कोरोना व ‘लॉकडाऊन’काळात मोखाडा, विक्रमगड, जव्हार, तलासरीसारख्या वनवासी व दुर्गम, सर्वच सोयी-सुविधांची वानवा असलेल्या भागातील रहिवाशांचे बिकट हाल झाले. मात्र, भाजपचे आदिवासी आघाडी, पालघर जिल्हाध्यक्ष मिलिंद झोले यांनी या संकटाच्या काळात आपल्या समाजबांधवांच्या मदतीला धावून जात त्यांना दिलासा दिला. जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले, तसेच मास्क, सॅनिटायझर व औषधांचेही वितरण केले.
मिलिंद झोले
राजकीय पक्ष : भाजप
पद : आदिवासी आघाडी, पालघर
जिल्हाध्यक्ष संपर्क क्र. : ९७६४४ १९८८८
कोरोनाच्या हल्ल्याने आणि त्यावर उतारा म्हणून केलेल्या ‘लॉकडाऊन’मुळे मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवलीसारख्या शहरी भागातील नागरिकांची बिकट अवस्था झाली. पण, स्वातंत्र्यानंतर कायमच हलाखीच्या परिस्थितीत जगत आलेल्या पालघर जिल्ह्यातील वनवासी बांधवांची परिस्थिती तर सर्वाधिक वाईट झाली. कुपोषणाने ग्रासलेल्या विविध तालुक्यांत सामान्य काळातही दोन वेळच्या जेवणाची भ्रांत असलेले शेकडो लोक आहेत, तिथे कोरोनाने तर त्यांचे जगणेच अशक्य केले. पण, या काळात मिलिंद झोले या त्यांच्यापैकीच एक असलेल्या तरुण तडफदार नेत्याने सहकार्याचा हात पुढे केला. सर्वकाही बंद झालेले असताना मिलिंद झोले यांच्या माध्यमातून १,६०० पेक्षा अधिक गरीब कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंच्या किटचे वाटप करण्यात आले. त्यातील ४०० किट भारतीय जनता पक्षाकडून देण्यात आले, तर ४०० किट आदिवासी बहुविध संस्थेने दिले, अन्य सामाजिक संस्थांनी ३०० किट, तर मिलिंद झोले यांनी वैयक्तिक खर्चातून ५८३ किट दिले. गहू, तांदूळ, पीठ, तेल, मीठ-मसाला आदी वस्तूंच्या किटमुळे अनेक वनवासी बांधवांचे संसार चालले, त्यांच्या दोन वेळच्या जेवणाची सोय झाली.
मिलिंद झोले यांनी खोडाळा या जिल्हा परिषद गटातील प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र वगैरे ठिकाणी कार्यरत वैद्यकीय कर्मचारी, डॉक्टर, परिचारिका या सर्वांना स्वखर्चाने मास्क व सॅनिटायझरचे वाटप केले. तसेच पोलीस कर्मचाऱ्यांनाही मास्क व सॅनिटायझर दिले. इतकेच नव्हे, तर ‘लॉकडाऊन’च्या काळात पोलिसांना नेहमीपेक्षा अधिक काळ काम करावे लागत होते, अशावेळी त्यांच्यासाठी चौकी, शेड, केबिन तयार करून देण्याचे कामही मिलिंद झोले यांनी केले. कोरोना प्रादुर्भावाच्या सुरुवातीच्या काळात आजाराची फारशी कोणाला माहिती नव्हती व बहुतेक लोक घाबरलेले मात्र होते. ते पाहून मिलिंद झोले यांनी गावातील गाडीला भोंगा लावून कोरोनाबाबत जनजागृतीसाठी पुढाकार घेतला. जनतेने घाबरून जाऊ नये, पण आपली काळजी घ्यावी, कोणाला काही त्रास होत असेल तर डॉक्टरांना दाखवावे, असे गावोगाव फिरून आवाहन केले.
"१९९६ साली पहिलीत असताना वडील आजारी पडले, ते चार वर्षांनीच बरे झाले. पण, या काळात आश्रमशाळेत छिद्रे पडलेल्या पॅण्टीवर दिवस काढले. त्याच काळात गरिबीची जाणीव झाली आणि इतरांसाठी काहीतरी करण्याची प्रेरणा मनात निर्माण झाली. आज कोरोनाकाळात मदत करताना फक्त मला माझे ते दिवस आठवले आणि मी आपल्याच बांधवांच्या सेवेसाठी कामाला लागलो."
दरम्यान, आधीच वनवासी भाग असलेल्या व आरोग्यविषयक सोयी-सुविधांचा पुरेसा प्रसार न झालेल्या पालघरमध्ये कोरोनाविरोधात लोकांची रोगप्रतिकारक शक्ती वाढविणे गरजेचे होते. त्यासाठीही मिलिंद झोले यांनी महत्त्वाचे काम केले. अॅण्टिबायोटिक्स, सर्दी, तापाच्या गोळ्या, ‘आर्सेनिक अल्बम-३०’ या होमियोपॅथिक गोळ्यांचे वाटप त्यांनी केले. कुपोषित बालके, तरुण, महिला, वयोवृद्ध अशा सर्वांनाच कोरोनाचा प्रतिकार करता यावा, हा त्यांचा यामागे उद्देश होता. मिलिंद झोले यांनी आपल्या परिसरातील आरोग्य केंद्रात, रुग्णालयात, दवाखान्यांत दर १५ दिवसांनी एकदा भेट देण्याचेही नियोजन केले होते. जेणेकरून परिसरातील किती लोकांची आरोग्य तपासणी झाली, कोणी तपासणीसाठी आले नसेल तर त्याची माहिती व्हावी व कोणीही तपासणीपासून वंचित राहू नये, यासाठी ते ही माहिती घेत होते. तसेच याबाबत लोकांनाही दवाखान्यात जाऊन तपासणी करून येण्याचे आवाहन करत होते. “कोणीही काही त्रास होत असेल तर सांगा, अंगावर दुखणे काढू नका,” असे ते सातत्याने सांगत होते.
दरम्यान, कोरोनाचे विघ्न उभे ठाकलेले असतानाच ‘निसर्ग’ चक्रीवादळानेही पालघरला तडाखा दिला. वादळाने होते नव्हते, सारे संपले. परिस्थिती अधिकच बिकट झाली. अशा परिस्थितीत मिलिंद झोले यांनी तहसीलदारांना सांगून तत्काळ झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याची विनंती केली. जेणेकरून सर्वच नुकसानग्रस्त जनतेला मदत मिळावी, आधार मिळावा.मिलिंद झोले यांना आपल्या या मदतकार्यात त्यांच्या सहकाऱ्यांचीही चांगली मदत झाली. जसे की सरपंच देवराम कडू, हनुमंत पादीर, एकनाथ झुगरे, दिलीप झुगरे, अनिल येलमामे, आनंद शिंदे, विलास पाटील, शिवराम हमरे, उमेश येलमामे, बाळासाहेब मुळे, विठ्ठल वाघमारे, गणपत बोटे सर्व तालुका पदाधिकारी-कार्यकर्ते आदींनी त्यांना चांगले सहकार्य केले. सोबतच भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठ पातळीवरूनही त्यांना मार्गदर्शन लाभले, अनेकांनी त्यांचे कौतुक केले व सुरुवातीला प्रत्यक्ष हजर राहून आधारही दिला. भाजप पालघर जिल्हाध्यक्ष नंदकुमार पाटील, ज्येष्ठ नेते बाबाजी काठोळे यांनी त्यांचे कौतुक केले, तर डॉ. हेमंत सवरा यांनी मिलिंद झोले यांना औषधे, गोळ्या, आरोग्यविषयक मदतीबरोबरच अन्य कामातही सहकार्य केले. जनजागृतीच्या कामातही डॉ. हेमंत सवरा हे मिलिंद झोले यांच्या पाठीशी होते. समाजकार्य, सेवाकार्य करायचे म्हटले की, घरातील व्यक्तींचे सहकार्य, पाठिंबा महत्त्वाचा ठरतो. आताचे संकट तर थेट आरोग्याशी निगडित होते. तरीही मिलिंद झोले यांच्या कुटुंबीयांनी आईवडील, धाकटे बंधू नरेश, पत्नीने त्यांना मदत केली. त्यांच्या तीन वर्षांच्या मुलीने तर मिलिंद झोले यांना जीवनावश्यक वस्तूंच्या किट तयार करतानाही मदत केली.
मिलिंद झोले कोरोनाकाळात मदत करताना एक ऊर गहिवरून येणारा व आठवणीत राहणारा प्रसंगही घडला. रेशनवाटप करत असताना एका वयोवृद्ध महिलेकडे कोणत्याही प्रकारचे रेशन कार्ड नव्हते. त्या महिलेने शासनाकडे रेशन कार्डच नव्हे, तर श्रावणबाळ योजना, घरकूल योजना वगैरेतही अर्ज केला होता. पण, आतापर्यंत त्या महिलेला कसलीही मदत मिळालेली नव्हती. मात्र, मिलिंद झोले यांच्या माध्यमातून तत्काळ मदत मिळाल्याचे पाहून त्या महिलेच्या डोळ्यातून आनंदाश्रू ओघळले आणि ते पाहून मिलिंद झोले यांनाही आपण करत असलेल्या कामाचे सार्थक झाल्यासारखे वाटले. दरम्यान, आपण ज्या परिसरातून जीवन घडवले, पैसे कमावले, त्या परिसरातील बांधव संकटात असतील तर पक्षभेद विसरून सर्वांनी पुढे आले पाहिजे, असे त्यांचे म्हणणे आहे. तसेच भविष्यात परिसरातील लोकांना इथल्या इथेच रोजगार मिळावा म्हणून प्रयत्न करणार असल्याचेही मिलिंद झोले यांनी सांगितले. प्रामुख्याने पालघरमधील पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्नरत राहणार असल्याचे ते म्हणाले.