मुंबई : हिंगणघाट जळीतकांडातील पीडितेचा सोमवारी सकाळी मृत्यू झाल्यानंतर या घटनेच्या निषेधार्थ ‘भारतीय स्त्री शक्ती’ या संस्थेने चर्चगेट स्थानक परिसरात निदर्शने केली. ‘भारतीय स्त्री शक्ती’च्या या मोर्चात यावेळी अनेक महिलांनी आपला सहभाग नोंदवला. या प्रकरणातील नराधमाला तातडीने शिक्षा द्यावी अशी मागणी यावेळी महिला आंदोलकांकडून करण्यात आली.
अशा नराधमांना कायदेशीर पण लवकरात लवकर शिक्षा झाली पाहिजे. तसेच या घटनेला कुठेतरी आपण आणि आपला समाजही जबाबदार आहे. आपणच आपल्या मुलांना जो नकार मिळतो, ती पचवण्याची शक्ती द्यायला हवी. तरच या अशा घटनांना आळा बसेल. घराघरांमध्ये लहानपणापासूनच स्त्री पुरुष समानतेचे धडे मुलामुलींना द्यायला हवेत. तसेच, ही जी दुर्दैवी घटना घडली आहे ही शेवटची ठरो. अशी इच्छा माझ्यासमवेतच भारतीय स्त्री शक्तीची आहे, असे मत संस्थेच्या महाराष्ट्र प्रांत उपाध्यक्ष सीमा देशपांडे यांनी केली.
‘हैदराबादमध्ये जे झाले तसे न होता न्याय व सुव्यवस्थेच्या माध्यमातून, कायद्याच्या कक्षामध्ये या नराधमला फाशी झाली पाहिजे. न्यायालयात जे खटले प्रलंबित राहतात, तसे न होता अशा घटनांमध्ये त्वरित न्याय मिळायला हवा,’ अशी मागणी संस्थेच्या राज्य सचिव रागिणी चंद्रात्रे यांनी केली. इतर उपस्थित महिलांनीदेखील या घटनेचा तीव्र निषेध केला. ’महिलेचा नाही म्हणजे नाहीच असतो, त्याचा आदर पुरुषांनी करायला हवा. ही शिकवण देणे हे समाजातील प्रत्येक घटकाचे काम आहे’, अशा प्रकारची मते महिलांनी व्यक्त केली.