माणुसकी जपणारा गंभीर

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    17-Apr-2020   
Total Views |

gautam gambhir_1 &nb

भारतीय क्रिकेटपटूसोबतच एक माणुसकी जपणारा नेता म्हणून ओळख निर्माण करून कोरोनाच्या वादळात गोरगरिबांसाठी झटणार्‍या खासदार गौतम गंभीर याच्याविषयी...



सध्या संपूर्ण जग कोरोनासारख्या भयानक रोगाशी लढा देत आहे. या संकटसमयी केंद्र तसेच राज्य सरकारने यांना मदत करण्यासाठी लोकांना आवाहन केले आणि अनेक स्तरांमधून यामध्ये मदतीचा ओघ सुरू झाला. अशामध्ये एका व्यक्ती लोकांच्या मदतीसाठी आपले पाऊल पुढे टाकत एकदा, दोनदा नव्हे, तर अनेकवेळा मदतीसाठी धावून आला आहे. ती व्यक्ती म्हणजे भारताचा माजी सलामीवीर क्रिकेटपटू आणि सध्या दिल्लीमध्ये भाजपचा खासदार म्हणून लोकांनी पसंती दर्शविलेला गौतम गंभीर. सर्वांनाच तसा गौतमचा स्वभाव तसा परिचित आहे. त्याच्या तापट स्वभावाचे अनेक किस्से या देशाने ऐकले आणि पाहिलेही. मैदानावर आणि मैदानाबाहेर स्वतःच्या आक्रमक स्वभावाने गौतमने ‘गंभीर’ व्यक्तिरेखा सर्वांसमोर उभी केली. पण, म्हणतात ना फणसाला बाहेरून कितीही काटे असले तरी आतून मात्र तो मऊच असतो. असेच काहीसे गंभीरचेही आहे, असे म्हणयला हरकत नाही. बाहेरून हा व्यक्ती कितीही आक्रमक वागत असला तरी आतून नागरिकांना कठीण प्रसंगी मदत करण्यासाठी सदैव तत्पर असतो. दिल्लीतील एका सामान्य घरातून आलेला एक यशस्वी क्रिकेटपटू ते यशस्वी खासदार हा प्रवास तसा बरेच काही शिकवून जातो. जाणून घेऊया त्याबद्दल...




दि. १४ ऑक्टोबर, १९८१रोजी दिल्लीतील एका सामान्य कुटुंबामध्ये सीमा आणि दीपक गंभीर यांना मुलगा झाला. दीपक गंभीर हे कापड वस्त्रोद्योगामध्ये काम करत होते. गौतमला एक लहान बहीणही आहे. जन्माच्या अठराव्या दिवसापासून गौतम हा आजी-आजोबांच्या सान्निध्यात मोठा झाला. वयाच्या दहाव्या वर्षीपासून गौतमने क्रिकेट खेळायला सुरुवात केली. नवी दिल्लीतील मॉडर्न स्कूलमध्ये त्याने दहावीपर्यंत शिक्षण घेतल्यानंतर हिंदू महाविद्यालयातून पदवी शिक्षण पूर्ण केले. शिक्षणासोबत त्याने शालेय क्रिकेट स्पर्धांमध्येसुद्धा चांगली कामगिरी केली. साधारण नव्वदीच्या दशकात त्याचे क्रिकेटमधील गुरु आणि मामा पवन गुलाटी यांच्याकडे राहत होता. त्याने दिल्लीतील लाल बहादूर शास्त्री अकादमीच्या संजय भारद्वाज आणि राजू टंडन यांच्याकडे क्रिकेटचे तंत्रशुद्ध शिक्षण घेतले. २००० साली गंभीरची बंगळुरू येथे राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये निवड झाली. अथक परिश्रमानंतर २००३ मध्ये त्याचे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पहिले पाऊल पडले. त्याने बांगलादेशविरुद्ध एकदिवसीय मालिकेमध्ये भारतीय संघात पदार्पण केले.



त्यानंतर २००४ मध्ये त्याने कसोटी संघातदेखील स्वतःचे स्थान मिळवले. भारतीय संघाला त्यावेळेस एका सलामीवीराची गरज होती. गंभीरच्या खेळीने संघाच्या एका सलामीवीराची चिंता मिटवली होती. त्याने चमकदार कामगिरी करत भारताला अनेक सामने जिंकून दिले. २००७ -२००८ हे वर्ष त्याच्यासाठी ‘सुवर्ण वर्ष’ ठरले. पहिल्यांदा ‘टी-२०’चा विश्वचषक स्पर्धेसाठी भारतीय संघ निवडला गेला. यामध्ये वीरेंद्र सेहवागसोबत गौतम गंभीरची सलामीसाठी निवड झाली. या स्पर्धेमध्ये भारतीय संघ ‘टी-२०’ विश्वचषक जिंकून इतिहास रचला. गंभीरला या स्पर्धेमधील उत्तम कामगिरीसाठी ‘सामनावीर’ आणि ‘मालिकावीरा’चाही किताब मिळाला. त्यानंतर कधीच गंभीरने मागे वळून पाहिले नाही. क्रिकेटविश्वात त्याने स्वतःची अशी वेगळी ओळख निर्माण केली. त्याचसोबत त्याचे मैदानावरील आणि मैदानाबाहेरील त्याच्या आक्रमक स्वभावामुळे अनेकवेळा स्वतःची मते रोखठोक जगासमोर मंडळी आहेत. त्यानंतर त्याने ६ डिसेंबर, २०१८ मध्ये क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. गंभीरने निवृत्तीनंतर त्याच्या दुसर्‍या इनिंगला सुरुवात केली.





आयुष्यभर क्रिकेटशिवाय दुसरा कुठलाच विचार न करणारा हा कीर्तिवान क्रिकेटपटू पुढे काय करणार, हाच प्रश्न सर्वांना पडला होता. मात्र, गंभीरने त्याचे सर्व आयुष्य समाजसेवेमध्ये घालवण्याचे ठरवले. काहीकाळ त्याने क्रिकेटसाठी समालोचक म्हणूनही भूमिका निभावली. पुढे त्याने २०१४ मध्ये चालू केलेल्या ‘गौतम गंभीर फाऊंडेशन’साठी पूर्ण वेळ द्यायचे ठरवले. त्याने २०१७ मध्ये पहिल्यांदा दिल्लीतील कुठलाही मजूर किवा गरीब उपाशी राहू नये यासाठी ‘कम्युनिटी किचन’ची सुरुवात केली. जे निमलष्करी दलातील जवान शहीद झाले आहेत, त्यांच्या मुलांच्या शैक्षणिक गरजा पूर्ण करण्याचे काम हाती घेतले. याव्यतिरिक्त ‘गौतम गंभीर फाऊंडेशन’ हे पोषण आहार, आरोग्य आणि स्वच्छता याविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी, वंचितांमधील घरातील अल्पवयीन मुलींसाठी कार्य करते. शहरातील वायुप्रदूषणाविरूद्ध लढा देण्यासाठी दिल्लीला हिरवेगार करण्याचा उपक्रमही त्यांनी हाती घेतला होता. दिल्लीमध्ये गौतम गंभीरच्या याच कामगिरीमुळे लोकांनी त्याचे कौतुक केले. त्यानंतर त्याने भाजपमध्ये प्रवेश केला आणि खासदार म्हणून तो निवडूनही आला. सध्या चालू असलेल्या कोरोनाच्या तांडवामध्येही त्याने महत्त्वाची मदत केली आहे. गंभीरने स्वतःच्या खासदार फंडमधून दिल्ली सरकारला ५० लाखांची मदत केली, पंतप्रधान निधीमध्ये त्याने १ कोटी शिवाय १ महिन्याचा पगारही दिला. तो एवढ्यावरच थांबला नाही तर ‘गंभीर फाऊंडेशन’तर्फे रुग्णालयाला ५००पीपीई किटचे वाटप केले. त्याच्या या दानशूर व्यक्तिमत्त्वाचे सर्वांना कौतुक वाटते आणि ते वाटत राहील. दै. ‘मुंबई तरुण भारत’ परिवाराकडून त्याच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा...!
@@AUTHORINFO_V1@@