ठिकठिकाणी अनेकानेक अराजकांचे पेटते निखारे घेऊन दिवाळखोरीच्या दिशेने वेगाने धावणारा देश म्हणजे पाकिस्तान. पाकिस्तानात अराजके निर्माण होण्याचे, फोफावण्याचे कारणही इस्लाम आणि इस्लामच. गेल्या दोन-अडीच महिन्यांत त्यापैकी स्वतःला इस्लामचा पालनकर्ता म्हणवून घेणार्या ‘जमियत-ए-उलेमा-ए-इस्लाम’च्या मौलाना फजलुर्रहमान यांनी आपले उपद्रवमूल्य दाखवत इमरान खान यांच्याविरोधात मोर्चा उघडला. आता फजलुर्रहमान यांच्यानंतर आणखी एका मौलानाने इमरान खान यांच्या सरकार, प्रशासकीय अधिकारी आणि पोलिसांच्या नाकी नऊ आणल्याचे दिसते. इमरान खान यांच्या सरकारविरोधातच नव्हे तर पाकिस्तानातील न्यायव्यवस्थेविरोधातही आवाज उठवणार्या या मौलानांचे नाव आहे अब्दुल अजीज. मौलाना अब्दुल अजीज यांनी पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादमधील सरकारी लाल मशिदीवर कब्जा केल्याचे समोर आले. अब्दुल अजीज याच्या दाव्यानुसार तो लाल मशिदीचा मौलवी असून सरकारने मात्र त्याला तिथून हटवण्यासाठी जोरदार प्रयत्न चालवल्याचेही पाहायला मिळाले.
वस्तुतः मौलाना अजीज एकेकाळी लाल मशिदीच्या मौलानापदी होते, परंतु, नंतर त्यांना त्या पदावरून हटविण्यात आले. कारण, मौलाना अब्दुल अजीज यांची दहशतवाद्यांप्रतीची सहानुभूती. पाकिस्तानच्या वजिरीस्तान भागात लष्कराने दहशतवाद्यांविरोधात मोहीम उघडली होती परंतु, अब्दुल अजीज यांनी नेमके लष्कराला चुकीचे ठरवत दहशतवाद्यांची बाजू घेतली आणि फतवा जारी केला. परिणामी, तत्कालीन पाकिस्तानी नेतृत्व नाराज झाले आणि पुढे २००४ साली न्यायालयाने मौलाना अजीज यांना पदावरून हटविण्याचा आदेश जारी केला. दहशतवाद्यांचे समर्थन केल्यावरून त्यांना तुरुंगात टाकले गेले आणि नंतर पाच वर्षांनी म्हणजे २००९ साली त्यांची सुटका झाली. मौलाना अब्दुल अजीज यांचा दहशतवाद्यांना उघडउघड पाठिंबा असून जिहादी कृत्यांचे ते खुलेआम समर्थन करताना दिसतात. २०१४ साली पाकिस्तानच्या पेशावर शहरातील लष्करी शाळेवर दहशतवाद्यांनी भीषण हल्ला केला. अनेक शाळकरी मुले दहशतवाद्यांच्या कट्टरतेला बळी पडले. परंतु, मौलाना अब्दुल अजीज यांनी या हल्ल्यालाही योग्य ठरवले आणि लष्कराने दहशतवाद्यांविरोधात उघडलेल्या मोहिमेवरील ही केवळ एक प्रतिक्रिया असल्याचे म्हटले. सरकारी मशिदीचा मौलाना असलेल्या अब्दुल अजीजने अशाप्रकारचे वक्तव्य केल्याने पाकिस्तानात मोठ्या वादाची स्थिती उत्पन्न झाली.
दरम्यान, आताच्या मशीद बळकावण्याच्या कृत्याबद्दल पाकिस्तानमधील ‘डॉन’ या वृत्तपत्राने म्हटले की, पदावरून हटवल्या गेलेल्या मौलाना अजीज प्राधिकारी आपल्या कामात व्यस्त असल्याचे पाहून त्यांनी काही आठवड्यांआधी मशिदीत प्रवेश केला आणि ते तिथेच ठाण मांडून बसले. मौलानाने मशिदीचा कब्जा केल्याने तिथली परिस्थिती कमालीची बिघडली. इस्लामाबादमधील प्रशासकीय आणि पोलिसी अधिकार्यांनी मशिदीला घेराव घातला आणि मौलानाला मशीद सोडण्यास सांगितले गेले. परंतु, पाकिस्तानातील अशा प्रसंगातील जुन्या घटनांची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून मौलाना अब्दुल अजीज यांनी निराळी खेळी केली. त्याने आपल्या १०० विद्यार्थिनींचा ढालीसारखा वापर केला, जेणेकरून पोलीस आत येऊ नयेत. तथापि, दरम्यानच्या काळात मौलाना अजीज याच्याशी प्रशासकीय व पोलीस अधिकार्यांनी बातचीत केली पण तत्काळ तोडगा निघाला नाही व कोणीही झुकण्यास तयार नसल्याची परिस्थिती तयार झाली. न्यायालयीन निर्णय मी मानत नसल्याचे म्हणत मौलानाने यावेळी उलटा कांगावादेखील केला. “आमची इस्लामवर दृढ निष्ठा आहे. आमचा अन्नपुरवठा बंद केला असला तरी आम्ही मागे हटणार नाही,” असे त्याने म्हटले. ही परिस्थिती साधारणतः आठवडाभर राहिली. नंतर मात्र, मौलाना अब्दुल अजीज याने सरकारशी समझौत्यास तयार असल्याचे सांगत मशीद सोडल्याचे वृत्तही समोर आले. तथापि, पाकिस्तानात अशा घटना नेहमीच्याच झाल्याचे दिसते. कोणीही उठतो आणि प्रशासनाला, पोलिसांना आणि सरकारला, न्यायालयालाही आव्हान देतो. हा त्या देशातील सर्वच व्यवस्था कोलमडून पडल्याचे दाखवणाराच प्रकार म्हटला पाहिजे. आज जरी मौलाना अब्दुल अजीज मागे हटला असला तरी दहशतवाद्यांचे समर्थन करणारा मौलाना पुन्हा कधीही उगवू शकतोच.