मालकाकडून कोरोनाचे संक्रमण
मुंबई (प्रतिनिधी) - बेल्जियममधील एका पाळीव मांजरीला कोरोना व्हायरसची लागण झाल्याचे समोर आले आहे. बेल्जियमच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी तशी माहिती दिली आहे. आठवड्यापूर्वीच तिच्या मालकाला कोरोना व्हायरसची लागण झाली होती. त्यामुळे मालकाकडून या विषाणूचा संसर्ग या मांजराला झाल्याची शक्यता आहे.
ब्रुसेल्स टाईम्सचा वृत्तानुसार शुक्रवारी बेल्जियममध्ये आरोग्य अधिकाऱ्यांची पत्रकार परिषद पार पडली. यावेळी त्यांनी बेल्जियममधल्या लीजमधील एका पाळीव मांजरीची कोरोना चाचणी पाॅझिटिव्ह आल्याचे सांगितले. आठवड्यापूर्वी या मांजरीच्या मालकाला कोरोना व्हायरसने ग्रासल्यानंतर मांजरीमध्ये कोरोनाची लक्षणे दिसून आली. यावेळी कलेल्या चाचणीत ती कोरोना पाॅझिटिव्ह असल्याचे उघड झाले. या मांजरीला अतिसार, उलट्या आणि श्वास घेण्यास अडचण जाणवत होती. त्यामुळे तिच्या विष्ठेची चाचणी केल्यावर त्यामध्ये आम्हाला कोरोनाचा विषाणू आढळून आल्याची माहिती प्राध्यापक स्टीव्हन व्हॅन गुच्ट यांनी दिली. या पूर्वी हाॅंगकाॅंगमधील दोन कुत्र्यांची कोरोना चाचणी पाॅझिटिव्ह आली आहे. दरम्यान, जागतिक आरोग्य संघटनेने सांगितले आहे की, “कुत्रा, मांजर किंवा कोणताही पाळीव प्राणी कोरोना माणसामध्ये संक्रमित करू शकतो याचा पुरावा आढळलेला नाही."