पं. नेहरु यांचे भारतमातेविषयी असलेले विखुरलेले विचार या पुस्तकात वाचायला मिळतात. त्याने बरे वाटते. नेहरुदेखील भारतमातेचा विचार करीत होते, हे निदान माझ्यासारख्याला तरी नवीन असते. या पुस्तकातील पं. नेहरुंचे नावीन्यपण समजून सांगण्याऐवजी डॉ. मनमोहन सिंग यांनी आपल्या परंपरेला जागत आणि खाल्ल्या मीठाला इमान राखीत, भाजप विचारधारेवर अपरोक्षपणे भरपूर टीका केली.
‘Who is Bharat Mata?’ या शीर्षकाचे पुस्तक पुरुषोत्तम अग्रवाल आणि राधाकृष्ण या लेखकद्वयींनी प्रकाशित केले आहे. या पुस्तकाचा कानडी अनुवाद करण्यात आला. नवी दिल्ली येथे या पुस्तकावर कार्यक्रमही झाला. मुख्य वक्ते होते, भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग. मराठी वाचकांना, सामान्यत: पुरुषोत्तम अग्रवाल आणि राधाकृष्ण कोण आहेत, याची माहिती फार कमी असेल. बहुधा हे तथाकथित मुख्यधारेतील म्हणजे सत्तेच्या परिघात वावरणारे लेखक असावेत. ते तसे नसते तर डॉ. मनमोहन सिंग या कार्यक्रमात उपस्थित राहिले नसते. डॉ. मनमोहन सिंग सोडून ‘वेगळ्या विचारधारे’तील कोणाला अशा कार्यक्रमात बोलवण्यात आले नव्हते. याचे कारण असे की, अशा कार्यक्रमात ‘वेगळी विचारधारा’ ठेवणार्यांना सहिष्णुता, व्यापकता, मानवता, सर्वसमावेशकता, बहुविधता याच्याविषयी ऐकवायचे असते. डॉ. मनमोहन सिंग यांनी हे काम अर्थशास्त्रीय प्रमाणबद्धतेने केले आहे.
सर्वप्रथम या पुस्तकाविषयी थोडी माहिती घेऊया. ‘Who is Bharat Mata?’ म्हणजे ‘भारतमाता कोण आहे?’ अशा शीषर्काचे हे पुस्तक. हे पुस्तक पं. जवाहरलाल नेहरु यांच्या भारताविषयीच्या विचारांचे संकलन आहे. अन्य लोकांनी पं. नेहरुंविषयी काय म्हटले, खुद्द पं. नेहरु यांनी मुलाखतीत काय म्हटले, त्यांची काही निवडक पत्रे, त्यांच्या इतर पुस्तकातील निवडक उतारे, अशा सर्वांचे संकलन म्हणजे हे पुस्तक. हे पुस्तक वाचताना नेहरुंच्या, आपल्याला माहीत नसलेल्या काही पैलूंशी परिचय होतो. तशी नेहरुंची प्रतिमा ‘भारतमातेचे भक्त’ अशी नाही; ते समाजवादी, सर्वधर्म समभाववादी, जागतिक शांततेचे अग्रदूत असेच आपल्याला आजवर परिचित आहेत. आधुनिक भारताची पायाभरणी त्यांनी केली, असेही त्यांचे भक्त वारंवार सांगत असतात. त्यामुळे भारतमाता आणि पं. नेहरु हा थोडा कुतूहलाचाच विषय होता.
लेखकांनी आपल्या पुस्तकात नेहरुंची भारतमातेविषयीची काही अवतरणे दिली आहेत. त्यातील दोघांचा सारांश बघूया - “भारत म्हणजे मानवी समूहाचा एक प्रदेश, असे काही मी मानत नाही. भारतीय समाजातील वर्ग, जाती, पंथ, वंश, यांची विविधता आणि भेद याची मला पूर्ण कल्पना आहे. असे जरी असले तरी देशाला दीर्घकाळाचा सांस्कृतिक वारसा आहे, तसेच जीवनाकडे बघण्याचा एक समान दृष्टिकोेन आहे, हे त्याचे खास वैशिष्ट्य आहे. आपापसात कितीही विविधता असली तरी त्याचे जाणवण्याइतके परिणाम भारताच्या संततीवर दिसतात, चीनमध्ये तसे ते दिसत नाहीत.”
“सभा घेत घेत मी फिरत असतो. हिंदुस्थान आणि भारतातील माझ्या श्रोत्यांपुढे मी प्रश्न करतो की, भारतमाता काय आहे? ‘भारतमाता की जय’ तुम्ही म्हणता, त्याचा अर्थ काय? त्याचा अर्थ सांगताना सामान्य शेतकरी म्हणतात की, ही भूमी आमची आई आहे. मी विचारतो की, भूमी म्हणजे तुमच्या खेड्यातील भूमी की जिल्ह्यातील भूमी की देशातील भूमी? नंतर मी त्यांना सांगतो की, नद्या, पर्वत, जंगल, हे सर्व आम्हाला प्रिय असले तरी ‘भारतमाता’ म्हणजे कोट्यवधी लोक. ‘आपण सर्व म्हणजे भारतमाता’ असा त्याचा अर्थ करावा लागतो.”
पं. नेहरु यांचे भारतमातेविषयी असलेले विखुरलेले विचार या पुस्तकात वाचायला मिळतात. त्याने बरे वाटते. नेहरुदेखील भारतमातेचा विचार करीत होते, हे निदान माझ्यासारख्याला तरी नवीन असते. या पुस्तकातील पं. नेहरुंचे नावीन्यपण समजून सांगण्याऐवजी डॉ. मनमोहन सिंग यांनी आपल्या परंपरेला जागत आणि खाल्ल्या मीठाला इमान राखीत, भाजप विचारधारेवर अपरोक्षपणे भरपूर टीका केली. ते म्हणाले की, “राष्ट्रवाद आणि ‘भारतमाता की जय’ ही घोषणा या दोघांचा लढाऊ आणि भावनिक पद्धतीने आणि चुकीच्या पद्धतीने उपयोग करण्यात येतो. ‘भारत’ या संकल्पनेतून लक्ष्यावधी लोकांना वगळण्यासाठी याचा वापर केला जातो.” ते पुढे आणखी असे म्हणाले की, “या पुस्तकाचा हेतू सार्या जगाला आणि विशेष करुन भारताला तो पटवून देण्याचा आहे की, कशा प्रकारे पं. नेहरु यांनी ‘भारताची संकल्पना’ (‘आयडिया ऑफ भारत’) गांधीवादी विचारधारेवर उभी केली आहे. तसेच भूतकाळ आणि वर्तमानकाळ यांच्यात सुसंवाद साधून सांप्रदायिक तणावमुक्त भारत उभा करण्याचा कसा प्रयत्न केला होता, बहुविधता रक्षणाचा हाच मार्ग आहे. नेहरुंची ही विचारसरणी या पुस्तकातून स्पष्ट होते.
डॉ. मनमोहन सिंग यांनी काही मुद्दे उपस्थित केले आहेत. त्यातील दोन-तीन मुद्द्यांचा विचार केलाच पाहिजे. ते म्हणतात त्याप्रमाणे ‘राष्ट्रवाद’ आणि ‘भारतमाता’ ही संकल्पना लढाऊ आणि केवळ भावनिक नाही. डॉ. मनमोहन सिंग म्हणतात की, “पं. नेहरु यांना कोणी फारसे वाचत नाही.” त्यांचा रोख हिंदुत्व विचारधारा मानणार्यांनी नेहरु वाचावे असा आहे. उलटा प्रश्न आपण त्यांना विचारु की, ‘भारतमाते’ची संकल्पना 33 वर्षे भारतात दोनदा भ्रमण करून ज्या महापुरुषाने हजारो भाषणांतून मांडली, त्याचे नाव तुम्हाला माहीत आहे का? त्यांचे नाव आहे, माधव सदाशिव गोळवलकर. ‘जननी, जन्मभूमी, भारतमाता’ ही संकल्पना वेदकाळापासून कशी आहे, ती लोकजीवनात किती खोलवर रुजली आहे, तिची भक्ती करत असताना जगन्मातेचीच पूजा आपण करीत असतो, ती कशी, हे सर्व श्रीगुरुजींनी केवळ भावनिकदृष्ट्या नाही, तर तर्कशुद्ध रितीने मांडले आहे. म्हणूनच दुसर्यांना उपदेश करण्यापूर्वी आपले भांडे अर्धे भरले आहे, याची जाणीव ठेवलेली बरी!
डॉ. मनमोहन सिंग यांनी ‘आयडिया ऑफ भारत’ असा शब्दप्रयोग केला आहे. हा शब्दप्रयोगदेखील मुख्यधारेतील सत्ता परिघात वावरणार्या लोकांचा आहे. तो बुद्धिभेद निर्माण करण्यासाठी केलेला आहे. त्याचा समाचार नंतर कधी तरी घेऊ. ‘भारत’ ही संकल्पना नाही. ‘भारत’ हे वास्तव आहे. ‘आयडिया ऑफ भारत’ नसून ‘इंटरनल रिअॅलिटी भारत’ म्हणजे ‘शाश्वत सत्य भारत’ हे वास्तव आहे. भारत पं. नेहरुंनी निर्माण केलेला नाही, गांधीजींनी निर्माण केलेला नाही, तो सनातन आहे. इतिहासाच्या पहिल्या पानापासून तो सनातन आहे. त्याची एक ओळख आहे. त्याची एक संस्कृती आहे, त्याची एक जीवन मूल्यप्रणाली आहे, त्याचे अस्तित्त्व कोट्यवधी भारतीयांच्या मनात आहे. ते त्याच्या मनात इतर कुणामुळेही रुजलेले नाही. ते त्याला त्याच्या आईच्या दुधातूनच मिळते.
ही सनातन, शाश्वत भारताची संकल्पना आणि पं. नेहरु यांची ‘आयडिया ऑफ भारत’ एक नव्हे. पं. नेहरु अधूनमधून ‘भारतमाता कोण?’ तिच्यातील सांस्कृतिक एकता, लोकांच्या विचाराचे एकसारखेपण सांगतात. चांगली गोष्ट आहे, त्याचे स्वागत केले पाहिजे आणि ते नाकारण्याचेही काही कारण नाही. परंतु, पं. नेहरु यांचा ‘प्लुरॅलिझम’ म्हणजे ‘बहुविधता’ म्हणजे ‘भारताची सनातन बहुविधता’ नव्हे. पं. नेहरुंनी ‘मेजॉरिटी कम्युनॅलिझम’ हा शब्दप्रयोग केला आहे. भारतात बहुसंख्य हिंदू आहेत. नेहरुंच्या परिभाषेत ते ‘सांप्रदायिक’ होतात. नेहरुंच्या परिभाषेत ‘मायनॉरिटी कम्युनॅलिझम’ नसतो. त्यांचे संरक्षण करावे लागते. नेहरुंच्या ‘मेजॉरिटी कम्युनॅलिझम’ या शब्दातून त्यांच्या शिष्यांनी ‘भगवा दहशतवाद’ किंवा ‘हिंदू दहशतवाद’ हा शब्द शोधलेला आहे. डॉ. मनमोहन सिंग विद्वान आहेत. विद्वानाने एकतर्फी युक्तिवाद करायचा नसतो. सगळेच जण काही अडाणी नसतात किंवा भक्त नसतात. चांगले काय आणि चुकले काय, हेही मांडायला पाहिजे.
पं. नेहरु यांनी गांधीजींच्या विचारांवर भारताची रचना करण्याचा प्रयत्न केला, असे डॉ. मनमोहन सिंग सांगून गेले. डॉ. मनमोहन सिंग यांना असे विचारणे अवघड आहे की, ‘त्यांनी गांधी वाचले आहेत का?’ आणि कोणत्या गांधीविचारांवर नेहरु चालले, हे ते सांगू शकतात का? प्रश्न जरी करता येत नसला तरी त्याची उत्तरे देऊया. पं. नेहरु यांनी गांधीजींच्या हत्येनंतर गांधी विचारांचे दफन केलेले आहे. गांधीजींनी साधेपणा सांगितला, गोहत्या बंदी करायला सांगितली, ग्रामीण उद्योग उभे करायला सांगितले, स्वयंपूर्ण खेडे उभारायला सांगितले, स्वदेशीच वस्तूंचा वापर करा, हे सांगितले. विदेशाची नक्कल करू नका, तो मार्ग विनाशाला नेण्याचा आहे, हे गांधीजींनी ‘हिंद स्वराज’मध्ये सांगितले.
पं. नेहरुंनी यापैकी काय केले? देश रशियाच्या दावणीला बांधला. गाय कसायाच्या हातात दिली. खेडी उद्ध्वस्त केली. समाजवाद आणून लोकांना आळशी आणि फुकटखाऊ केले. स्वदेशीऐवजी विदेशी वस्तूंनी आज बाजारपेठा गच्च भरलेल्या आहेत. हा पराक्रम डॉ. मनमोहन सिंग यांनी केला. शिक्षणातून धर्माला, नीतीला हद्दपार केले. त्याचे भयानक परिणाम समाजजीवनावर झालेले आहेत, याची यादी खूप मोठी होईल. लेखाला मर्यादा असते, म्हणून थांबावे लागते. डॉ. मनमोहन सिंग यांचे भाषण एककल्ली, एकतर्की आणि नेहरूंची नको असलेली स्तुती करणारी आहे. नेहरु लोकशाहीवादी होते, ते भारतभक्त होते, काही प्रमाणात ते वेगळ्या विचारांचा स्वीकार करीत. भारताचे त्यांनी स्वप्न पाहिले, या गोष्टी जशा खर्या आहेत, तशा ‘नेहरु म्हणजे चिरकालिक आदर्श आहेत,’ हा न पचणारा आणि न टिकणारा सिद्धांत आहे. डॉ. मनमोहन सिंग यांनी तो स्वत:पुरताच ठेवावा, हे बरे!