नवीन दृष्टी देणाऱ्या इसापकथा...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    08-Apr-2020   
Total Views |


isap stories_1  


इसाप दृष्टीसंदर्भात काही गोष्टी सांगतो. अशा या इसापच्या समग्र कथांचा विचार केला तर एक गोष्ट मान्य करावी लागते की, या कथा वाचकांना नवीन दृष्टी देणाऱ्या आहेत.


दृष्टी ही माणसाची फार मोठी शक्ती आहे. तसे पाहिले तर परमेश्वराने बहुतेक सर्व प्राण्यांना दृष्टी दिली आहे. दृष्टी असल्यामुळे हे विश्व आपण पाहू शकतो, अनुभवू शकतो.अशाच इसाप दृष्टीसंदर्भात काही गोष्टी सांगतो. एकदा एक गाढव, शेपटी नसलेल्या जातींचा वानर (ज्याला 'एप' म्हणतात) आणि चिचुंद्री आपआपली दुःखे एकमेकांना सांगत होती. गाढव म्हणाले, "मला शिंगे नाहीत, ती असती तर मी माझे रक्षण उत्तमप्रकारे करू शकलो असतो." एप जातीचे वानर म्हणाले, "इतर वानरांना ज्याप्रमाणे शेपट्या असतात, तशी शेपूट मला असती तर मी अधिकच चपळ झालो असतो." यावर चिचुंद्री म्हणते, "तुम्ही जे नाही, त्याबद्दल रडत बसला आहात. आमच्याकडे पाहा. आम्हाला डोळेच नाहीत. आम्हाला काहीच दिसत नाही. मग आम्ही काय करावं?" जन्मांध असणे, हा मोठाच शाप असतो. महाभारताचा एक नायक धृतराष्ट्र जन्माने आंधळा होता. ज्येष्ठ पुत्र असून आंधळेपणामुळे त्याला राज्य मिळाले नाही. पुढे तो राजा होतो. जन्मांधतेबरोबर पुत्रप्रेमानेही तो आंधळाच असतो. आपल्या मुलांचे पापाचरण दिसत असतानाही तो काही करीत नाही. त्यामुळे 'महाभारत' घडते. गांधारी धृतराष्ट्राची पत्नी होती. ती आंधळी नव्हती, पण नवरा आंधळा असल्याने तिने डोळ्यास पट्टी बांधून घेतली होती. सत्य काय आहे, हे ती पाहात नव्हती. नवऱ्याच्या आंधळेपणात ती त्याची सहधर्मचारिणी झाली.

 

आंधळेणाची इसापची आणखी एक कथा आहे. एक म्हातारी बाई होती. तिला डोळ्यांचा विकार झाला होता. तिने डॉक्टरांबरोबर करार केला की, ती जर डॉक्टरांच्या उपचाराने बरी झाली तर तिने डॉक्टरला मोठी फी द्यावी आणि बरी न झाल्यास काहीच द्यायचे नाही. म्हाताऱ्या बाईला काहीच दिसत नसे. डॉक्टरांनी उपचार सुरू केले. उपचार करताना डॉक्टर तिच्या घरातील एकेेक मूल्यवान वस्तू घेऊन जात असे. असे खूप दिवस चालले. उपचार चालू असल्याने त्या बाईच्या डोळ्यावर पट्टी बांधलेली असे. काही महिन्यांनंतर तिच्या डोळ्यावरची पट्टी काढण्यात आली. तिला आता चांगले दिसू लागले होते. तिला आपल्या घरातील नेहमीच्या वस्तू दिसेनात, म्हणून ती म्हणाली, "डॉक्टर, मला काहीच दिसत नाही. माझ्या घरातील नेहमीच्या वस्तूदेखील मला दिसत नाहीत, म्हणून कराराप्रमाणे मी तुम्हाला फी देणार नाही." डॉक्टर तिच्यावर फिर्याद दाखल करतो. कोर्टाला कराराची माहिती देतो. म्हातारी म्हणते, ''असा करार जरूर झाला होता. पण, माझे डोळे कोठे बरे झाले आहेत? पूर्वी मी घरातल्या वस्तू अंधुक-अंधुक तरी पाहू शकत होते. आता त्याही मला दिसत नाहीत. मग मी डॉक्टरांची फी कशी देणार?"

 

कोर्टाने काय समजायचे ते समजून घेतले आणि डॉक्टरला बाईच्या सर्व वस्तू परत करण्याचा आदेश दिला. ज्याला दृष्टी नाही, त्याला फसवू नये, उलट त्याला साहाय्य करावे, हीच मानवता आहे. एक आंधळा रस्त्याच्या कडेला बसला होता. एका पाटीवर त्याने लिहिले होते, "मी आंधळा आहे. मला मदत करा." लोक पाटी पाहात आणि निघून जात. त्याच मार्गाने जाहिरात कंपनीत जाहिराती लिहिणारा एक तरुण चालला होता. जाहिरातीत मोजक्या शब्दांत जबरदस्त संदेश भरावा लागतो. तो आंधळ्याची पाटी वाचतो. त्याच्या समोरच्या भांड्यात दोन-चार नाणी असतात. खिशातून तो मार्कर पेन काढतो. पाटीवर एक वाक्य लिहितो. नंतर ते वाक्य वाचणारा प्रत्येक माणूस आंधळ्याच्या भांड्यात नाणे टाकून निघून जातो. भांडे नाण्याने भरून जाते. आंधळा एका माणसाला विचारतो, "पाटीवर काय लिहिले आहे, हे मला सांगशील का?" तो माणूस मजकूर वाचून दाखवितो. ''आजचा दिवस खूपच छान आहे, तुम्ही पाहू शकता, मी नाही." नुसते डोळे असून काय कामाचे? त्या डोळ्यांना माणसाचे दुःख दिसले पाहिजे. ते वाचता आले पाहिजे. त्या दुःखातून त्याला बाहेर काढता आले पाहिजे. डोळसपणा यालाच म्हणायचा. स्वतःच्या अंधत्वावर मात करणाऱ्या जगप्रसिद्ध महिलेचे नाव आहे हेलेन केलर. ती १९ महिन्यांची असताना तिची दृष्टी गेली आणि तिला बहिरेपण आले. या दोन्ही शारीरिक व्यंगांवर मात करणारी तिची कथा जबरदस्त प्रेरणादायी आहे. 'The Story of My Life' ही तिची आत्मकहाणी प्रेरणादायक आहे. एक मान्यताप्राप्त लेखिका, चळवळ करणारी कर्तृत्ववान महिला म्हणून अमेरिका तिला ओळखते. आपल्या शारीरिक व्यंगावर मात करून जीवन यशस्वी कसे करायचे, याचा वस्तुपाठ म्हणजे तिचे जीवन मानण्यात येते. डोळसपणे व्यवहार करा, ज्याच्याशी आपला काही संबंध नाही, अशा व्यवहारात पडू नका, हे इसाप विविध कथांच्या माध्यमातून सांगताना दिसतो.

 

एक गांधीलमाशी सापाच्या डोक्यावर बसली. तिने चावूनचावून सापाला फार बेजार करून टाकते. तिला डोक्यावरून कसे काढावे, हे सापाला समजेना. इतक्यात रस्त्यावरून बैलगाडी चालली होती. गांधीलमाशीला ठार करण्यासाठी त्याने आपले डोके चाकाखाली ठेवली. चाकाखाली गांधीलमाशी आणि साप दोघेही ठार झाले. याला म्हणतात, आंधळा सूड. माझे काहीही झाले तरी चालेल. पण, मी माझ्या शत्रूला मारूनच राहीन, असा विचार आंधळा विचार असतो. 'दिसतं तसं नसतं' अशी मराठी भाषेतील म्हण आहे. वास्तविकता आणि आभास यांच्यातील फरक बघण्यास माणसाने शिकले पाहिजे. इसाप सांगतो, "एका कबुतराला खूप तहान लागलेली असते. पाण्याने भरलेल्या हंड्याचे चित्र तो पाहतो. हे चित्र हुबेहूब असते. पाणी पिण्यासाठी तो त्यावर झडप मारतो. चित्रावर आपटतो. जखमी होतो आणि खाली पडतो. रस्त्याने जाणारा माणूस त्याला खाण्यासाठी घेऊन जातो. आभासी सत्यात फसू नये. इसापच्या समग्र कथांचा विचार केला तर एक गोष्ट मान्य करावी लागते की, या कथा वाचकांना नवीन दृष्टी देणाऱ्या आहेत.

 
 
 
@@AUTHORINFO_V1@@