अमित शाह– उद्धव ठाकरे यांच्यात चर्चा
नवी दिल्ली : पालघर हत्याकांडप्रकरणाची केंद्र सरकारने दखल घेतली असून केंद्रीय गृहमंत्रालयाने राज्य सरकारकडे त्याप्रकरणी अहवाल मागितला आहे. त्याचप्रमाणे देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनी मुख्यमंत्री उध्दव बाळासाहेब ठाकरे यांच्याशी सदर प्रकरणी दूरध्वनीवरून चर्चा केली आहे. दरम्यान, दोषींविरोधात कठोर करण्यात येईल, असे मुख्यमंत्री ठाकरे यांनी सांगितले आहे.
पालघर जिल्ह्यातील गडचिंचली येथे १६ एप्रिलच्या रात्री दोन साधू आणि त्यांच्या वाहनचालकाची जमावाने मारहाण करीत हत्या केल्याची (मॉब लिंचिंग) धक्कादायक घटना घडली आहे. सदर साधू आणि त्यांचा वाहनचालक हे चोर – दरोडेखोर असल्याचे गावातील लोकांना वाटल्याने त्यांची हत्या करण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे. त्यासंबंधीच्या चित्रफिती समाजमाध्यमांवर मोठ्या प्रमाणात प्रसारित झाल्या असून त्यामध्ये पोलीसच साधूस जमावाच्या ताब्यात देत असल्याचे दिसत आहे. त्यानंतर राज्यातील कायदा व सुव्यवस्थेविषयी प्रश्न विचारण्यात येत आहेत. सदर साधू हे नाथपंथीय जुना आखाड्याचे असल्याचे समोर आले आहे. सदर मॉब लिंचिंगमुळे देशभरातून संताप व्यक्त करण्यात येत आहे.
सदर प्रकरणाची दखल केंद्र सरकारने घेतली असून राज्य सरकारला याप्रकरणी सविस्तर अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. त्याचप्रमाणे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी राज्याचे गृहमंत्री उध्दव ठाकरे यांच्यासोबत दूरध्वनीवरून संवाद साधला. यावेळी मुख्यमंत्री ठाकरे यांनी शाह यांना प्रकरणाची सविस्तर माहिती दिली. त्याचप्रमाणे याप्रकरणी आतापर्यंत करण्यात आलेल्या कारवाईचीदेखील माहिती दिली. याप्रकरणी नऊ अल्पवयीन आरोपींसह १०० हून अधिक जणांना अटक करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री ठाकरे यांनी दिली आहे.