मुंबई : बेस्ट वसाहतीतील रिकाम्या जागा कोरोना संशयितांच्या क्वारंटाईनसाठी देण्यात येणार असल्याचे समजताच येथील रहिवासी महिलांनी त्याला तीव्र विरोध केला आहे. बेस्ट उपक्रमातील कामगारांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे आधीच धास्तावलेल्या कर्मचाऱ्यांसमोर नवे संकट उभे राहिले आहे. बेस्ट कामगारांसाठी असलेल्या वसाहती कोरोना संशयित रुग्णांना क्वारंटाईन करण्यासाठी वापरण्यात येणार असल्याचे समजताच वसाहतीत राहणारे बेस्ट कामगार व कुटुंबीयांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. भोईवाडा बेस्ट वसाहतीतील महिलांनी याला तीव्र विरोध केला आहे.
कोरोना पाॅझिटिव्ह अथवा संशयित रुग्ण असल्याचे कळताच संबंधित वसाहतीतील रहिवासी त्यांना प्रवेश करण्यास मज्जाव करत असल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. परळ वसाहतीत राहणाऱ्र्या एका कुटुंबातील मुलीला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले होते. वडाळा बस आगारात फोरमन पदावर कार्यरत असलेल्या कामगाराचा कोरोनामुळे मृत्यू झाला. तर गोरेगाव डेपोतील दोन कामगार कोरोना पाॅझिटिव्ह आढळले. त्यामुळे बेस्ट वसाहतीतील रहिवासी आधीच भीतीच्या वातावरणात आहेत. अशातच बेस्ट प्रशासनाने भोईवाड येथील वासाहतीतील रिकाम्या खोल्यात कोरोना संशयित रुग्णांना क्वारंटाईन करण्यात येणार आहे. त्याला रहिवासी महिलांनी विरोध केला.
या वसाहतीत रिकाम्या असलेल्या खोल्या बेस्ट कर्मचाऱ्यांच्या विश्रांतीसाठी देण्यास काही हरकत नाही पण क्वारंटाईन व कोरोना संशयित रुग्ण ठेवण्यास विरोध दर्शवल्याचा व्हिडियो व्हायरल झाला आहे. आम्ही येथे कुटुंबासह राहत असून जे कामगार बदलापूर, कल्याण येथून येऊन आपली जबाबदारी पार पाडत आहेत. त्या कामगारांना या रिकाम्या खोल्या उपलब्ध करुन द्या, अशी मागणी भोईवाडा बेस्ट वसाहतीतील महिलांनी केली आहे. बेस्ट प्रशासनाने क्वारंटाईन किंवा संशयित कोरोना रुग्ण वसाहतीत ठेवू नये. ठेवायचे असतील तर पालिकेने इतर अनेक ठिकाणी व्यवस्था केली आहे तिथे त्यांना ठेवावे, अशी विनंती बेस्ट उपक्रमाला या महिलांनी केली आहे. यासंबंधी सत्यता पडताळून पाहण्यासाठी बेस्ट उपक्रमाच्या वेल्फेअर विभागाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही.