‘लॉकडाऊन’च्या काळात गरीब, कामगार व मजूर वर्ग यांच्या मदतीला धावून जात भिवंडी महापालिकेतील भाजपचे विरोधी पक्षनेते नगरसेवक यशवंत टावरे यांनी माणुसकीच्या नात्याने प्रत्येक नागरिकाला अन्नधान्य, जेवण व जीवनावश्यक वस्तूंचे वाटप भिवंडीसह आजूबाजूच्या गावांतदेखील केले. त्याचा अनेक गरजूंनी लाभ घेतला. तेव्हा, अशा या ‘कोविड योद्ध्या’च्या कार्याचा संक्षिप्त आढावा घेणारा हा लेख...
यशवंत जयराम टावरे
राजकीय पक्ष : भाजप
पद : भिवंडी शहर उपाध्यक्ष, भिवंडी शहर भाजप, ठाणे जिल्हा नियोजन समिती सदस्य
लोकप्रतिनिधी पद : भिवंडी महानगरपालिका, विरोधी पक्षनेता
प्रभाग क्र. : २० ड, भिवंडी
संपर्क क्र. : ८००७९५२०२०
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ‘लॉकडाऊन’ जाहीर करण्यात आले. त्यामुळे सर्व उद्योग ठप्प झाले. देशभरात ‘कापड उद्योगाची नगरी’ म्हणून ओळखल्या जाणार्या भिवंडीतील यंत्रमाग उद्योगालाही याची मोठी झळ बसली. व्यवसाय बंद, ठप्प झाल्याने हजारो कामगारांवर बेकारीची वेळ आली. याचा सर्वाधिक फटका बसला तो या व्यवसायावर अवलंबून असणार्या मजूर, कामगारवर्गाला. दरम्यान, या काळात वाहतूकसेवाही ठप्प झाल्याने परराज्यातील नागरिक व मजूर कामगार भिवंडीत अडकून पडले. अशावेळी ना हाताला काम... ना पोटापाण्याची सोय... या कठीण प्रसंगात या गरीब मजूर कामगारांसाठी यशवंत टावरे यांनी मदतीचा हात पुढे केला. खरंतर या काळात खर्या अर्थाने ‘कोविड योद्धा’ बनत कोणीही कामगार, गरीब मजूर आणि त्याचे कुटुंब उपाशी झोपणार नाही, याची सर्वतोपरी जबाबदारी यशवंत टावरे यांनी पार पाडली.
टावरे यांनी कोणत्याही सरकारी मदतीची वाट न पाहता, आपल्या प्रभागात कार्यकर्त्यांच्या माध्यमातून सेवाकार्य सुरू केले. अन्नधान्य, रेशन किट तसेच आरोग्यविषयक मास्क व सॅनिटायझर यांचे वाटप करण्यास सुरुवात केली. सर्व कार्यकर्त्यांनी घरोघरी जाऊन जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले. टावरे यांनी तब्बल दहा टन तांदळाचे वाटप या काळात केले. ‘लॉकडाऊन’ होताच टावरे यांनी तयार अन्नाची पाकिटे वाटण्याची मोहीम हाती घेतली. पहिल्याच दिवशी तब्बल अडीच हजार नागरिकांना या माध्यमातून दोन वेळच्या जेवणाची सोय उपलब्ध झाली. तब्बल ६५ दिवस टावरे यांनी, कुटुंबीय व कार्यकर्त्यांच्या माध्यमातून ही अन्नाची पाकिटे वाटली. त्यानंतर जवळपास ६० दिवसांनी नगरपालिकेने ‘कम्युनिटी किचन’च्या माध्यमातून जेवणाचे वाटप सुरू केले. मात्र, नगरपालिकेच्या माध्यमातून केवळ २०० ते ३०० जणांच्या जेवणाची सोय होते हे पाहून टावरे यांनी पुन्हा आपल्या माध्यमातून जेवणाची व्यवस्था करून दिली. ‘प्रभाग २०’ मधील चारही ‘अ’, ‘ब’, ‘क’, ‘ड’ या वॉर्डांमध्ये यशवंत टावरे यांनी मदत पोहोचविली. जवळपास एका वॉर्डात ३५ ते ४० हजार लोकसंख्या आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघातील सर्व कार्यकर्त्यांचे या काळात उल्लेखनीय सहकार्य लाभले. पक्षातील वरिष्ठांकडून वेळोवेळी काही गरजू व्यक्तींची नावं कळायची, अशावेळी या लोकांपर्यंत वेळेत मदत पोहोचविण्याचं काम रा. स्व. संघातील कार्यकर्त्यांमुळे टावरे यांना शक्य झाले. हितेश मारू, पानाचंद सुनील, हरकू, आरपीएम लॉजिस्टिक यांसह २०० कार्यकर्ते रात्रंदिवस या कार्यात व्यस्त होते. प्रत्येक गरजूपर्यंत मदत पोहोचेल, याची बारकाईने दक्षता यशवंत टावरे आणि सहकार्यांनी घेतली. प्रभागातच नव्हे, तर शेजारील खेड्यापाड्यांत अडकलेल्या नागरिकांपर्यंतही अन्नधान्य पोहोचविण्याचे काम त्यांनी केले.
कोरोनाकाळात यशवंत टावरे यांनी प्रत्येक नागरिकांपर्यंत मदत पोहोचविण्याबरोबरच पहिले आव्हान होते ते कुठेही गर्दी होऊ न देता सुरक्षितरीत्या मदत पोहोचविण्याचे. अशावेळी त्यांना पोलीस बांधवांनी सर्वाधिक सहकार्य केले. एकावेळी सुमारे दोन ते तीन हजार नागरिक रांगेत उभे असत, अशावेळी सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळत सर्वांना सुरक्षित मदत पोहोचविणे पोलिसांमुळे शक्य झाले. कुठेही गर्दी, गोंधळ होऊ न देता, कार्यकर्त्यांना योग्य सूचना देत पोलिसांनी सहकार्य केले. या काळात टावरे यांच्यासमोर दुसरे आव्हान उभे राहिले ते म्हणजे मोठ्या प्रमाणावर परराज्यातील कामगार, मजूरवर्ग आपल्या गावी परत निघायच्या तयारीत होता. वारंवार हा वर्ग गावी परत पोहोचविण्याची मागणी करत होता. या सर्वांना सुरक्षित त्यांच्या गावी पोहोचविण्याची व्यवस्था यशवंत त्यांनी करून दिली. टावरे यांची कोरोनाकाळातील मजुरांसाठीची तळमळ व त्यांचे कार्य पाहता ‘आरपीएम लॉजिस्टिक्स’चे मालक राजेश यादव यांनी स्वखर्चाने चार बसेस उपलब्ध करून दिल्या व या सामाजिक कार्यास हातभार लावला. या माध्यमातून टावरे यांच्या प्रभागातून १० ते १५ हजार परराज्यातील नागरिकांना त्यांच्या गावी पोहोचविण्यात आले. यावेळी टावरे यांनी सरकारी यंत्रणांवरील नाराजीदेखील व्यक्त केली. “आम्ही स्थानिक पातळीवरील नेते/कार्यकर्ते जर बारकाईने विचार करून बसेस उपलब्ध करून देत असू, तर राज्य सरकारकडे अर्थातच मोठी यंत्रणा हाताशी होती. त्यांनी वेळेत याचा विचार करायला हवा होता. मजुरांचे होणारे हाल रोखता आले असते,” असे ते म्हणतात.
माझ्या घरात पूर्वीपासूनच राजकारण आहे. गेली २५ वर्षे कुटुंबाकडे नगरसेवकपद आहे. माझा प्रभाग हा झोपडपट्टीचा आहे. त्यामुळे इथल्या नागरिकांचे अनेक प्रश्न आहेत आणि त्यांना विश्वास आहे की, इथे आपल्या प्रत्येक अडचणीवर उपाय आहे. आपली फसवणूक होणार नाही, त्यामुळे ही लोक निःसंकोचपणे आमच्याकडे त्यांच्या समस्या घेऊन येतात आणि आम्हीही त्या सोडविण्याचा पूर्ण प्रयत्न करतो.
‘कोविड योद्धा’ म्हणून या कार्यात प्रत्यक्ष उतरताना कुटुंबीयांचा पाठिंबाही टावरे यांना लाभला. त्यांचे बंधू, पुतणेदेखील या कार्यात त्यांच्या बरोबरीने उतरले. पक्षपातळीवरदेखील वरिष्ठांकडून सारखी माहिती घेतली जात होती. मार्गदर्शनही मिळत होते. खासदार कपिल पाटील, तसेच आमदार महेश चौघुले हेदेखील टावरे यांच्या संपर्कात होते. भिवंडी भाजप शहराध्यक्ष संतोष शेट्टी यांच्याकडून मदत येत होती. भारतीय जनता पक्षाकडून मोठी मदत यावेळी येत होती, यांचेही वाटप होत होते, याचा मुख्य हेतू केवळ एकही नागरिक या काळात उपाशी राहू नये, त्यांचे हाल होऊ नये असा होता. नागरिकांच्या अनेक कठीण प्रसंगात यशवंत टावरे धावून गेले. त्यांनी प्रभागातील प्रत्येकाची भावना, दुःख व अडचणी समजावून घेऊन त्यावर आपण काय करू शकतो यावर भर दिला. यापैकी एक क्षण टावरे यांचे मन हेलवणारा होता. एक महिला जिच्या घरातील गॅस सिलिंडर संपला होता. पती-पत्नी दोघांच्याही हाताला या काळात काम नव्हते, त्यामुळे घरात पैसेच शिल्लक नव्हते. ती महिला आली आणि रडू लागली. या महिलेचे डोळ्यातील अश्रू आठवून आजही टावरे यांना वाईट वाटते. त्यावेळी टावरे यांनी तत्काळ या महिलेला आर्थिक मदत देऊ केली व घरात धान्य व आवश्यक सामानदेखील पोहोचते केले.
ते म्हणतात, “देशावर असे कोणतेही संकट आले की, शक्य आहे त्यांनी पुढाकार घेत मदत करावी. ‘मी’पणा बाजूला ठेवत समाजासाठी झोकून द्यावे.” यावेळी त्यांनी आपल्या वडिलांनी सांगितलेला एक प्रसंग आवर्जून सांगितला. “तू पूजेला जातो कोणाकडे तर तू देवाकडे काय मागतो?” तेव्हा त्यांनी उत्तर दिले, “मी, माझ्यासाठी काहीतरी मागतो.” त्यावेळी त्यांच्या वडिलांनी दिलेले उत्तर, “अरे, पूजा कोणी घातलीये, तू त्यांच्यासाठी का नाही मागत देवाकडे काही?” याच संस्कारांनुसार आजही यशवंत टावरे मार्गक्रमण करत आहेत. प्रभागातील प्रत्येक वृद्ध नागरिकांची ते आपल्या आईवडिलांप्रमाणे सेवा करत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त आयोजित सेवासप्ताहातही टावरे यांच्यातील माणुसकीचे दर्शन झाले. त्यांनी या काळात आपल्या प्रभागातील वृद्ध, तसेच दिव्यांग नागरिकांसाठी चष्मे वाटप व आधाराची काठी वाटप केले. टावरे यांच्या प्रभागात मोठ्या प्रमाणात कामगार वर्ग येतो, त्यांचे प्रश्न सोडविण्याचे, मालकांपासून होणारी अडवणूक रोखण्याचे सर्वच प्रयत्न ते कायम करत असतात. हे प्रत्येक काम ते वर्षभर करत असतात. त्यामुळे नागरिकांमध्ये यशवंत टावरे यांच्या कामाबद्दल विश्वास आहे. त्यांच्या या कार्याबद्दल आत्मीयतादेखील आहे.