शेर्पा तेनसिंग नोर्गे आणि एडमंड हिलरी यांनी एव्हरेस्टवर पाय ठेवला. त्यामुळे अधिकृतपणे या दोघांनाच पहिले ‘एव्हरेस्टवीर’ मानले जाते. पुढच्या वर्षी म्हणजे २०२१ साली, पहिल्या एव्हरेस्ट मोहिमेला १०० वर्षे पूर्ण होतील. ते प्रयोजन धरून स्कॉट एल्सवर्थ या लेखकाने ‘द वर्ल्ड बेनेथ देअर फीट’ या नावाचं गिर्यारोहणाचा १०० वर्षांचा इतिहास सांगणारं पुस्तकच लिहिलं आहे.
‘मॉन्ट ब्लँक’ हे नाव ऐकलंय तुम्ही? सध्या ते जगातलं सगळ्यात महाग पेन समजलं जातं. एकेकाळी ‘पार्कर’, ‘शीफर्स’, ‘पायलट’ या कंपन्यांची पेनं सर्वात भारी समजली जात असत. आता ‘मॉन्ट ब्लँक’ने ते स्थान पटकावलं आहे. पण मुळात ‘मॉन्ट ब्लँक’ हे काय आहे? तर युरोपातल्या आल्प्स पर्वताच्या सर्वोच्च शिखराचं ते नाव आहे. फ्रान्स आणि इटली या देशांची सरहद्द ‘मॉन्ट ब्लँक’ वरुनच जाते. त्यामुळे ते दोन्ही देशांच्या मालकीचं आहे. फ्रे्रंच भाषेत त्याचं नाव ‘मॉ ब्ला’ असं होतं, तर इटालियन भाषेत त्याचा उच्चार ‘मॉन्टे बिआन्को’ असा होतो. जगातल्या सर्वोच्च शिखरांच्या क्रमवारीत अकराव्या क्रमांकावर असणार्या या शिखराची उंची ४८०८ मीटर्स किंवा १५,७७४ फूट आहे. आधुनिक पर्वतारोहण क्रीडेचा इतिहास या शिखरापासूनच सुरू होतो. जगात सर्वत्र लहान-मोठे पर्वत आहेत. पर्वत शिखरांच्या खालून जाणार्या वाटांवर लक्ष ठेवण्यासाठी किल्ले म्हणजे दुर्ग बांधण्याची पद्धत किमान अडीच हजार वर्षांपूर्वीची नक्कीच आहे. कारण, अडीच हजार वर्षांपूर्वी लिहिल्या गेलेल्या आर्य चाणक्याच्या अर्थशास्त्रात गिरीदुर्गांचं वर्णन आहे. पण, दुर्ग बांधण्याव्यतिरिक्त उगीचच एखाद्या उत्तुंग पर्वतशिखरावर माणसं चढून गेली आहेत, असं फारसं घडत नसे. हा असे प्रसंग नक्कीच आहे की, एखादं रमणीय, एकाकी शिखर पाहून एखाद्या तपस्वी बैराग्याला तिथे तपाचरण करण्यासाठी बसावं असं वाटे. क्वचित तो त्या ठिकाणी आपल्या उपास्य दैवताचं म्हणजे बहुधा शिवाचंच एखादं लिंग स्थापन करीत असे आणि मग परिसरातल्या सर्वसामान्य जनतेसाठी ते उत्तुंग शिखर एक तीर्थस्थान बनून जात असे. पण, म्हणजे लोक तिथे जायचे किंवा आजही जातात ते धार्मिक-आध्यात्मिक प्रेरणेने, अन्यथा अशा उत्तुंग शिखरांना खालून जमिनीवरून हात जोडून नमस्कारच करण्याची प्रथा आहे.
तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण ही प्रथा फक्त भारतातच होती असं नव्हे, तर जगभर होती. उत्तुंग पर्वतशिखरावर देवांचं निवासस्थान असतं, तेव्हा आपण त्या ठिकाणाला पाय लावता कामा नये, अशी समजूत जगातल्या सर्व प्राचीन संस्कृतींमध्ये आढळते. पाश्चिमात्य देशांमध्ये ग्रीक ही सर्वात जुनी संस्कृती समजली जाते. ग्रीस देशात ऑलिंपस पर्वताच्या मिटिकस या सर्वोच्च शिखरावर देव राहतात, असं मानलं जात असे. देवांचा राजा झ्यूस याच्या वार्षिक उत्सवात जे खेळ किंवा स्पर्धा व्हायच्या, तेच ऑलिम्पिक खेळ! म्हणजेच इथेही त्या डोंगरावर झ्यूस देवाचं देऊळ होतं, म्हणून लोक जायचे. उगीच गंमत म्हणून नव्हे. अशा स्थितीत १७५७ साल उजाडलं. त्यावर्षी होरेस बेनेडिक्ट डि सॉस्यू नावाच्या इसमाला वाटलं की, सालं हे काही खरं नाही. या ‘मॉ ब्ला’ शिखराच्या परिसरात आपल्या पिढ्यान्पिढ्या गेल्या. आपण ‘मॉ ब्ला’चं दैवी सौंदर्य डोळे भरभरून पाहतो, पण आपण अजून त्याच्या माथ्यावर गेलेलो नाही. त्याच्या माथ्यावर चढताना कसं वाटतं? त्याच्या माथ्यावरून आजूबाजूचं जग कसं दिसतं? आपण हे कधीच अनुभवलं नाही. आपण का, कुणीच हे पाहिलेलं नाही. कारण काय, तर म्हणे ‘मॉ ब्ला’च्या माथ्यावर देव राहतात, तिथे माणसाने जायचं नाही. कोण होता हा होरेस बेनेडिक्ट? तो एक स्विस शास्त्रज्ञ होता. भौतिकशास्त्र, भूगर्भशास्त्र यांसह अनेक वैज्ञानिक विषयांवर तो सतत चिंतन करीत असे. आधुनिक उल्काशास्त्राचा तर तोच जनक मानला जातो. आल्प्स पर्वतात तो खूप भटकायचा. प्रत्यक्ष प्रयोग करायचा. १७५७ साली त्याने ‘मॉ ब्ला’ पर्वत शिखरावर चढण्याचा प्रयत्न केला, पण तो फसला. मग त्याने वारंवार प्रयत्न केले, पण ते अयशस्वी ठरले. त्याला मानवी स्वभावाचंही चांगलं ज्ञान होतं. त्यामुळे त्याने ‘मॉ ब्ला’च्या माथ्यावर पाय ठेवणार्या माणसासाठी चक्क बक्षिस जाहीर केलं. आता अनेक जण पुढे येऊन प्रयत्न करू लागले. तब्बल २९ वर्षांनी म्हणजे १७८६ साली झाक बालमात आणि मायकेल गॉब्रियल पॅकार्ड या दोघांनी ‘मॉ ब्ला’च्या माथ्यावर पाय ठेवण्यात यश मिळवलं. माऊंटेनिअरिंग उर्फ पर्वतारोहण या आधुनिक क्रीडाप्रकाराची ही सुरुवात होती. आता पर्वतारोहण करण्यातला धार्मिक समजुतींचा भाग मागे पडला आणि अनेक धाडसी लोक आल्प्स पर्वताच्या ‘मॉ ब्ला’सह इतरही शिखरांवर चढाई करण्यासाठी अहमहमिकेने पुढे येऊ लागले. गिर्यारोहणासाठी विविध प्रकारचे दोर, बूट, बूटांच्या तळांना लावण्याचे खिळे, पाठपिशव्या म्हणजे हॅवरसॅक, रकसॅक इत्यादी साधनं मिळू लागली. हळूहळू इथेही फे्ंरड, स्विस, ब्रिटिश, स्पॅनिश गिर्यारोहकांमध्ये स्पर्धा सुरू झाली.
या स्पर्धात्मक गिर्यारोहणातही ब्रिटनने बाजी मारली. जगातला पहिला गिर्यारोहण क्लब लंडनमध्ये स्थापन झाला. २२ डिसेंबर, १८५७ या दिवशी लंडनच्या अॅशले हॉटेलमध्ये काही हौशी गिर्यारोहक मित्रांनी एकत्र येऊन ‘आल्पाईन क्लब’ स्थापन केला. एक खेळ म्हणून, डोंगर चढण्याचा आनंद घेण्यासाठी, गिर्यारोहण करणार्या हौशी लोकांचा हा क्लब आजही लंडनच्या शोअरडिच परिसरात विद्यमान आहे. खरं म्हणजे त्या वेळेपर्यंत भारत इंग्रजांच्या ताब्यात आलेला होता. इतकंच नव्हे, तर ईस्ट इंडिया कंपनीच्या ‘सर्व्हेअर जनरल ऑफ इंडिया’ने १८०२ सालापासूनच भारताच्या भूभागाचं शास्त्रीय सर्वेक्षण सुरू केलं होतं. पण, तरीही ब्रिटनमधल्या हौशी गिर्यारोहकांचं लक्ष असून हिमालयाकडे वेधल गेलं नव्हतं. अजून ते आल्प्स पर्वताच्या प्रांगणातच वावरत होते. म्हणून क्लबचं नाव ‘आल्पाईन क्लब.’ गंमत म्हणजे, १८५७ सालीच भारताचा सर्व्हेअर जनरल अॅन्ड्र्यू वॉ याने लंडनच्या रॉयल जिओग्राफिकल सोसायटीला सूचना केली की, हिमालयाचं सर्वोच्च शिखर जे २९००२ फूट उंच आहे, म्हणजेच जगातलं सर्वोच्च शिखर आहे, त्याला ‘माऊंट एव्हरेस्ट’ असं नाव द्यावं. का, तर वॉ च्या आधीचा सर्व्हेअर जनरल सर जॉर्ज एव्हरेस्ट याच्या सन्मानार्थ. सर जॉर्ज एव्हरेस्ट यावेळी निवृत्त होता, पण जीवंत होता. त्याने या सूचनेला विरोध केला आणि असं म्हटलं की, माझं नाव देऊ नये. कारण, भारतीय लोक माझ्या नावाचा नीट उच्चार करणार नाहीत. बर्याच विलंबाने म्हणजे १८६५ साली जिओग्राफिकल सोसायटीने अखेर ‘माऊंट एव्हरेस्ट’ हेच नाव नक्की केलं. पण सर जॉर्ज एव्हरेस्टची भीती खरी ठरली. त्याच्या नावाचा योग्य उच्चार ‘ईव्हरीस्ट’ असा होतो, पण खुद्द इंग्लिश लोकांखेरीज अख्खं जग ‘एव्हरेस्ट’च म्हणतं. आता हळूहळू इंग्रजांचं लक्ष हिमालयाकडे वळलं. त्यांच्या वृत्तीनुसार हिमालयातली नेपाळ, भूतान, सिक्कीम, तिबेट आदी राज्ये आणि मग हिमालयापलीकडच्या चीनशी जमिनीवरून व्यापारी मालवाहतूक करू शकणारे रस्ते, यांत त्यांना मुख्य रस होता. सुरुवातीला व्यापारी वाहतूक आणि मग लष्करी वाहतूक हा इंग्रजांचा ठराविक क्रम असायचा. त्यामुळे गिर्यारोहण म्हणून जगातल्या सर्वोच्च शिखरावर-एव्हरेस्टवर-चढाईची पहिली मोहीम आखायला इंग्रजांना १९२१ उजाडलं.
तरीही या पहिल्या मोहिमेची सगळी सूत्रं एका लष्करी अधिकार्याच्याच हातात होती. लेफ्टनंट कर्नल चार्लस् हॉवर्ड-बरी हा सैनिक तर होताच, पण तो उत्तम गिर्यारोहक, संशोधक आणि वनस्पतीशास्त्रज्ञही होता. त्याच्या जोडीला होता प्रख्यात गिर्यारोहक जॉर्ज मॅलरी. या लोकांनी तिबेटच्या बाजूने एव्हरेस्टकडे प्रस्थान ठेवून २२,९७० फुटांपर्यंत चढाई केली. या मोहिमेत त्यांनी विविध प्रकारची निरीक्षण करून ती पद्धतशीर नोंदवली. भौगोलिक, भूगर्भशास्त्रीय, हवामानविषयक, वनस्पती आणि प्राणीविषयक अशा या नोंदींचा पुढच्या मोहिमांना अर्थातच उपयोग झाला. १९२४ साली जॉर्ज मॅलरी आणि अॅन्ड्र्यू आयर्विन यांनी एव्हरेस्टवर पाय ठेवला असावा, असा संभव आहे. पण परतीच्या प्रवासात भयंकर हिमवादळात हे दोघेही बेपत्ता झाले. त्यामुळे नक्की सांगता येत नाही. नंतर २९ वर्षांनी म्हणजे १९५३ साली शेर्पा तेनसिंग नोर्गे आणि एडमंड हिलरी यांनी एव्हरेस्टवर पाय ठेवला. त्यामुळे अधिकृतपणे या दोघांनाच पहिले ‘एव्हरेस्टवीर’ मानले जाते. पुढच्या वर्षी म्हणजे २०२१ साली, पहिल्या एव्हरेस्ट मोहिमेला १०० वर्षे पूर्ण होतील. ते प्रयोजन धरून स्कॉट एल्सवर्थ या लेखकाने ‘द वर्ल्ड बेनेथ देअर फीट’ या नावाचं गिर्यारोहणाचा १०० वर्षांचा इतिहास सांगणारं पुस्तकच लिहिलं आहे. यानिमित्ताने जायलिंग नोर्गे म्हणजे शेर्पा तेनसिंगचा मुलगा काय म्हणतो पाहा. जायलिंग म्हणतो, “हल्ली एव्हरेस्टवर जाणं हा धंदा झालाय. त्यातला सगळा थरार संपलाय. ज्याच्या खिशात ६५ हजार ते १ लाख डॉलर्स आहेत, असा कुणीही उठतो नि तिथे जातो.”