मुंबईतील पाणीगळती रोखण्यासाठी...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    21-Apr-2020   
Total Views |


mumbai pipeline_1 &n


 
सध्या ‘लॉकडाऊन’मुळे देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईतील उद्योगधंदे बंद असल्यामुळे उद्योगांचे पाणी निवासी भागाकरिता पालिकेने वळवले आहे. परंतु, आजही मुंबईत पाणीगळतीचे प्रमाण फारसे कमी झालेले नाही. तेव्हा, मुंबईतील एकूणच पाणीपुरवठा आणि पाणीगळती रोखण्यासाठीच्या उपाययोजना यांचा सविस्तर आढावा घेणारा हा लेख...


मुंबई महानगरपालिकेने पाणीपुरवठ्यासाठी प्रचंड जलवितरण व्यवस्था उभी करुन अनेक ठिकाणी रस्त्याखालून जलवाहिन्या टाकल्या आहेत. परंतु, या वाहिन्या अनेक वर्षं जुन्या असल्यामुळे त्यातून पाण्याची गळती होत आहे. मुंबईकरांना दररोज जलवितरणातून ३,८५० दशलक्ष लिटर प्रक्रिया केलेल्या शुद्ध पाण्याचा पुरवठा केला जातो. या जलवितरण व्यवस्थेत अनेक त्रुटी राहिल्याने सुमारे २५ टक्के पाणी गळतीमध्ये वा चोरी होऊन फुकट जाते. म्हणजेच रोज मोठ्या प्रमाणात म्हणजे सुमारे एक हजार दशलक्ष लिटर पाण्याचा अपव्यय होतो. जल खात्याच्या हिशोबाने पाणी शुद्ध करून नागरिकांना जलवितरण कामातून पाणी पुरविण्याच्या कामासाठी एक हजार लिटरला रोजचा सरासरी ७.३१ रुपये खर्च येतो. याचा अर्थ दरवर्षी सुमारे २७० कोटी रुपयांचे पाणी फुकट जाते. असे अनेक वर्षे चालू आहे. शिवाय मलजल वा अशुद्ध द्रव्यांचा वाहिनीच्या पाण्यात शिरकाव होऊन पिण्याचे पाणी दूषित होते ते वेगळे.
 

२०१४ ते २०१९ पाच वर्षांच्या काळात पालिकेने गळतीच्या दुरुस्तीचे काम करून फक्त पाच टक्के गळती कमी केली आहे. त्यामुळे पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी लवकरात लवकर गळती दुरुस्तीची उर्वरित कामे लवकर पूर्ण केली पाहिजे. पाण्याचे मोजमाप करण्याकरिता चार लाख जलजोडण्यांवर जलमापके बसवायची आहेत. ही बसविल्यानंतर पालिका किती पाणी जलवाहिन्यांमधून आणते व किती पाण्याचा मुंबईकरांना पुरवठा करते, याचा हिशोब होऊन अपव्यय कमी करता येईल. त्याचबरोबर प्रत्यक्ष गळतीचादेखील हिशोब होऊ शकेल. परिणामस्वरुप, जलदेयके सरासरी वापरापेक्षा प्रत्यक्ष वापरावर बनविता येतील.
 
प्रत्यक्षात पाण्याचा किती वापर होतो, त्याच्या आधारे पाणीपट्टी वसूल करण्यासाठी जलवाहिन्यांवर जलमापके बसविली आहेत. परंतु, सुमारे ४४ टक्के मुंबईकरांना अंदाजे जलदेयके पाठविण्यात येतात. महापालिका यापुढे इलेक्ट्रोमॅग्नेटिक वॉटर मीटर्स बसविणार आहे. कारण, हे मीटर्स जास्त दिवस (१० वर्षे) टिकतात. शिवाय या मीटरमध्ये कोणाला चलाखी करून रीडिंग बदलता (tampering) येत नाही. सध्याचा पाणीपुरवठा ३,७५० दशलक्ष लिटर असला तरी एका प्रयोगात पालिकेला वॉटर मीटर्समधून मिळालेला आकडा फक्त २७०० दशलक्ष लिटर दाखविला गेला. कारण, अनेक मीटर्स बिघडलेले आहेत. चार लाख जलजोडण्यांमध्ये दोन लाख जोडण्या झोपडपट्टी भागामध्ये आहेत, ज्या झोपडपट्टीवासीयांकडून वारंवार खराब केल्या जातात. २८० कोटींचा मुंबई जलवितरण सुधारणा प्रकल्प २४X७ (MWDIP) २०१४ पासून पाण्यामध्ये तूट केल्याने रद्द केला गेला. तसेच २००९ चा ऑटोमॅटिक मीटर रीडिंग (AMR) ३०० कोटींचा प्रकल्पही रद्द केला गेला.
 
मुंबईतील पाणीपुरवठ्याचे टप्पे
 


. तलाव : मुंबईच्या उत्तरेला १०० किमींहून अधिक अंतरावर तानसा, वैतरणा (खालचे, वरचे व मधले) व भातसा असे पाणीपुरवठ्यासाठी पाच मोठे तलाव आहेत. मुंबईत संजय गांधी उद्यानात विहार व तुळशी असे दोन छोटे तलाव बांधलेले आहेत. सर्व तलावामधील १०० लिटरमधल्या पाण्याचे वाटप-प्रमाण असे होत आहे : - वैतरणा (खालचे) - ११ लिटर; तानसा - १२ लिटर ; तुळशी - ०.५ लिटर ; विहार २.१ लिटर ; वैतरणा (वरचे) - १५.१ लिटर ; वैतरणा (मधले) - ११ लिटर ; भातसा - ४८.३ लिटर वैतरणा (मधले) धरणाच्या अंतर्गत सुरक्षेकरिता महापालिकेने बसविलेली पारंपरिक दुर्बीण अवतरण लंबक यंत्रणा झिजली असून ती दुरुस्त करण्याच्या पलीकडे गेली आहे. त्यामुळे सुरक्षेसाठी अद्ययावत पद्धतीची ‘एक्सवाय कोऑर्डिनेटर डेटा लॉगर प्रणाली’ वापरण्यात येणार आहे. या कामासाठी ०१ कोटी, ०३ लाख खर्च अपेक्षित आहे.
 

तानसाची गळती पालिका रोखणार

धरणातील जलसाठ्यांच्या खालील भिंतींची पाणबुड्यांच्या मदतीने चाचणी करून गळती रोखण्यासाठी उपाययोजना करण्यासाठी १ कोटी खर्च येणार आहे.

गारगाई धरण प्रकल्पाला गती


हा नवीन प्रकल्प पूर्ण झाल्यावर मुंबईकरांना ४४० दशलक्ष लिटर जादा पाणी रोज उपलब्ध होणार आहे.
डॉ. चितळे समितीने ठरविले आहे की, २०४१ मधील वाढीव लोकसंख्येच्या ५,९४० दशलक्ष लिटर मागणीकरिता पालघर जिल्ह्यातील गारगाई नदीवर ६९ मीटर उंचीचे व ९७२ मीटर लांबीचे धरण (३१०५ कोटींचे) बांधले जात आहे. तसेच गारगाई ते मोडकसागर जलाशयापर्यंत दोन किमी बोगद्याचे काम केले जाणार आहे. या प्रकल्पाच्या सविस्तर अभियांत्रिकी आणि बांधकाम देखरेखीच्या कामासाठी ‘स्मेक इंटरनॅशनल पीटीवाय लिमिटेड’ या ऑस्ट्रेलियन सल्लागाराची निवड करण्यात आली आहे. मुंबई पालिकेने चितळे समितीच्या आधाराने पाण्याची गरज माणशी २४० लिटर रोज (१५० लिटरच्याऐवजी) वाढीव काढली आहे. ती अवास्तव आहे. या धरणासाठी सहा गावांतील ४३० कुटुंबांचे पुनर्वसन करावे लागणार आहे.
 
. प्रक्रिया केंद्रे (water treatment plants)


 
(१) भांडुप कॉम्प्लेक्स - तानसा, वैतरणा (खालचे, वरचे व मधले) या तलावांचे पाणी - ( क्षमता - १९१० दशलक्ष लिटर) - प्रक्रियायुक्त शुद्ध पाणी पश्चिम उपनगर, माहीम, माटुंगा, दादर, वरळी, वाळकेश्वर, मरिन ड्राईव्ह, कुलाबा भागांकरिता पुरविले जाते.


(२) कापूरबावडी - भातसा तलावाचे पाणी - (क्षमता - ९१० दशलक्ष लिटर) - प्रक्रियायुक्त शुद्ध पाणी पूर्व उपनगर, डोंगरी, परळ, शीव भागांकरिता पुरविले जाते.


(३) विहार (क्षमता -७३ दशलक्ष लिटर) - प्रक्रियायुक्त शुद्ध पाणी साकी नाका व कुर्ला भागांकरिता पुरविले जाते.


(४) तुळशी (क्षमता - १८ दशलक्ष लिटर) - प्रक्रियायुक्त शुद्ध पाणी आरे कॉलनीकरिता पुरविले जाते.
या प्रक्रियांमध्ये रसायनांतून (तुरटीच्या मदतीने) कोअ‍ॅग्युलेशन व फ्लॉक्युलेशन होते, रॅपिड सॅण्ड फिल्टरच्या साहाय्याने पाणी गाळले जाते. क्लोअरिनच्या साहाय्याने जैविक प्रक्रिया होऊन पाणी शुद्ध होते.

. जलवहन : मुंबईत २२३५ मिमी ते ५५०० मिमी व्यासाच्या वाहिन्या व बोगदे यांचे बांधकाम करण्यात येणार असून ब्रिटिशकालीन तानसा जलवाहिनी बदलली जाईल. यासाठी ३८६ कोटी खर्च अपेक्षित आहे. गळती कमी करण्यासाठी रुंद वाहिन्या टाकण्यात येणार आहेत. काही बोगदे दक्षिण व मध्य मुंबईत, पूर्व उपनगरात १५ किमी पाण्याच्या अडचणीकरिता बांधले जाणार आहेत. जलवाहिन्यांकरिता ८०० कोटींचे प्रकल्प राबविले जाणार आहेत. मुंबईत जलवहनाकरिता सुमारे चार हजार किमी लांब वाहिन्या आहेत.


. जलसेवेकरिता जलकुंभ (service reservoirs) - एकूण शहरात २७ जलाशय व १०९ विभाग आहेत.

पश्चिम उपनगराकरिता (९) : बोरिवली पूर्व - २; मालाड पूर्व - २; वेरावली, अंधेरी पूर्व खालती व उंचावर - ३; वांद्रे पाली हिल - २
पूर्व उपनगराकरिता (११) : - भांडुप - ३; घाटकोपर - २; आरसीएफ - २; पवई -१; ट्रॉम्बे उंचावर - ३.
शहर भागाकरिता (७) : - मलबार हिल - १; भडारवाडा हिल - १; वरळी हिल - २; रावळी हिल - १; फॉसबेरी - १; कॉटन ग्रीन - १;

. नियंत्रण कुठे होते?


जलवितरणाच्या नियंत्रणासाठी एकूण ११० विभाग केलेले आहेत. रोजचे ८०० ठिकाणी व्हॉल्व्ह फिरविणे सुरू असते. गळती दुरुस्तीच्या कामासाठी एकूण ६१५ विभाग केले आहेत. नियंत्रणासाठी भांडुपच्या ‘मास्टर कंट्रोल’ जलाशय केंद्रा ठिकाणी २४ तास काम असते. शिवाय शहर विभाग, पश्चिम व पूर्व उपनगरे याकरिता अनुक्रमे मलबार हिल, विलेपार्ले व घाटकोपर येथे विभागीय नियंत्रण केंद्रे आहेत. दूषित पाणी थोपविण्यासाठी महापालिका जलनमुने घेऊन तपासणी करते.
 
‘एम-पश्चिम’ प्रभागामध्ये म्हणजे गोवंडी, चेंबूर (प) भागात जास्ती दूषित नमुने २.४ टक्के मिळाले तर ‘एच-पूर्व’ वांद्रे , सांताक्रुझ भागात एकही दूषित नमुना मिळाला नाही. ‘बी’ प्रभागात डोंगरी व मोहम्मद अली रोड भागात २.१ टक्के मिळाले. ‘आर उत्तर’ भागात दोन टक्के मिळाले. महापालिका वास, रंग, चव, पीएच, क्लोअरिन दर्जा इत्यादी असे ३२ पॅरामिटर तपासते व जलनमुने तपासून दूषित का शुद्ध ते ठरविते. २०१७-१८ मध्ये सरासरी एक टक्के दूषित मिळाले, तर २०१८-१९ मध्ये ०.७ टक्के दूषित मिळाले. महापालिका रोज २०० जलनमुने व पावसाळ्यात ३०० नमुने तपासण्याकरिता घेते. एकूण सर्व ठिकाणी महिन्याला चार हजार जलनमुने तपासले जातात. दूषित जागी ‘पोस्ट क्लोरिनेशन’ वा इतर दुरुस्त्या करते. महापालिकेने वॉटर मीटर्स बसविणे व गळती थांबविणे कामे लवकर पूर्ण केली पाहिजेत. केवळ जास्त पाण्याची वाट बघत थांबू नये. जितके पाणी जास्त तेवढी गळती जास्त होऊ शकते. तसेच रेन वॉटर हार्वेस्टिंगसारखी कामे सोसायट्यांकडून करून घेतली पाहिजेत. तसेच ‘सुवेझ ट्रिटमेंट प्लांट’ची कामे लवकर संपवून मलजलाचे पुनर्वापरयोग्य पाणी बनवायला हवे म्हणजे ते अपेय कामाकरिता वापरता येईल.


@@AUTHORINFO_V1@@