मुंबई : पालघर हिंदू साधूंच्या हत्येप्रकरणी विश्व हिंदू परिषदेच्या संतानी आज महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतली आणि दोषींना कठोर शिक्षा करण्याची मागणी केली. मुंबईतील राजभवनात येथे झालेल्या या बैठकीत विश्व हिंदू परिषदेच्या केंद्रीय मार्गदर्शक मंडळाचे हे तीन महंत सदस्य महामंडलेश्वर स्वामी विश्वेश्वरानंद महाराज, स्वामी शंकरानंद महाराज आणि स्वामी सुखदेवानंद महाराज यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान पालघर साधूंच्या हत्येच्या विरोधातील भूमिकेबाबत देखील राज्यपालांना माहिती दिली.
१६ एप्रिल रोजी एक चालक आणि दोन साधूंना शंभर एक लोकांनी अमानुष मारहाण करत जीवे मारल्याची घटना काही दिवसांपूर्वी पालघरमध्ये घडली होती. पोलीसांनी कारवाई करत याविरोधात गुन्हा दाखल केला मात्र, आता ज्याप्रकारे या साधूंना अमानुष मारहाण करण्यात आली होती. त्याचा व्हीडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यानंतर अनेकांनी तीव्र प्रतिक्रीया व्यक्त केल्या. याच घटनेचा निषेध करत विश्व हिंदू परिषदेच्या महंतांनी राज्यपालांची भेट घेतली.