मार्च २१च्या 'दि इंडियन एक्स्प्रेसच्या अंकात फैझान मुस्तफा यांचा हिंदुराष्ट्र आणि सेक्युलॅरिझम या विषयावर ''Minorities too are fadeup of this fakade of secularism" या शिर्षकाचा लेख आहे. लेखक, नलसार कायदे विद्यापीठाचे उपकुलगुरु आहेत. नेहमीच्या पठडीतील हा लेख नाही. 'भारत , हिंदू पाकिस्तान होईल' अशी शशी थरूर भाषा नाही. संपूर्ण लेख संविधानाच्या भाषेत आहे. लेखक संविधान संकल्पनेचे चांगलेच जाणकार आहेत, हे लेख वाचल्यानंतर लक्षात येते.
लेखक मुस्तफा आपल्या लेखात जे सांगतात त्याचा सारांश असा आहे. 'राज्याचा विचार करता जगात दोन प्रकारची सेक्युलॅरिझमची मॉडेल्स आहेत; एक, 'सेपरेशन मॉडेल' आणि दुसरे 'ज्युरिडिक्शनल मॉडेल' सेपरेशन मॉडेल अमेरिकेचे असून ज्युरिडिक्शनल मॉडेल इंग्लडचे आहे. सेपरेशन मॉडेल याचा अर्थ धर्म आणि राजसत्ता संपूर्णपणे वेगळ्या राहतील. ज्युरिडिक्शनल मॉडेलमध्ये राज्य जरी एका धर्माचा पुरस्कार करणारे असले तरी, अन्य धर्मियांना सर्व प्रकारचे धार्मिक स्वातंत्र्य देण्यात आलेले असते. ग्रीक आणि आयर्लंडच्या संविधानाच्या उद्देशिकेत 'होली ट्रिनिटी' ऑर्थाडॉक्स ख्रिश्चानिटीशी बांधिलकी असे शब्द अनुक्रमे आलेले आहेत. ब्रिटनचा राजा किंवा राणी यांना 'डिफेन्डर ऑफ फेथ' (धर्मरक्षक) असे संबोधण्यात येते.
लेखकाचे पुढचे प्रतिपादन असे की, नेहरुवियन सेक्युलॅरिझम राज्य आणि धर्माची फारकत असणारे मॉडेल कोलमडून पडत असून 'हिंदू धोक्यात आहेत' सारखी घोषणा आता लोकांच्या भावविश्वात गेली आहे. जय श्रीरामची घोषणा लोकप्रिय होताना दिसते. नागरिकत्व कायद्यात धर्माचा विषय आणण्यात आला आहे. 'जर हिंदुंना असे वाटत असेल की, त्यांना मुस्लिम आणि ख्रिश्चनांकडून धोका आहे, तर त्यांच्या भावनांची आपण दखल घ्यायला हवी. आणि हिंदुराष्ट्राच्या संभाव्यतेची चर्चा करायला हवी. असे स्पष्ट मत लेखक नोंदविताना दिसतात.
जगात ख्रिश्चन देश, मुस्लिम देश यांची मॉडेल्स आहेत. श्रीलंकेचे बुद्धीस्ट माॅडेल आहे. भारत हिंदुराष्ट्र म्हणजे धर्माधारित राष्ट्र होण्याने आपली आंतरराष्ट्रीय प्रतिमा जरी डागाळली तरी त्यात धार्मिक अल्पसंख्याकांना काहीच धोका नाही. देश मनुस्मृतीच्या आधारावर चालणार नाही, तर देश,'मानवी अधिकार' म्हणजे "समानतेचा अधिकार" आणि "भेदभाव विरहित वागणूक" या संकल्पनावरच चालेल. आजच्या 'सेक्युलर राज्यापेक्षा' हिंदुराष्ट्र अजिबात वेगळे असणार नाही. भारताला हिंदुराष्ट्र घोषित करण्यासाठी घटनेत सुधारणा करावी लागेल. बेसिक स्ट्रक्चरचा सिद्धांत म्हणजे (मूलभूत चौकटीचा केशवानंद भारती निकाल) बाजूला सारण्यासाठी १५ न्यायमूर्तींचे खंडपीठ स्थापन करावे लागेल.
मुस्तफा यांच्या लेखाचा हा मूळ गाभा आहे. पुढे त्यांनी पाकिस्तान, बांगलादेश, श्रीलंका यांच्या संविधानाचे दाखले दिले आहेत. ही संविधाने धर्माधारित असली तरी संविधानातील अन्य धर्मियांच्या धर्मरक्षणाची हमी देण्यात आली आहे. (ती व्यवहारात किती अमलात येते हा प्रश्न सोडून देण्यात आला आहे.) 'हिंदू धर्माला प्रभावी आध्यात्मिक वारशाचा दर्जा' धर्माला त्यामुळे 'प्रामाणिक उदारमतवाद' देशात निर्माण होईल. सर्वांना म्हणजे धार्मिक अल्पसंख्याकांना 'स्वातंत्र्य' आणि 'सांस्कृतिक स्वायत्तता' प्राप्त होईल, असे लेखकाचे म्हणणे आहे.
'हिंदुराष्ट्र' विषयावर उलटसुलट लिहिणारे खूप आहेत. त्यांचा युक्तिवाद एका ठराविक साच्याचा असतो. 'हिंदुराष्ट्र ही प्रतिगामी संकल्पना आहे, धर्माच्या आधारे राष्ट्र उभे राहते नाही; हा धार्मिक कलहाचा विषय आहे; अस्पृश्य, आदिवासी, भटके-विमुक्त यांना हिंदुराष्ट्रात स्थान राहणार नाही; पुन्हा एकदा मनुस्मृतीचे कायदे आणण्याचा हा डाव आहे; स्त्रिया पुन्हा दास्यात जातील, इत्यादी इत्यादी. यापैकी कोणताही विषय लेखक घेत नाही, फक्त घटनात्मक चौकटीत लेखक आपली मते मांडताना दिसतात. अशा प्रकारची मांडणी यापूर्वी माझ्या वाचनात आली नाही. या वेगळ्या मांडणीचे स्वागत करायला पाहिजे.
देशात घटनातज्ज्ञ अनेक आहेत. फली नरीमन त्यातील एक आहेत. राज्यघटनेच्या अभ्यासाला जेव्हा मी प्रारंभ केला तेव्हा त्यांच्या पुस्तकांनी गुरुसारखे काम केले. योगी आदित्यनाथ जेव्हा उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री झाले तेव्हा त्यांचे वक्तव्य आले की, हिंदुराष्ट्र निर्माणाची ही सुरुवात आहे. त्यांचे वक्तव्य ऐकून मला हसू आले आणि जाणवले की ते महान घटनातज्ज्ञ जरुर आहेत, पण संघाचे हिंदुराष्ट्र म्हणजे काय, हे त्यांना अजिबात समजलेले नाही. तीच गोष्ट मुस्तफा यांची आहे. त्यांनाही हिंदुराष्ट्र म्हणजे काय याचे नीट आकलन झाले आहे, असे म्हणता येणार नाही.
आज देशात हिंदुराष्ट्राची जी चर्चा चालते ती प्रामुख्याने संघाच्या हिंदुराष्ट्राची चर्चा असते. संघाची हिंदुराष्ट्राची संकल्पना धार्मिक नाही. थिओक्रटिक स्टेट म्हणजे धर्माधारित राष्ट्र संघाला अभिप्रेत नाही. धर्माधारित राष्ट्र होण्यासाठी तीन गोष्टी आवश्यक आहेत. १. एकच ईश्वर २. एकच ग्रंथ ३. एकच प्रेषित. हिंदू धर्म अनेक देवतावादी आहे. त्याचा एकच प्रमाणित ग्रंथ म्हणजे बायबल, कुराण नाही. त्याचा कुणी एक प्रेषित नाही. हिंदू धर्म ही अनेक उपासना पंथाची संसद आहे. या संसदेत देवाला मानणारे आहेत, न मानणारे आहेत, सगुणाची उपासना करणारे आहेत, निर्गुणाची पूजा करणारे आहेत, मूर्तिपूजक आहेत, मूर्तिपूजा नाकारणारे आहेत. अशा हिंदू धर्माच्या आधारे धर्माधारित राष्ट्र उभेच राहू शकत नाही.
आणखी एक गुत्यांचा विषय आहे. आपण रिलिजनला धर्म समजतो. रिलिजन म्हणजे धर्म नव्हे. रिलिजन ही पूजापद्धती आहे. रिलिजन ही धार्मिक संघटना आहे. रिलिजनचे पूजाविधी, प्रार्थना, आचार पद्धती ठरलेल्या असतात. त्यांचे पालन न करणाऱ्याला रिलिजनमध्ये स्थान नसते. रिलिजन बंदिस्त असतो. रिलिजन विस्तारवादी असतो. अन्यांना तो एकतर पापी, हिदन, काफर समजतो. अशा लोकांना आपल्या रिलिजनमध्ये आणणे हे धार्मिक पवित्र कार्य समजले जाते.
हिंदू नावाचा रिलिजन अस्तित्वात नाही. हिंदू ही एक जीवनपद्धती आहे. पूजापद्धती तिच्या असंख्य अंगापैकी एक अंग आहे, एकमेव अंग नव्हे. ही जीवनपद्धती मानते की, चराचर सृष्टी एकाच चैतन्याचा आविष्कार आहे. जे माझ्यात, ते तुझ्यात. आपण दोघे एकाच चैतन्याची वेगवेगळी रुपे आहोत. सृष्टीत विविधता आहे. एकच चैतन्य अनेक रुपात प्रगट होते. त्या चैतन्याचा आदर केला पाहिजे. त्यात भेद पाहू नयेत. 'भेदाभेद दृष्टी अमंगल, प्रत्येकाची रुची भिन्न राहणार, व्यक्तीत्व भिन्न राहणार म्हणून प्रत्येकाला निवडीचे स्वातंत्र्य आहे, त्याचा सन्मान करायला पाहिजे. प्राणीजगताविषयी दयाभाव ठेवला पाहिजे. हिंसा करु नये. प्रत्येकाला जगण्याचा अधिकार आहे. विचारांची भिन्नता राहणार, तरीही विचारांचा समन्वय करून जगता आले पाहिजे. माझेच म्हणणे खरे, अन्य सर्व पाखंडी, असा विचार करून नाही चालणार. असे जीवन जगणाऱ्याला हिंदू म्हणायचे.
हिंदू ही केवळ भौगोलिक, पांथिक, राजकीय संकल्पना नाही. तू मुसलमान म्हणून मी हिंदू अशी प्रतिक्रिया चूकही नाही. यामुळे हिंदू जीवनपद्धती सर्वसमावेशक, सहिष्णू, समन्वयवादी आणि त्यामुळे अतिशय उदार जीवनपद्धती आहे. मुस्तफा ज्याला सेक्युलॅरिझम म्हणतात, तो या जीवनपद्धतीचा एक लहानसा भाग आहे. सेक्युलॅरिझममध्ये टालरन्स म्हणजे सहन करण्याचा भाग असतो. हिंदू जीवनपद्धती त्याच्यापुढे जाऊन सांगते की, प्रत्येकाच्या म्हणण्यात सत्याचा अंश असतो आणि तो अंश ती ग्रहण करते. म्हणून हिंदुराष्ट्राच्या संदर्भात सेक्युलॅरिझमची चर्चा अनाठायी चर्चा आहे.
मुस्तफा, इंग्लंड, अमेरिका, फ्रान्स, आयर्लंडचे उदाहरण देतात. या देशात सेक्युलॅरिझम कसा आणावा लागला? इंग्लंड, आयर्लंड यांच्यातील कॅथॉलिक- प्रोटेस्टंट यांचा संघर्ष शब्दशः लाखो लोकांना ठार मारण्याचा आहे. ख्रिश्चनच ख्रिस्ती माणसाची कत्तल करतो. स्पेनची राणी इसाबेला हिने १५व्या शतकात एक-दोन वर्षातच जवळजवळ १० हजार ख्रिश्चन पाखंडी ठरवून ठार मारले. खुद्द इंग्लंडमध्ये कॅथॉलिक - प्रोटेस्टंट यांचा संघर्ष असाच माणसे मारण्याचा आहे. आपल्याच धर्मातील माणसांना ठार करण्याचा हा इतिहास आहे. म्हणून तेथे राज्य आणि धर्मसत्ता यांची फारकत करण्यात आली. दोन सत्तांची सत्ताकेंद्रे वेगळी झाली. दोन्ही सत्ताकेंद्रे संघटित, धनशक्तीने मोठी, अधिकारशक्तीनेही मोठी आहेत. आपल्या देशात हिंदू नावाचा संघटित रिलिजन नाही. तो उभा करणे अशक्य आहे. त्यामुळे एकाच उपासना पंथातील लोक हिंसक होत नाहीत. ते चर्चा आणि वाद- विवाद करीत राहतात.
अमेरिकेत जसे ख्रिश्चन आले, ते धर्मछळाला कंटाळून आले. त्यात प्युरिटन्स ख्रिश्चनांचा भरणा मोठा होता. कुणालाच पोपशाही नको होती. पोपशाहीला ते 'पोपरी' म्हणत. आपल्या नवीन भूमीत धार्मिक छळ नको. राज्यसंस्थेने धार्मिक विषयात हस्तक्षेप करु नये, हा विचार प्रबळ झाला. सर्वप्रथम व्हर्जिनिया राज्याने राज्यसत्ता आणि धर्मसत्ता वेगळा करणारा कायदा, अमेरिका स्वतंत्र होण्यापूर्वीच केला. तोच आशय अमेरिकेच्या राज्यघटनेत आला आहे. तेथला सेक्युलॅरिझम म्हणजे ख्रिश्चन रिलिजनमधील वेगवेगळ्या पंथांना उपासनेचे स्वातंत्र्य राहील. राज्यसंस्था कोणत्याही एका उपासना पंथाचा स्वीकार करणार नाही.
आपला प्रश्र्न अतिशय वेगळा आहे. आपला प्रश्र्न जीवनपद्धतीच्या रक्षणाचा नाही. ही जीवनपद्धती काफरवाद, जिहाद, हालेलुया, हिदन हे शब्द संकटात आणतात, कुणी अल्लाची उपासना करतो की आकाशातील बापाची यांच्याशी हिंदूंचे भांडण नाही. श्रद्धेने तोदेखील दर्ग्याला जातो, चर्चमध्ये जातो, प्रार्थना करतो. ईश्वर सर्वव्यापी आहे. ही त्याची श्रद्धा आहे. ही श्रद्धा कुराणवाद्यांची आहे का? बायबलवाद्यांची आहे का? हा खरा प्रश्न आहे. प्रश्र्न राज्यघटनेच्या सुधारणेचा नाही. प्रश्र्न मानसिक परिवर्तनाचा आहे. प्रश्र्न आम्ही अरबी संस्कृतीचे गुलाम म्हणून जगणार, आणि पोर्तुगाल, स्पेन, इंग्लंडच्या संस्कृतीचे गुलाम म्हणून जगणार यांच्या उत्तराचा आहे. हिंदू जीवनपद्धती, जिला भारतीय जीवनपद्धती, सनातन जीवनपद्धती, मानवी जीवनपद्धती म्हणता येईल याच्या अंगीकाराचा आहे, त्याकडे लक्ष द्यायला पाहिजे.