कडकडा कडाडे बिजली, शत्रूची लष्करे थिजली

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

Total Views |


the war queen_1 &nbs


जोनाथन जॉर्डन आणि एमिली जॉर्डन यांनी एक वेगळी वाट धरली आहे. आपल्याकडे कुणी त्या वाटेवरून चालेल का?



‘मिलिटरी हिस्ट्री’, लष्करी किंवा सैनिकी इतिहास हा प्रकारच आपल्याकडे फारसा रुढ नाही. संपूर्ण जगातला प्राचीनतम ग्रंथ म्हणजे ऋग्वेद. त्यात युद्धाचे उल्लेख येतात. शत्रूंवर विजय मिळावा म्हणून इंद्र, वरुण आदी देवतांच्या प्रार्थना येतात, पण युद्धांचे तपशील येत नाहीत. धनुर्वेद हा एकंदर युद्धशास्त्राचा सांगोपांग विचार करणारा ग्रंथ म्हणजे यजुर्वेदाचा उपवेद आहे. पण, त्यातही युद्धांचे तपशील नाहीत. रामायण-महाभारतात युद्धांचे तपशील बर्‍याच प्रमाणात आहेत. पण, ते एकंदर कथानकाच्या ओघात येतात, एवढंच. कारण, वाल्मिकी आणि व्यास आपल्यासमोर ‘रघुवंश’ आणि ‘कुरुवंश’ यांची समग्र कथा मांडत असतात. युद्ध हा त्यातला फक्त एक भाग असतो. ‘कथासरित्सागर’ हा प्राचीन भारतातल्या हजारो कथा सांगणारा एक खरोखरचा सागरासारखा विशाल ग्रंथ आहे. तो अकराव्या शतकात रचला गेला असावा, असा अंदाज आहे. त्यात वत्स देशाचा राजा उदयन याची कथा येते. त्या कथेवरून संस्कृत महाकवी भास याने ‘स्वप्नवासवदत्तम’ हे नाटक रचले. खरं पाहाता हे नाटक एक उत्कृष्ट राजकीय-लष्करी नाटक होऊ शकलं असतं. पण, भासाने त्याची प्रेमकथा बनवली आहे. असं का? माहीत नाही. आधुनिक काळातही, आपल्याकडे गेल्या शंभर वर्षांमध्ये भरपूर इतिहास संशोधन आणि लेखन झालं. आजही होत आहे. पण, ज्याला निखळ सैनिकी इतिहास म्हणजे विविध युद्धं, लढाया, मोहिमा, स्वार्‍या यांचा युद्धशास्त्राच्या अंगाने वेध घेऊन, अभ्यास करून भाषण, शोधपत्र, ग्रंथ याद्वारे मांडणी करणं, असं फारसं होताना दिसत नाही. भारतीय लेखकांची प्रतिभा आणि भारतीय वाचकांची आवड या कथा-कादंबरीतच रमून गेलेल्या दिसतात.
 
पाश्चिमात्त्य देश या क्षेत्रातही खूप पुढे आहेत. सैनिकी इतिहास लिहिणारे असंख्य लेखक आणि लेखिकासुद्धा तिथे आहेत. हे लोक सपाटून अभ्यास करतात आणि मग त्यावर आधारित दर्जेदार ग्रंथनिर्मिती करतात. उदाहरणार्थ, बार्बारा टक्मन ही महिला पत्रकार पाहा. बार्बाराचा बाप एक धनाढ्य अमेरिकन बँकर होता आणि आजोबा अमेरिकेचा इस्तंबूलमधला राजदूत होता. अशा श्रीमंतांच्या पोरीपुढे ‘विशाल महिला मंडळा’च्या सभासद बनतात आणि नवर्‍याच्या पैशावर चारी ठाव गिळत समाजकार्य वगैरे करतात, अशी साधारण पद्धत दिसते. पण, बार्बारा पत्रकार बनली. इतिहास अभ्यासक बनली. ‘युद्धांचा इतिहास’ हा तिच्या विशेष संशोधनाचा विषय बनला. युद्धं आणि त्यामागचं राजकारण या विषयांवर अतिशय उत्कृष्ट असे ग्रंथ तिने लिहिले. १९६३ साली अतिशय प्रतिष्ठेचं असं ‘पुलित्झर’ पारितोषिक तिच्या ‘गन्स ऑफ ऑगस्ट’ या ग्रंथाला मिळालं. आपल्याकडे असं एकही नाव नाही. मुळात लेखिका ‘इतिहास’ विषयाकडे वळण्याचीच मारामार, तिथे युद्धांच्या इतिहासाकडे कोण बघणार? इथे मुद्दाम एक गोष्ट सांगायला हवी. १९४५ ते १९५५ अशी दहा वर्षे बार्बारा टक्मनने पूर्णपणे आपल्या तीन मुलींना वाढवण्यासाठी दिली. पण, हे काम करतानाच तिचं ब्रिटन आणि पॅलेस्टाईन यांच्या राजनैतिक संबंधांबाबत चिंतनही सुरू होतं. त्यातून १९५६ साली तिचं ‘बायबल अ‍ॅण्ड स्वोर्ड’ हे पुस्तक निर्माण झालं.
 
असो. तर जोनाथन जॉर्डन या अमेरिकन युद्ध इतिहासकाराचं ‘दि वॉर क्वीन्स’ असं पुस्तक नुकतंच प्रकाशित झालं आहे. विशेष म्हणजे, त्यात त्याची सहलेखिका आहे त्याची मुलगी एमिली जॉर्डन. ही एमिली चक्क नर्सिंग शिकते आहे. पण, एकीकडे बापामुळे तिलाही इतिहासाची आवड असून ती इतिहासाचाही अभ्यास करते. बाप लेखक आणि मुलंही लेखक, अशी उदाहरणं मुळातच कमी. त्यात दोघांनी एकत्र लेखन करणं फारच कमी; आणि बाप आणि मुलगी यांनी युद्धेतिहासासारख्या गंभीर विषयात लेखन करण्याचं कदाचित हे पहिलंच उदाहरण असेल. ‘दि वॉर क्वीन्स’मध्ये जॉर्डन पिता-पुत्रींनी जगभरच्या महिला युद्धनेत्यांची माहिती दिली आहे. यात प्राचीन काळच्या क्लिओपात्रापासून थेट मार्गारेट थॅचर यांच्यापर्यंतच्या अनेक खंबीर महिलांची माहिती आहे. आपल्याला इजिप्तची राणी क्लिओपात्रा म्हटल्यावर, ज्युलियस सीझर आणि मार्क अँटनी यांना आपल्या मोहपाशात जखडणारी क्लिओपात्राच फक्त आठवते. कारण, हॉलिवूडच्या ‘क्लिओपात्रा’ या भव्य चित्रपटाने आपल्याला तेवढीच क्लिओपात्रा दाखवलेली आहे. पण, प्रत्यक्षात ती कुशल सेनापतीसुद्धा होती, ही माहिती नवीनच आहे. यात १९७१च्या भारत-पाक युद्धात भारताच्या पंतप्रधान असणार्‍या इंदिरा गांधींची माहिती आहे. १९८२ साली ब्रिटन आणि अर्जेंटिना यांच्यात झालेल्या फॉकलंड युद्धात, ब्रिटनच्या पंतप्रधान असणार्‍या मार्गारेट थॅचर यांची माहिती आहे.
 
पण, लेखकद्वय स्वतःच एलिझाबेथ ट्युडर आणि गोल्डा मायर या दोघींच्या प्रेमात पडल्यासारखे वाटतात. कारण, त्यांनी या दोघींवर भरभरून लिहिलं आहे. एलिझाबेथ ट्यूडर म्हणजेच सोळाव्या शतकातली इंग्लंडची राणी एलिझाबेथ पहिली. ती ट्युडर घराण्यातली होती. सध्याची राणी एलिझाबेथ दुसरी ही विंडसर घराण्यातली आहे. पहिल्या एलिझाबेथच्या कारकिर्दीतच इंग्लंडची भरभराट होत गेली. फ्रान्सिस ड्रेक या चाच्याला म्हणजे समुद्री डाकूला तिने ‘सर’ ही पदवी दिली आणि इंग्लिश आरमाराचा अधिकृत दर्यासारंग या नात्याने इंग्लंडच्या शत्रूंची गलबतं लुटण्याची नि बुडवण्याची मुभा दिली. डे्रकने इंग्लंडचा मुख्य शत्रू जो स्पेन याच्याशी बेधडक टक्कर घेतली. सन १५८५-८६ या काळात त्याने कॅरेबियन समुद्रातलं स्पेनचं वर्चस्व मोडून काढलं. पण, स्पेनचा राजा फिलीप दुसरा याने खुद्द इंग्लंडवरच आरमारी हल्ला चढवण्याचा बेत आखून, स्पेनच्या दक्षिणेकडच्या काडिझ या नामवंत बंदरात मोठी आरमारी तयारी चालवली होती. १५८७ साली ड्रेकने सरळ काडिझवरच हल्ला चढवून स्पॅनिश रमाराची जबर हानी केली. चवताळलेल्या स्पॅनिश दर्यासारंगांनी प्रचंड आरमारी काफिल्यानिशी जुलै १५८८ मध्ये इंग्लंडचा मोहरा धरला. २९ जुलै, १५८८ या दिवशी इंग्लिश आरमार आणि ‘स्पॅनिश आर्माडा’ या नावाने प्रसिद्ध असलेलं हे अवाढव्य स्पॅनिश आरमार यांची घनचक्कर लढाई झाली आणि स्पेनचा दणदणीत पराभव झाला. जगातली सागरी महाशक्ती म्हणून इंग्लंडचा उदय झाला नि स्पेन माघारला. ८ ऑगस्ट, १५८८ या दिवशी एलिझाबेथने टिलबरी या ठिकाणी आपल्या विजयी सैनिकांसमोर विजयी भाषण केलं. जगातल्या प्रसिद्ध भाषणांपैकी हे एक भाषण समजलं जातं.
 
यातला महत्त्वाचा भाग म्हणजे इंग्लिश आरमाराची सर्वोच्च प्रमुख म्हणून एलिझाबेथ या मोहिमेच्या प्रत्येक बारीक-सारीक बाबीवर लक्ष ठेवून होती. आरमाराच्या सार्‍या हालचाली तिच्या सल्ल्याने आणि आज्ञेनेच केल्या जात होत्या. राजवाड्यातला तिचा महाल हीच ‘वॉर रूम’ बनली होती. असंख्य नकाशे तिने बारकाईने अभ्यासले. नौकानयन विद्या समजून घेतली, डावपेच समजून घेतले नि लढवले. अंगावर चिलखत चढवून ती प्रत्यक्ष लढाईत उतरली नाही, एवढंच. साहजिकच इंग्लिश जनतेची ती एकदम आवडती बनली. जॉर्डन पिता-पुत्रीने भरभरून लिहिलेली दुसरी हिंमतवाली महिला म्हणजे इस्रायलच्या पंतप्रधान गोल्डा मायर. गोल्डा या मूळच्या युक्रेनची राजधानी कीव्ह इथल्या. त्यांचा जन्म १८९८ सालचा. १९०६ साली त्यांच्या वयाच्या आठव्या वर्षी त्यांच्या वडिलांनी अमेरिकेत स्थलांतर केलं. अत्यंत सामान्य स्थितीतून संघर्ष करीत गोल्डा मोठ्या झाल्या. १९२१ साली त्या आपल्या पतीसह तत्कालीन पॅलेस्टाईनमध्ये स्थलांतरित झाल्या. १९२१ ते १९४८ हा काळ ज्यू लोकांसाठी अत्यंत खडतर होता. गोल्डा उत्तम संघटक होत्या. त्यामुळे ज्यूंचे नेते डेव्हिड बेन गुरियान त्यांच्यावर एक-एक जबाबदारी टाकत गेले आणि गोल्डा त्या जबाबदार्‍या यशस्वी करून वर-वर चढत गेल्या. १९४८ साली ज्यूंना पॅलेस्टाईनमध्ये इस्रायल हे स्वतंत्र राष्ट्र मिळणार हे नक्की झालं. त्याचबरोबर आजूबाजूचे अरब देश या राष्ट्रावर लष्करी आक्रमण करणार, हेही नक्की झालं. डेव्हिड बेन गुरियान यांनी गोल्डाबाईंवर एक अवघड कामगिरी सोपवली. ट्रान्सजॉर्डन (आताचा जॉर्डन) या देशाचे सुलतान अब्दुल्ला यांना भेटायचं आणि इतर अरब देशांपासून त्यांना फोडायचं. गोल्डाबाई अरब महिलेचा वेष घेऊन थेट अब्दुल्लांच्या राजवाड्यात शिरल्या. अब्दुल्ला थक्क झाले. वाटाघाटी सुरू झाल्या. १४ मे, १९४८ या दिवशी इस्रायल स्वतंत्र होणार होता. अब्दुल्ला म्हणाले, “स्वातंत्र्य जाहीर करण्यासाठी थोडं थांबा.” गोल्डाबाई तडकून म्हणाल्या, “गेली दोन हजार वर्षे आम्ही थांबलोत. आणखी किती थांबू?”
 
 
६ ऑक्टोबर, १९७३ या दिवशी अरब देशांनी इस्रायलवर आकस्मिक हल्ला चढवला. इस्रायली फौजा मार खाऊ लागल्या. संरक्षणमंत्री मोशे दायान हा खरं म्हणजे कसलेला सेनापती. पण, तो सुद्धा हडबडला. पंतप्रधान गोल्डाबाई यावेळी ७५ वर्षांच्या होत्या. अवघे पाऊणशे वयमान असलेली ही आजी त्या कसोटीच्या दिवसात खडकासारखी कणखर आणि ठामपणे उभी राहिली. तिचं कार्यालय हीच ‘वॉर रूम’ झाली. रात्ररात्र जागत, कॉफीचे कपामागून कप रिचवत, संरक्षणमंत्री मोशे दायान आणि प्रत्यक्ष आघाडीवरच्या प्रत्येक सेनापतींशी फोनवरून संपर्क करीत अखेर तिने डाव उलटवला. इस्रायली सैन्याची फुटू पाहणारी फळी सावरली, सरसावली आणि त्यांनी प्रत्याक्रमण सुरू केलं. हा विजय निःसंशय गोल्डाबाईंच्या खंबीर नेतृत्वाचा होता. जोनाथन जॉर्डन आणि एमिली जॉर्डन यांनी एक वेगळी वाट धरली आहे. आपल्याकडे कुणी त्या वाटेवरून चालेल का?

 
@@AUTHORINFO_V1@@