दिल्ली विधानसभा निवडणुका अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पार्टीने जिंकल्या, त्याबद्दल त्यांचे अभिनंदन! भारतीय जनता पक्षाने निवडणूक जिंकण्यासाठी खूप मेहनत घेतली. पण, अपेक्षेइतके यश मिळाले नाही. काँग्रेस पक्षाने दिल्लीची सत्ता सलग १५ वर्षे उपभोगली. यावेळी काँग्रेस पक्षाला एकही जागा मिळाली नाही, तर अन्य छोटे मोठे पक्ष पार भुईसपाट झाले.
काहीजणांनी दिल्लीची निवडणूक अतिशय महत्त्वाची मानली. देशाचे राजकारण निश्चित करणारी ही निवडणूक आहे, असे काहीजणांचे मत होते. निवडणुकीत भाजपला अपयश आल्यास, भाजपच्या अपयशाचा कालखंड सुरू झाला, असे समजले जाईल. अशा प्रचाराचा परिणाम भाजपविषयी सहानुभूती असणार्या लोकांच्या मनावर होतो. त्यांना हे समजत नाही की, मानसशास्त्रीयदृष्ट्या भाजप समर्थकांमध्ये संभ्रम निर्माण करण्यासाठी असा प्रचार, ही एक खेळी असते. त्याला आपले लोक बळी पडतात. दिल्लीच्या यशापयशाचा भाजपच्या राष्ट्रीय यशापयशाशी काही संबंध नाही, ही गोष्ट ठामपणे लक्षात घ्यायला पाहिजे. केजरीवाल मोदींना पर्याय होऊ शकत नाहीत. प्रसारमाध्यमांनी लाखो ढोल बडवले तरी ते शक्य नाही.
भाजपला अपयश मिळाले, ही गोष्ट आकडेवारी सांगते. त्याची कारणे काय? त्याचे पहिले कारण असे की, केजरीवाल यांनी मतदारांना फुकट वीज, पाणी आणि महिलांना बसचा प्रवास देऊ केला. हा ‘फुकट्यां’चा विजय आहे. त्यामागे कोणताही राजकीय विचार नाही किंवा कसलाही आर्थिक सिद्धांत नाही.
‘फुकटखाऊ’ मनोवृत्ती देशाला अतिशय घातक असते. व्यक्तीला ती तात्कालिक लाभ देणारी असली तरी दीर्घकाळाचा विचार करता, ती त्याचा घात करणारी आहे. फुकट मनोवृत्ती वीज, पाणी, प्रवास इथेच थांबणार नाही. ‘आम्हाला घरबसल्या पगार द्या,’ इथपर्यंत ती जाईल. आपण आपल्या देशाला ‘प्रजासत्ताक’ म्हणतो. अमेरिकेच्या ‘रिपब्लिक’ शब्दाचा हा अनुवाद आहे. अमेरिकेत ‘रिपब्लिक’ याचा अर्थ केवळ ‘प्रजेची सत्ता’ असा नाही. या शब्दात अनेक मूल्यसंकल्पना आहेत. त्यातील पहिली मूल्यसंकल्पना आपल्याला आपला विकास आपल्या कर्तृत्वाने करायचा आहे. ‘फुकटखाऊ’ मनोवृत्ती ठेवायची नाही. समूहाचे हित की माझे हित, असा प्रश्न निर्माण झाला असता समूहाच्या हिताला प्राधान्य द्यायचे. प्रोटेस्टंट धर्माच्या मूल्यांचे जीवनात पालन करायचे. ‘रिपब्लिक’ या शब्दाचा थोडक्यात हा अर्थ आहे.
आपल्या ‘प्रजासत्ताक’चा अर्थ कोणता? ‘मतदारांनो, तुम्ही कष्ट करू नका, स्वत:चा विकास करण्यासाठी मेहनत घेऊ नका, राज्याकडे फुकट मागा. आम्हाला मते द्या, आम्ही तुम्हाला फुकटाची सवय लावतो.’ हा आपल्या ‘प्रजात्ताका’चा अर्थ राजकीय नेत्यांनी केलेला आहे. स्वाभिमानशून्य जीवन जगण्यात पुरुषार्थ नाही. ज्याच्या निर्मितीसाठी समाजाचे धन खर्च होते, त्याची भरपाई प्रत्येक व्यक्तीने केलीच पाहिजे. ही वृत्ती जागविण्याच्याऐवजी केजरीवाल ‘भीकेला लावणारी वृत्ती’ जागवित आहेत.
भाजपच्या पराभवाचे दुसरे कारण थोडे गंभीर आहे, ते दिल्लीपुरते मर्यादित नाही. राज्याच्या निवडणुका राष्ट्रीय प्रश्नावर लढता येत नाहीत. प्रत्येक राज्याचे प्रश्न वेगवेगळे असतात. त्या-त्या प्रश्नांशी एकरूप झालेले प्रादेशिक नेतृत्व राज्यात असावे लागते. दरवेळी राष्ट्रीय प्रश्नांवर राज्याच्या निवडणुका जिंकता येणार नाहीत. दिल्लीत भाजपचा राजकीय चेहरा कोणता, हे या निवडणुकीत कधीच पुढे आले नाही. एकेकाळी मदनलाल खुराणा, साहेबसिंग वर्मा अशी नावे दिल्लीत होती. आज त्यांच्या तोडीचा कुणीही नेता नाही. केंद्रीय भाजप नेतृत्वाने याचा विचार केला पाहिजे.
‘आप’चे यश हा ‘सेक्युलर’ मतांचा विजय आहे, भाजपच्या धार्मिक प्रचाराला मतदारांनी नाकारले वगैरे कथा सध्या खूप जोरात आहेत. या दोन्ही विषयांना काही अर्थ नाही. मुळात दिल्लीत मुस्लीम लोकसंख्या फक्त बारा टक्के आहे. बहुसंख्य हिंदूंचीच आहे. हिंदू-मुसलमान असे विभाजन करून मतदान झाले असते, तर ‘आप’ला पाच जागादेखील मिळाल्या नसत्या. तसे काही झालेले नाही. एकूण मतदान फक्त ६३ टक्के झाले. भाजपला झोपलेल्या मतदाराला मतदान केंद्रावर आणण्यात अपयश आले.
या मतदारांना मतदान केंद्रावर आणण्याचे काम बुथ स्तरावरील कार्यकर्ते करतात. त्या कार्यकर्त्याला प्रेरणा देण्यासाठी स्थानिक नेते लागतात. कार्यकर्ते कमी पडले हे तर उघडच आहे. ते का कमी पडले, याचा शोध घ्यायला पाहिजे. भाजपसाठी काम करणारे कार्यकर्ते ‘फुकटखाऊ’ मनोवृत्तीचे नसतात. ते विचाराने प्रेरित होऊन काम करतात. विचार हा वेगवेगळ्या कार्यक्रमांतून आणि पक्षाच्या वेगवेगळ्या कार्यक्रमांतून व्यक्त व्हावा लागतो. विचारांशी बांधील असलेल्या उमेदवाराची निवड करावी लागते. यात काही गफलती झाल्या असतील, तर त्याचा शोध घ्यायला पाहिजे. २० वर्षे दिल्लीत सत्ता नाही, हे शल्य पुढच्या वेळी राहता नये. त्यासाठी आतापासूनच मोर्चेबांधणी करायला पाहिजे.
या निवडणुकीत सर्वाधिक अपयश काँग्रेस पक्षाच्या वाट्याला आलेले आहे. एकही जागा या पक्षाला मिळाली नाही. हा काँग्रेसच्या दृष्टीने गंभीर विषय आहे. दिल्लीचे काँग्रेस पक्षप्रमुख पी. सी. चाको म्हणतात, “२०१३ पासूनच पक्षाला उतरती कळा लागली आहे. त्यानंतर झालेल्या प्रत्येक निवडणुकीत पक्षाला अपयश मिळाले आहे. आम आदमी पक्षाने काँग्रेसची ‘व्होटबँक’ हस्तगत केली आहे.” चिंदबरम यांनी आम आदमी पक्षाचे अभिनंदन केले. त्यावर आक्षेप घेताना काँग्रेसच्याच शर्मिष्ठा मुखर्जी म्हणतात,“भाजपचा पराभव करण्याचे काम काँग्रेस पक्षाने भाड्याने राज्यस्तरीय पक्षांना दिले आहे काय? आणि जर असे असेल तर काँग्रेस पक्षाच्या राज्यशाखेने आपले दुकान बंद केलेले बरे!”
याचबरोबर काँग्रेसच्या राष्ट्रीय स्तरावरच्या काही नेत्यांनी काँग्रेसच्या पराभवानंतर चिंता व्यक्त केली आहे. ज्योतिरादित्य सिंधिया म्हणतात,“काँग्रेस पक्षाने स्वत:ला बदलले पाहिजे. नवीन सिद्धांत, नवीन विचारसरणी आणि नवीन कार्यशैलीचा अवलंब केला पाहिजे. गेल्या ७० वर्षांमध्ये देशात मूलगामी परिणाम झाले आहेत. नवीन पर्वात आम्हाला जनतेकडे नवीन विचार आणि नवीन सिद्धांत घेऊन गेले पाहिजे.” जयराम रमेश म्हणतात,“हा पराभव ‘कोरोना’सारखा आहे. आम्हाला पक्षात नवचैतन्य निर्माण केले पाहिजे. ते केले नाही तर काँग्रेस देशात संदर्भहीन होईल. आमचा उद्दामपणा संपला पाहिजे. सहा वर्षे आम्ही सत्तेत नाही तरी आमच्यापैकी काहीजण आम्ही सत्तेतच आहोत अशा गुर्मीत वागतात.” ते पुढे आणखी असे म्हणाले,“बहुसंख्य समाजाच्या भावनांविषयी उदासिनता घातक आहे. सांप्रदायिकतेविषयी बोलत असताना ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’, ‘जमात-ए-इस्लामी’ यांच्या सांप्रदायिकतेविषयीदेखील बोलले पाहिजे. अल्पसंख्याकांच्या सांप्रदायिकतेविषयी आम्ही मवाळ असतो, अशी आमची प्रतिमा झाली आहे.”
दिल्लीच्या निवडणुकीच्या निकालाचा विषय केवळ ‘यश’ आणि ‘अपयश’ या दोन मुद्द्यांवरच करता नये. निवडणूक म्हटली की यश आणि अपयश आलेच. तो त्या खेळाचा अविभाज्य भाग आहे. काँग्रेसमध्ये जे आत्मचिंतन सुरू झालेले आहे, ते खूप चांगले आहे. त्याचे स्वागत केले पाहिजे. स्वातंत्र्यापूर्वीची काँग्रेस ‘राष्ट्रीय काँग्रेस’ होती. या काँग्रेसमध्ये बहुसंख्य हिंदूच होते. घटना समितीतील सभासद काँग्रेसचे सभासद होते आणि बहुसंख्य हिंदू होते. हिंदूंना काँग्रेस आपला पक्ष वाटत होता. काँग्रेसला हिंदूंपासून तोडण्याचे काम नेहरूंनी सुरू केले आणि सोनिया गांधींनी ते पूर्णत्वाला नेले. काँग्रेसला पुन्हा आपल्या मुळाकडे गेले पाहिजे.
हा देश, राजकीयदृष्ट्या व्यवस्थित चालायचा असेल, तर, काँग्रेस आणि भाजप सहकार्य हवे. हे सहकार्य सत्ता संपादन करण्याच्या कामापुरते असता नये. हे सहकार्य राष्ट्रीय प्रश्नांवर सहमती बनविण्याचे असावे. आम्ही कोण आहोत, आमची संस्कृती कोणती, आमची मूल्ये कोणती, आमचा राष्ट्रीय ध्येयवाद कोणता, आमचे जागतिक लक्ष्य कोणते, तेथे जाण्याचा मार्ग कोणता अशा विषयांसंबंधी भाजप आणि काँग्रेसची सहकार्याची भूमिका हवी. ‘सहमती बनविणे’ हा आपला राष्ट्रीय स्वभाव आहे. टोकाचा विचार करायचा नाही. दुसर्याचेदेखील चांगले बघायचे. दोन चांगल्याचे एकत्रीकरण करायचे आणि पुढे जायचे, असा आपला सनातन मार्ग आहे.
‘आप’विषयी आणि केजरीवाल यांच्याविषयी उलटसुलट भरपूर येत असते. त्याचा मार्ग क्षणिक यशाचा आहे. पण, देशाला खूप अडचणीत आणणारा आहे. या पक्षाचे बळ वाढू देणे देशहिताच्या दृष्टीने अतिशय घातक आहे. ते रोखण्याचे काम देशहिताची चिंता करणार्यांनी करायचे आहे. देशहिताची चिंता करण्याचा मक्ता केवळ आपणच घेतला आहे, अशा भ्रमात राहण्याचे कारण नाही. काँग्रेसचा तो ऐतिहासिक वारसा आहे. तो जागविण्याची गरज आहे.