गृहमंत्री अनिल देशमुख यांची माहिती
मुंबई : लॉकडाऊन काळात नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाधवान कुटुंबीयांचा क्वारंटाईन कालावधी समाप्त होत आहे. तत्पूर्वीच आम्ही अंमलबजावणी संचालनालय कार्यालयाला कळवले आहे. त्यामुळे हा कालावधी संपताच वाधवान कुटुंबीय हे अंमलबजावणी संचालनालयाच्या ताब्यात देण्यात येईल, अशी माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे. महाराष्ट्रात कायदा मोडणारी कोणतीही व्यक्ती कायद्याच्या कचाट्यातून सुटणार नाही. तसेच, या आधी जसे काही लोक लंडनला पळून गेले तसे पळून जाणार नाहीत याची महाराष्ट्र सरकार पुरेपूर काळजी घेईन, असेही अनिल देशमुख यावेळी म्हणाले.
'सीबीआयचे अधिकारी दुपारी दोन वाजेपर्यंत त्यांना नेतील, तोपर्यंत वाधवान कुटुंब आमच्या ताब्यात राहतील. त्यांची पुढील चौकशी सीबीआय करेल. १५ दिवसांपासून ते क्वारंटाइनमध्ये आहेत. मधल्या काळात लंडनला पळाल्याचे म्हटलले गेले’, ते चुकीचे असल्याचेही गृहमंत्री म्हणाले.
लॉकडाऊन काळात महाबळेश्वरला फिरायला गेलेल्या वाधवान कुटुंबीय आणि आणखी २३ जणांवर कारवाई करत त्यांना पाचगणी इथे क्वारंटाईन करण्यात आले होते. लॉकडाऊन काळात नियमांचे उल्लंघन केलेले हे कुटुंब बँक घोटाळा प्रकरणातही अडकलेले आहेत.