणि टीश्यू वापरून झाल्यानंतर बंद झाकण असलेल्या कचर्याच्या डब्यातच तो फेकला जातो. भारतात जसे ‘आरोग्य सेतू’ अॅप आहे, तसे चीनमध्ये पूर्वीपासूनच तत्सम अॅपचा वापर केला जात आहे. यामुळे कुठल्या भागात प्रवास करावा किंवा करू नये याची माहिती लोकांना मोबाईलवरच मिळू शकते.
शाळा, क्लब, सिनेमागृह, ब्युटीपार्लर हाँगकाँगमध्येही खबरदारीचा उपाय म्हणून बंद आहेत. मात्र, सर्वच ठिकाणी अधिकृत ‘लॉकडाऊन’ घोषित नाही. हॉटेल, मॉल्समध्ये स्क्रीनिंगविना प्रवेश नाही. नियमावलींचे निर्देश देणे व देखरेख करण्यासाठी रोबोर्टचा वापर करण्यात आला आहे. निर्जंतुकीकरणाची फवारणी रोबोर्टद्वारेच केली जाते. हाँगकाँगवासीय काही वेगळे करत नाहीत. सरकारने दिलेल्या सूचनांचेच ते केवळ पालन करतात. उद्योगधंदेही सुरू आहेत. जनजीवनही सुरळीत सुरू आहे. फक्त त्यांनी अवगत केली आहे, कोरोनासोबत जीवन जगण्याची कला...! त्यामुळे एकीकडे चीनला दोषी धरताना उरलेली चार बोटे आपल्याकडेही आहेत, याकडेही दुर्लक्ष करून चालणार नाही.