रिबेकाबाईंनी एक विनोद केला होता. पण, ज्यू लोक नाराज झाले. कारण, या विनोदातून अभावितपणे ज्यू लोकांची नाकं लांबलचक आणि वळणदार असतात, या गैरसमजाला पुष्टी मिळाली. ज्यूंच्या नाराजीनंतर रिबेकाबाईंनी लगेचच क्षमा मागितली.
सध्या दूरदर्शनवर पुन्हा ‘रामायण’ मालिका सुरू आहे. आपल्याकडे असंतुष्ट आत्मे आणि भोळसट मूर्ख यांची कमतरता नाही. त्यामुळे काहीतरी चांगलं कार्य सुरू आहे, त्यात खुसपटं काढण्याचं काम हे असंतुष्ट आत्मे करतात नि भोळसट मूर्ख त्यांच्या अपप्रचाराला बळी पडून स्वतःच डोकं आणखी संभ्रमित करुन घेतात. शूर्पणखा पंचवटीत येऊन रामाला आपल्याशी लग्न कर म्हणून गळ घालू लागते आणि सीतेला खाऊन टाकण्यासाठी तिच्या अंगावर धावून जाते. तेव्हा रामाच्या आज्ञेने लक्ष्मण खड्ग उपसतो आणि शूर्पणखेचे नाक, कान छेदून टाकतो.
यावरून, दंडकारण्याचे मूळ रहिवासी असलेल्या ’राक्षस’ नामक जनजातीच्या एका स्त्रीला उत्तरेकडून आलेल्या आर्य आक्रमकांनी कशी अमानुष वागणूक दिली पाहा, वगैरे नेहमीचे आक्षेप तर घेऊन झालेच, पण तुलनेने छोटा तरी चुकीचाच असा पूर्वापार समज पक्का करण्याचेदेखील उद्योग झाले. लक्ष्मणाने शूर्पणखेचं नाक म्हणजे संस्कृतात नासिका जिथे कापली ते नासिक किंवा नाशिक, हा तो गैरसमज. मुळात दंडकारण्यातल्या त्या विशिष्ट परिसराचं नाव ‘जनस्थान.’ जनस्थानात गोदावरीच्या तीरावर नऊ छोट्या-छोट्या टेकड्या होत्या. म्हणून ते ‘नवशिख.’ त्याचा अपभ्रंश ‘नासिक’ किंवा ‘नाशिक.’ हे नऊ उंचवटे आजही जाणकार लोकांना माहीत आहेत. पण, भोळसट मूर्खांना त्याची पर्वा नाही. शूर्पणखेच्या नाकावरुन ‘नासिक’ ही अचरट कथा समाजमाध्यमांवर दणादण अग्रेषित करण्यात आली. आता कुणाही थोडासा विचार करणार्या माणसाला असा प्रश्न पडू शकेल की, नाक कापलं म्हणून ‘नासिक’, तर कान छाटले होते, मग ‘कर्णपूर’ किंवा ‘कानपूर’ का नाही?
असो, पश्चिमेत ‘नाक’ या विषयावरुन एक वेगळच वादंग उसळला आहे. आपल्याला माहीतच आहे की, पश्चिमेत नि विशेषत: अमेरिकेत ज्यू लोकांना एक अतिशय प्रबळ असा दबावगट-अमेरिकन भाषेत ‘लॉबी’ आहे. ज्यूंच्या विरोधात जरा कुठे खुट्ट झालं की, ही ‘लॉबी’ एकदम सक्रिय होते. बेल्जियम हा युरोपातला एक छोटासा देश आहे. तिथल्या ‘आल्स्ट’ नावाच्या खेड्यात दरवर्षी ‘ईस्टर’च्या सणाच्या अगोदर एक जत्रा भरते. युरोप खंडात ‘ईस्टर’ हा सण फार प्राचीन काळापासून साजरा होतो. त्यांच स्वरुप आपल्याकडल्या होळीच्या सणाशी बरंच मिळतं जुळतं आहे. म्हणजेच थंडी संपून आल्हाददायक हवामानाची सुरुवात, दक्षिणायन संपून उत्तरायणाची सुरुवात, ऋतुबदल यांच्याशी निगडित असा हा सण आहे. धर्मप्रसारक ख्रिश्चनांनी तो सफाईने येशू ख्रिस्ताच्या जीवानाशी जोडून टाकला आहे.
तर ‘आल्स्ट’च्या या उत्सवात म्हणजे कार्निव्हलमध्ये एक पवित्र झाड एका खड्ड्यात उभं करुन जाळणं, शिमग्याप्रमाणेच सोंगं सजवून मनसोक्त टिंगलटवाळी करणं वगैरे सगळे प्रकार दरोबस्त साजरे होतात. गेली काही शतकं ‘आल्स्ट’मध्ये हा उत्सव किंवा जत्रा साजरी होते. आता गेल्या ५०-६० वर्षांत या कार्निव्हलला पर्यटनाचं रुप आलं. आपल्या गणेशोत्सवाला जसा ‘गणेश फेस्टिव्हल’ बनवून त्याचा पद्धतशीर धंदा सुरू झाला, तसंच तिकडेही झालं. त्यामुळे जगभरातून हौशी पर्यटक ‘आल्स्ट कार्निव्हल’ला मुद्दाम भेट द्यायला लागले. युरोपीय लोक मुळातच शिस्तप्रिय असल्यामुळे त्यांनी या उत्सवाची नीट आखणी करून तो आणखी आकर्षक बनवला. म्हणजे पाहा, उत्सवाचा धंदा तर केला, पण त्याला धंदेवाईक सवंगपणा येऊ न देता! गेल्या काही वर्षांपासून उत्सवात चित्ररथ-फ्लोट्स फिरवण्याचीदेखील प्रथा सुरू झाली. या चित्ररथावरच्या दृश्यांमधूनही कुणाची तरी नावाने बोंब मारतात त्याचीच सौम्य आवृत्ती. ‘आल्स्ट कार्निव्हल’ गेली काही वर्षं अधिकाधिक लोकप्रिय होत गेल्यामुळे नि त्याला किमान दोन शतकांची परंपरा असल्यामुळे ‘युनेस्को’ने त्याला ‘हेरिटेज’ दर्जा दिला.
पण, यंदा एकाएकी ‘युनेस्को’ने तो दर्जा काढून घेतला. कारण असं झालं की, एका चित्ररथावर माणसाच्या ‘कंजुषपणा’ या वृत्तीची टिंगल करणारं एक दृश्य उभं करण्यात आलं होतं. त्यातले दोघे इसम हे अत्यंत खत्रूड चेहर्यांचे आणि भल्या-मोठ्या बाकदार नाकांचे दाखवण्यात आले होते. युरोपात पूर्वापार सावकारी हा धंदा ज्यू लोक करत आलेले आहेत. आता सावकारी म्हटली की, लोभीपणा, कंजुषपणा, कर्जदाराला लुबाडणं वगैरे आलंच आणि भलंमोठं बाकदार नाक हे ज्यू लोकांचं वेगळेपण दाखवणारं असं शारीरिक वैशिष्ट्य समजलं जातं. चित्ररथ पाहाणार्यांना जे काही समजायचं ते समजलं. भावना पोहोचल्या. पण, ज्यू लोक खवळले. ‘भल्यामोठ्या नाकाचे लोक म्हणजे ज्यू’ हे समीकरण मुळात चूक! ते कंजूष असतात हाही मुद्दाम जोपासलेला एक गैरसमज आहे आणि असे गैरसमज ज्यू जमातीला मुद्दाम चिकटवून आमची शतकानुशतकं बदनामी केली जात आहे, असा आक्षेप घेत ज्यू लॉबीने हलकल्लोळ केला. परिणामी, ‘युनेस्को’ने यंदा ‘आल्स्ट जत्रे’कडे पाठ फिरवली.
पण, एवढं पुरलं नाही म्हणून की काय, डॉ. रिबेका एरबेल्डिंग हिच्या एका शेरेबाजीची भर पडली. आपल्याला हे कळल्यावर नवल वाटतं की, श्रीमंत ज्यू लॉबीने खुद्द अमेरिकेत राजधानी वॉशिंग्टन शहरात अगदी मोक्याच्या ठिकाणी ‘हॉलोकॉस्ट मेमोरियल म्युझियम’ उभारलं आहे. ही गोष्ट फार जुनी नाही. १९९३ साली हे वस्तुसंग्रहालय उभं राहिलं. दरवर्षी त्याला किमान साडेदहा लाख लोक भेट देतात. हिटलरचा नाझी पक्ष १९३३ साली जर्मनीत सत्तारूढ झाला. तेव्हापासून १९४५साली दुसरं महायुद्ध संपेपर्यंत नाझींनी युरोपातल्या विविध देशांमधले किमान ६०लाख ज्यू लोक ठार मारले, असं समजलं जातं. या वांशिक कत्तलीला ‘हॉलोकॉस्ट’ असं म्हणतात. वॉशिंग्टनच्या ‘हॉलोकॉस्ट म्युझियम’मध्ये या वांशिक कत्तली संदर्भातले असंख्य दस्तावेज, चित्र, प्रतिकृती इत्यादी असंख्य वस्तू संग्रहित करण्यात आल्या आहेत.
इ. स. १०२५ मध्ये मुहम्मद गझनवीने भारतावर स्वारी करून सोमनाथ क्षेत्र उद्ध्वस्त केले. तेव्हापासून इस्लामी सुलतानांनी भारताच्या भूमीवर कत्तली, बलात्कार, मंदिरांचा विद्ध्वंस, लुटालूट, जाळपोळ यांचा हैदोस घातला. ९०० ते १ हजार वर्षांच्या या अविरत ‘हॉलेकॉस्ट’मध्ये किती लाख हिंदू गेले? कोण हिशोब ठेवणार? कोण त्यांच्यासाठी म्युझियम उभारणार? आणि तेसुद्धा परक्या देशाच्या राजधानीत? इथे स्वदेशातसुद्धा असं म्युझियम कुणी उभं करू पाहिलं, तर त्याला आपलेच लोक विरोध करतील. कारण, आपल्या लोकांना ‘राष्ट्रीय अस्मिता’ म्हणजे काय, त्याचाच विसर पडलाय. ज्यू लोकांचं तसं नाहीये. त्यांची अस्मिता धगधगत्या निखार्यासारखी जागी आहे. म्हणून ते एका महासत्तेच्या राजधानीत अगदी मोक्याच्या जागी अशी संग्रहालयं उभारू शकतात. तर डॉ. रिबेका एरबेल्डिंग या विदुषी ‘हॉलेकॉस्ट म्युझियम’च्या एक तज्ज्ञ कर्मचारी आहेत. म्युझियममध्ये किंवा बाहेर वांशिक संहार या विषयाशी संबंधित भाषणं देणं, प्रेझेंटेशन करणं, परिसंवादांना हजर राहणं हेच त्यांचं काम आहे. अलीकडे त्या अशाच एका संवादासाठी गेलेल्या असताना त्यांना प्रश्न विचारण्यात आला की, “ज्यू लोकांच्या वांशिक संहाराबद्दल तुम्ही एवढं बोलता, तर तुम्ही ज्यू आहात का?” त्यावर रिबेकाबाई उत्तरल्या, “नाही, मी ज्यू नाही. माझं ‘रिबेका’ हे नाव ज्यू वळणांच आहे आणि माझं नाकदेखील ज्यू वळणाचं (म्हणजे लांबलचक आणि टोकाशी जुळलेलं) आहे. त्यामुळे मी ज्यू म्हणून खपून जाऊ शकते पण, मी ज्यू नाही.”
खरं पाहता रिबेकाबाईंनी हा विनोद केला होता. पण, ज्यू लोक नाराज झाले. कारण, या विनोदातून अभावितपणे ज्यू लोकांची नाकं लांबलचक आणि वळणदार असतात, या गैरसमजाला पुष्टी मिळाली. ज्यूंच्या नाराजीनंतर रिबेकाबाईंनी लगेचच क्षमा मागितली. या संदर्भात ज्यू मानववंशशास्त्रज्ञांचं असं म्हणणं आहे की, भलंमोठं लांब आणि बाकदार नाक हे ज्यू जमातीतच आढळतं असं नाही, तर भूमध्य समुद्राच्या किनारपट्टीच्या प्रदेशातल्या सर्वच लोकांमध्ये तो शरीरविशेष आढळतो. म्हणजेच आशिया, आफ्रिका आणि युरोप या तीनही खंडात असे लोक आढळतात. परंतु, युरोपीय लोक स्वतःला ग्रीक आणि रोमनांचे वंशज म्हणवतात आणि ग्रीको-रोमन वंशाच्या लोकांची नाक वेगळ्या घाटाची असतात. तेव्हा ज्यू हे आमच्यापेक्षा वेगळे आणि हलक्या दर्जाचे आहेत, हे दर्शवण्यासाठी युरोपीय मानववंश शास्त्रज्ञांनी ‘ज्यू नाक’ ही संकल्पना दृढ केली नि शतकानुशतकं आमची बदनामी केली. पण, आता आम्ही हे ऐकून घेणार नाही आणि खरोखरच आधुनिक मानववंशशास्त्राने ही संकल्पना अशास्त्रीय म्हणून बाद करून टाकली आहे.