विश्वास हेच उद्योगाचे भांडवल...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    06-Mar-2020   
Total Views |
ramchandra sawant_1 


नामांकित कंपनीत ‘व्यवस्थापक’ म्हणून कार्यरत असणार्‍या रामचंद्र सावंत यांनी उद्योगविश्वात पाऊल ठेवले आणि ‘साईरश इलेक्ट्रॉनिक सिस्टिम्स’ या कंपनीची सुरुवात केली. त्यांच्या प्रवासाचा घेतलेला हा आढावा.

मचंद्र उमाजी सावंत यांचा जन्म सावंतवाडीचा. त्यांचे बालपण आणि शिक्षण तिथेच झाले. सुरुवातीपासूनच त्यांचा कल अभियांत्रिकी क्षेत्राकडे असल्याने बारावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी गोव्यातून 'डिप्लोमा इन इंडस्ट्रियल इलेक्ट्रॉनिक’चे शिक्षण पूर्ण केले. नव्वदीच्या दशकात नोकरीसाठी त्यांना मुंबई खुणावू लागली. २५ वर्षांपूर्वी नोकरी मिळण्यासाठी तशी अडचण नव्हती. ठाण्यात नोकरी मिळाल्यानंतर त्यांनी शिक्षण पूर्ण करण्याचा निर्णय घेतला आणि अभियांत्रिकीची पदवी पूर्ण केली. पदवी शिक्षण पूर्ण झाल्यानंतर ‘अप्लाईड इलेक्ट्रॉनिक सिस्टिम्स’मध्ये ‘व्यवस्थापक’ म्हणून त्यांनी नोकरी सुरू केली. या काळात प्रत्यक्ष कामाचा अनुभव येत गेला. अभियांत्रिकी क्षेत्रातील बड्या कंपन्या, माणसे यांच्याशी संबंध येत गेला. पुढे जाण्यासाठी त्यांना प्रेरणा मिळत गेली. व्यवसाय करण्याची धडपडही याच काळात सुरू झाली होती. ‘नोकरी नको, स्वतःचा व्यवसायच हवा,’ असे स्वप्न पाहणार्‍या सावंत यांनी १९९३ साली बिझनेस मॅनेजमेंटचे शिक्षण घेतले. यामुळे त्यांचा आत्मविश्वासही बळावला होता.

नोकरी करताना मार्केटिंग विभागातील सहकार्‍यांसोबत ग्राहकांकडे जाणे व्हायचे. सावंत सोबत असले की ऑर्डर मिळवणे सोपे काम असायचे. त्यामुळे याच मित्राने नोकरी सोडून एकत्र येत व्यवसाय सुरू करण्याचा सल्ला दिला. इतकी चांगली नोकरी सोडून व्यवसाय करण्याचा हा निर्णय सावंत यांच्या घरच्यांना तसा पसंत नव्हता. तरीही १९९५ मध्ये सावंत आणि त्यांच्या सहकार्‍यांनी एकत्र येत ’साईरश इलेक्ट्रॉनिक सिस्टिम्स’ या कंपनीची स्थापना केली. 'डीसी पॉवर सप्लाय’, 'डीसी कर्न्व्हटर’, 'ट्रान्सफॉर्मर’ आणि ग्राहकांच्या मागणीनुसार लागणार्‍या इतर इलेक्ट्रॉनिक यंत्रणेची निर्मिती करण्याचे काम सावंत यांनी सुरू केले. सुरुवात जोमाने झाली होती. व्यवसायात जम बसत होता. मात्र, कालांतराने काही कारणास्तव मित्राला व्यवसायात राहणे जमले नाही. नोकरी सोडून व्यवसायाची जबाबदारी आलेल्या सावंत यांच्यासाठी हा संघर्षाचा काळ ठरला. कारण, मार्केटिंग किंवा ग्राहक मिळवणे हे सावंत यांना या काळात जड गेले. मात्र, याच संघर्षातून तावूनसुलाखून निघत आपल्या अनुभवावर उद्योग उभा केला. नोकरी करत असताना ज्या ज्या कंपन्यांशी सावंत यांचा संबंध आला होता, त्या सर्व कंपन्या आता ‘साईरश इलेक्ट्रॉनिक सिस्टिम्स’च्या ग्राहक बनल्या होत्या. सावंत यांना आजवर स्वतः कधीही कंपनीचा व्यवसाय आणण्यासाठी बाहेर जावे लागले नाही. ग्राहकवर्गानेच त्यांना व्यवसाय आणून दिला.

व्यवसाय करताना इतरांना येणार्‍या अडचणी सावंत यांनाही जाणवल्या. भांडवल उभारणी हे व्यवसायातील मोठे आव्हान सावंत यांनी लिलया पेलले. सावंत यांच्यावरील विश्वासामुळे कच्चा माल हा वितरकांकडून मिळत गेला. तसेच ज्या ग्राहकांसाठी उत्पादन घेणार होते, तेही विश्वासातलेच होते. त्यामुळे व्यवसायाचे स्वरूप लहान असले, तरीही पैसे अडकून राहतील, अशी वेळ सावंत यांनी येऊ दिली नाही. कर्ज न घेता मिळणार्‍या नफ्यातून व्यवसायवृद्धी करण्याचा मार्ग त्यांनी स्वीकारला. या सर्व प्रवासात त्यांच्या पत्नीने त्यांना मोलाची साथ दिली. गेली २२ वर्षे सावंत यांनी मोठे चढउतार पाहिले. कामाचा पसारा वाढल्यावर एका युनिटचा प्रवास दोन ते तीन युनिटपर्यंत गेला. ग्राहकांच्या गरजेनुसार पुरवठा उत्पादनातील बदल हे सावंत यांचे व्यवसायातील वैशिष्ट्य यामुळे ग्राहकवर्गाला आकर्षित करण्यास त्यांना मदत झाली. ज्या कंपनीत ते नोकरी करत होते, त्या कंपनीच्या ग्राहकांना स्वतःकडे वळवण्यातही सावंत यशस्वी झाले. अशाप्रकारे उद्योग करण्याचा निर्णय घेतल्यानंतर त्यावर न डगमगता ठाम राहत एक व्यावसायिक म्हणून ते यशस्वी ठरले. त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा!
@@AUTHORINFO_V1@@