मात्र रेड झोनमध्ये शिथिलता शक्य होणार नाही; मुख्यमंत्र्यांचे प्रतिपादन
मुंबई : तीन मेनंतर आपण झोननुसार आतापेक्षा अधिक मोकळीक देणार आहोत, अशी ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली. रेड झोनमध्ये काळजी घ्यावी लागेल. रेड झोनमध्ये शिथीलता शक्य होणार नाही, असे मुख्यमंत्री म्हणाले.
आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेशी संवाद साधला. यावेळी उद्धव ठाकरेंनी लॉकडाऊनबाबत भाष्य केले. ते म्हणाले की, ३ मे नंतर काय करायचे हा महत्त्वाचा मुद्दा आहे. आम्ही काय करायचे? किती वेळ घरी बसायचे? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. अर्थचक्र रुतले आहे. बेरोजगारी वाढणार असे सांगितले जात आहे. हे खरे आहे, नाही असे म्हणणे योग्य नाही. पण अर्थासोबत संपत्ती जर म्हणाल तर प्रत्येक राष्ट्राची आणि राज्याची महत्त्वाची आणि खऱी संपत्ती त्यांची जनता असते. त्यांना प्राथमिकता दिली पाहिजे.
शेती-शेतकऱ्यांवर कोणतंही बंधन नाही. बी बियाणे, शेती जशी चालू आहे, तशीच चालू राहील. मालवाहतूक सुरु केली आहे. हळूहळू बंधनं उठवत आहोत. पण झुंबड झाली तर पुन्हा बंधने टाकावी लागतील, असे उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले. तीन तारखेनंतर प्रत्येक झोनमध्ये मोकळीक देऊ, मात्र घाई-गडबड करू नका, अन्यथा सर्व तपश्चर्या वाया जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी नमूद केले. इतर राज्यात जी आपली लोकं अडकली आहेत त्यांना आपण इथे आणणार आहोत. काही लोकं गावी पर्यटनाला, कामसाठी गेले होते ते लॉकडाऊनमुळे तिथेच अडकून आहेत त्यांना सुद्धा लवकरच विचार करुन इथे आणले जाईल, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.
कोणते जिल्हे कोणत्या झोनमध्ये?
रेड झोन :
मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे, पुणे, पालघर, नाशिक, नागपूर, सोलापूर, यवतमाळ, औरंगाबाद, सातारा, धुळे, अकोला, जळगाव
ऑरेंज झोन :
रायगड, अहमदनगर, अमरावती, बुलडाणा, नंदुरबार, कोल्हापूर, हिंगोली, रत्नागिरी, जालना, नांदेड, चंद्रपूर, परभणी, सांगली, लातूर, भंडारा, बीड
ग्रीन झोन :
उस्मानाबाद, वाशिम, सिंधुदुर्ग, गोंदिया, गडचिरोली, वर्धा