मुंबई : नायर दंत महाविद्यालयातील क्वारंटाईन कक्षातील एक जण कोरोना पॉझिटिव्ह आढळला आहे. त्यामुळे येथील कामगारांमध्ये भीतीचे वातावरण आहे. नायर दंत महाविद्यालयात ८ रुग्ण क्वारंटाईन म्हणून दाखल करण्यात आले आहेत. यापैकी २ रुग्णांचे स्वॅब टेस्ट २९ एप्रिलला घेण्यात आले, त्या पैकी एका रुग्णाचा रिपोर्ट गुरुवारी पॉझिटिव्ह आला.
अहवाल पॉझिटीव्ह आलेल्या रुग्णाला नायर दंत महाविद्यालय ते बा. य. ल. नायर रुग्णालय येथे सफाई कामगारांनी एचआयव्ही किट घालून स्ट्रेचरवरून १५ नंबर वॉर्डमध्ये दाखल केले. या क्वारंटाईन कक्षामध्ये प्रत्येक शिफ्टमध्ये १ सफाई कामगार आणि १ सेवक कामगार काम करीत असून रुग्णांची सेवा करीत आहेत, कोणीही डॉक्टर्स अथवा नर्स या कक्षात जात नाही, या कक्षात काम करतांना सुद्धा फक्त एचआयव्ही किट आणि महिन्याला ३ (तीन) एन -९५ मास्क दिले जातात. एन -९५ मास्क ज्या दिवशी वापरणार त्या नंतर तो मास्क उन्हात ठेवायचा आणि तीन दिवसानंतर परत वापरायचा अशा सूचना वरिष्ठांनी कामगारांना केल्या आहेत. जे कामगार रुग्णांची सेवा करीत आहेत, त्या कामगार आणि कुटुंबियांच्या जीवाशी हे प्रशासन खेळत आहे, असा आरोप दि म्युनिसिपल मजदूर युनियनचे चिटणीस प्रदीप नारकर यांनी केला आहे.
कोरोनाबाधित रुग्णाला नायर रुग्णालयात घेऊन जाणारे कामगार फक्त एचआयव्ही किट घालून होते. इतर चतुर्थश्रेणी कामगारांनी गेली काही दिवस त्यांची सेवा केली. त्यांना त्वरित कॉरंटाईन करून स्वॅब टेस्ट घेणे आवश्यक होते. मात्र चतुर्थश्रेणी कामगारांकडे प्रशासन जाणून बुजून कानाडोळा करत असल्याचा आरोप नारकर यांनी केला आहे.