'मी व्यवसाय कसा करू, मला त्यातलं काही कळतंही नाही,' असा विचार करत संपूर्ण आयुष्य चाकोरीत वेचणाऱ्यांसाठी अजित कंडरे (यलमार) यांचा प्रवास डोळ्यात अंजन घालणारा आहे. 'मनात आणले तर काहीच अशक्य नाही,' हा अजित यांचा स्वभावच त्यांच्या यशाचे गमक. अशा या उद्यमीच्या यशस्वी भरारीचा घेतलेला आढावा...
'काहीही झाले तरी दुसऱ्यासाठी काम करायचे नाहीच. जितके कष्ट घ्यावे लागतील, जितकी तडजोड करावी लागेल, ती केवळ आणि केवळ स्वतःसाठीच करायची,' असा ठाम विचार करणाऱ्या अजित कंडरे यांनी डोळ्यासमोर 'नोकरी' हा पर्याय कधी ठेवलाच नाही. ज्या काळात उद्योग-व्यवसायात उतरण्यासाठी मराठी तरुण धजावत नव्हता, त्या काळात अजित यांनी बांधकाम क्षेत्रात पाऊल ठेवत आपल्या कर्तृत्वाची उत्तुंग इमारत उभी करत तरुणांसमोर आदर्श उभा केला. 'वास्तू बिल्डर्स अॅण्ड डेव्हलपर्स' (नवी मुंबई), 'अजित कन्स्ट्रक्शन्स' (मुंबई), 'कंडरे डेव्हलपर्स' (पंढरपूर), 'कंडरेज् फिटनेसज् हब', पंढरपूर (KFH) आदी उद्योग शृंखलांचा विस्तार त्यांनी आपल्या कार्यकाळात केला आहे. आज सव्वाशे जणांना त्यांच्यामार्फत थेट रोजगार उपलब्ध झाला आहे. विठुरायाच्या पंढरीत जन्मलेल्या अजित यांच्यावर तिथल्या मातीतले संस्कार आपसुकच रुजले. बारावीपर्यंतचे शिक्षण पंढरपुरातच झाले. मुळातच तंत्रशिक्षणाची आवड असल्याने त्याच क्षेत्रात करिअर करायचे, असा निश्चय त्यांनी केला होता. त्यानुसार अजित यांनी मुंबईत सिव्हिल इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण केले. आयुष्याच्या शाळेत कमावलेला आत्मविश्वास त्यांना पुढील वाटचालीसाठी मोलाचा ठरला.
व्यवसाय करायचा मग तो भव्य दिव्यच हवा, असा अट्टाहास अजित यांनी कधी केलाच नाही. मुंबईत कंत्राटदार म्हणून लहानसहान कामांची सुरुवात त्यांनी केली. १९९१ साली त्यांनी 'अजित कन्स्ट्रक्शन'च्या माध्यमातून सार्वजनिक बांधकाम खात्यामध्ये कामे मिळविण्यास सुरुवात केली. अनुभव होताच, मात्र उद्योजक म्हणून नवख्या असलेल्या अजित यांनी व्यवसायातील बारकावे समजून घेतले. या कठीण काळात बहीण संगीता विभूते आणि भावोजी मधुकर विभूते यांनी दाखवलेल्या विश्वासावर ते खरे उतरले. उद्योग करणाऱ्याला अवकाश ठेंगणे असते, या उक्तीप्रमाणे विविध क्षेत्रातील व्यवसायांमध्ये यशस्वीरित्या आपले व्यवसाय कौशल्य आजमावून पाहिले. २०११ मध्ये मित्र विजय निकम, सुनील कोळेकर आणि नातेवाईक संग्राम पाटील, आनंद पाटील, उत्तम कंडरे यांना सोबत घेऊन 'वास्तू बिल्डर्स अॅण्ड डेव्हलपर्स' ही भागीदारी तत्त्वावरील कंपनी सुरू केली. अजित हे स्वतः या कंपनीत संचालक पदावर आहेत. बांधकाम क्षेत्रातील विश्वासाचे नाव म्हणजे 'वास्तू' अशी ओळख प्रस्थापित करण्यात त्यांना यश आले आहे.
कंपनी सुरू करण्यापूर्वी पैसा कमावणे हा मुख्य हेतू न ठेवता सर्वसामान्यांनी साठवलेल्या आयुष्यभराच्या पुंजीतून त्यांना एक स्वप्नातलं घर परवडणाऱ्या किंमतीत घेता यावे, या हेतूने सुरू केलेला या संकल्पाचे मूर्तरूप म्हणजेच 'वास्तू.' आज नवी मुंबई, पनवेल, उरण आदी भागांत 'वास्तू'तर्फे उभारण्यात आलेले डौलदार रहिवासी संकुल प्रकल्प अजित यांचे स्वप्न सत्यात उतरल्याची साक्ष देतात. ग्राहकांना हव्या असलेल्या मूलभूत सोयी कुठलीही तडजोड न करता पुरवणे हेच उद्दिष्ट ठेवून काम केल्याने मंदीच्या काळापासून ते आजवरच्या चढउतारातही व्यवसायात तग धरून राहण्याचे कसब त्यांनी विकसीत केलेले दिसते. 'वास्तू बिल्डर्स अॅण्ड डेव्हलपर्स'च्या यशानंतर आता अजित यांना त्यांची जन्मभूमी खुणावू लागली होती. त्या काळात पंढरपुरात 'फ्लॅट संस्कृती' रुजेल का, लोकांना अशी घरे आवडतील का, असा प्रश्न होता, तरीही धाडस करण्याचा निर्णय अजित यांनी घेतला. पंढरपूर तीर्थक्षेत्रातील विश्वासू नाव असल्यामुळे 'कंडरे डेव्हलपर्स'ची स्थापना केली. सात वर्षांपूर्वी पंढरपुरात 'फ्लॅट संस्कृती' तितकीशी रुजली नव्हती. तरीही नोकरदार, स्थानिकांनी 'कंडरे डेव्हलपर्स'वर विश्वास दाखवला. अशाप्रकारे कर्मभूमीसोबत जन्मभूमीतही त्यांनी व्यवसाय विस्तार केला. या कामात त्यांचा पुतण्या अभिजीत कंडरे याचे मोलाचे सहकार्य त्यांना लाभले.
कंडरे परिवार
'कंडरे' हे नाव शरीरसौष्ठव, कुस्तीसाठी प्रसिद्ध होते. याच नावाला व्यावसायिक रुप देण्याचा निर्णय अजित यांच्यातील उद्योजकाने घेतला. २०१४ मध्ये 'कंडरे फिटनेस हब', पंढरपूर (KFH)ची सुरुवात केली. यात त्यांच्या मित्राचीही साथ मिळाली. लोकांमध्ये व्यायामाची आवड निर्माण व्हावी, एक सुदृढ समाज निर्माण व्हावा, ही सामाजिक भावना त्यामध्ये होती. सात वर्षांपूर्वी पुणे-मुंबईच्या धर्तीवर सुरू करण्यात आलेली 'जिम' सोलापूर जिल्ह्यात प्रसिद्ध झाली. स्वतः अजितही तंदुरुस्त आणि स्वास्थ्याबद्दल जागरुक आहेतच. ते नियमितपणे जिम, योग करतात. तसेच कर्मचाऱ्यांसाठी त्यांनी वर्षभरापासून 'सायकल अभियान' देखील राबविण्यास सुरुवात केली. फिटनेस आणि जनजागृतीसाठी 'कंडरे फिटनेस हब' (KFH) तर्फे दरवर्षी दरवर्षी 'शरीरसौष्ठव स्पर्धा' आयोजित केली जाते. तसेच यावर्षी प्रथमच पंढरपूर येथे 'पंढरपूर रनर असोसिएशन'च्या माध्यमातून मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले होते. यामध्येही स्वतः अजित, पत्नी अलिशा आणि त्यांच्या 'घऋक' टीमने खूप हिरिरीने सहभाग घेतला होता.
अजित यांना समाजकार्याचीही तितकीच आवड. पंढरपूर तालुक्यातील भंडीशेगावाचे पालकत्व त्यांनी स्वीकारले. शासकीय योजना, ग्रामस्थ, मित्रांच्या सहकार्याने गावात मूलभूत सोयीसुविधा मिळवून देणे, वृक्षलागवड, व्यायामशाळा बांधणे, त्यांच्या अडीअडचणी सोडवण्याचे काम त्यांनी केले. या गावात ४२ एकर गायरान जागेवर 'ड्रीम फाऊंडेशन', NTPC, ग्रामपंचायत, 'सोलापूर सोशल फाऊंडेशन'च्या माध्यमातून वनीकरण प्रकल्प राबवला आहे. 'सोलापूर सोशल फाऊंडेशन'च्या माध्यमातून गावाखेड्यांचा विकास, रोजगारनिर्मिती आणि इतर जनहिताचे उपक्रम राबवण्याचे काम त्यांनी केले आहे. आपल्या रोजच्या पसाऱ्यातून वेळ काढत हे समाजाप्रति आपले दायित्व म्हणून हा वसा त्यांनी घेतला आहे. 'सोलापूर सोशल फेस्टिव्हल'द्वारे विविध स्टॉल्स भरवून खेड्यापाड्यातील उद्योजकांना ग्राहक मिळवून देण्याचे काम 'सोलापूर सोशल फाऊंडेशन'च्या माध्यमातून चालू आहे. पंढरपूर येथे आषाढी वारीला येणाऱ्या भाविकांसाठी मित्रमंडळींच्या सहकार्याने दरवर्षी एक लाख बुंदीच्या लाडवांचे प्रसाद म्हणून वाटप करण्यात येते. तसेच 'स्वामी समर्थ महाराज पालखी सेवा सोहळा' गेली २५ वर्षे अविरत सुरू ठेवला आहे. एक उद्योजक असूनही समाजकार्यात अग्रेसर असणाऱ्या अजित यांच्या पत्नी अलिशा यांचेही खूप मोलाचे सहकार्य असते. अजित यांची पुढील पिढी पायल आणि कार्तिकेय यांचाही त्यांच्या या पसाऱ्यात सक्रीय सहभाग असतो. एका सर्वसामान्य कुटुंबात जन्म घेतलेल्या या व्यक्तिमत्वाने विविध क्षेत्रांमध्ये आपला ठसा उमटवला आहे, त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा!