दिघ्याचे दादा...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    08-Dec-2020   
Total Views |

Navin Gavte_1  
 
 
 
कोरोनाच्या संकटात जात-पात, पक्ष, समाज, स्त्री-पुरुष, असा कुठलाही भेदाभेद न ठेवता, आपली माणसं म्हणून त्यांच्यासाठी धावून येणारा दादा माणूस, अशी ओळख नवीन गवते यांनी निर्माण केली. नवी मुंबईतील दिघा भागात लोकांना लागणारी हवी ती मदत त्यांनी पोहोचविली. त्यामुळे गरीब-गरजूंना त्यांच्या या मदतीचा मोठा आधार मिळाला. तेव्हा, नवीन गवते यांच्या मदतकार्यातील काही निवडक आणि प्रेरणादायी क्षण...

नवीन मोरेश्वर गवते
राजकीय पक्ष : भाजप
पद : माजी स्थायी समिती सभापती, नवी मुंबई
प्रभाग क्र. : ४, दिघा
संपर्क क्र. : ८०९७६ ३१४१३

कोरोनामुळे देशात इतक्या मोठ्या कालावधीचा ‘लॉकडाऊन’ लागेल, अशी कल्पना कुणालाही नव्हती. नागरिकही संभ्रमात होते. त्यामुळे सरकारने घालून दिलेल्या नियमानुसार दुकाने बंद होती, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था ठप्प होती. व्यवहारही बंद पडले होते. दिघा विभागालाही कोरोनाचा फटका बसू लागला होता. नवीन गवते यांनी कुठलाही भेदाभेद न ठेवता, तब्बल १९ हजार कुटुंबीयांना अन्नधान्याचे किट्स पोहोचविले होते. तांदूळ, डाळी आणि अन्य सामग्रीचे एकूण १२ ट्रक विभागात पाठवण्यात आले. प्रत्येक गरजवंतापर्यंत मदत पोहोचू लागली होती. वेळीच मिळालेल्या मदतीमुळे विभागातील नागरिकांची गैरसोय टळली आणि लोकांनी दादांचे आभार मानले होते. रेशनिंगद्वारे अन्नधान्य पुरवठा सुरळीत सुरू आहे की नाही, याबद्दलही त्यांनी दक्षता घेतली होती. दिघ्यातील प्रभाग क्रमांक २, ३, ४, ५ आणि ९ या विभागांतील प्रत्येक कुटुंबांपर्यंत गवते यांनी आपल्या कार्यकर्त्यांद्वारे मदत पोहोचविली. एकीकडे ‘लॉकडाऊन’ वाढत होता, तर दुसरीकडे कोरोना रुग्ण आढळण्याचे प्रमाणही वाढत चालले होते. त्यामुळे संभ्रमाची स्थितीही कायम होती. अनेकांना कोरोनाबद्दल समज-गैरसमज होते. त्यासाठी नागरिकांमध्ये जनजागृती मोहीम राबविणे गरजेचे होते. कार्यकर्त्यांच्या माध्यमातून, तसेच डिजिटल संवाद साधून गवते यांनी स्थानिक पातळीवर कोरोनाशी लढा उभारण्याची मोहीम आखली होती. याच वेळी मास्कचा तुटवडा बाजारात जाणवू लागला होता. कोरोनाशी लढत असताना रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्याची गरज होती.
 
 
 
गवते यांच्या माध्यमातून तब्बल २० हजार ‘आर्सेनिक अल्बम- ३०’ गोळ्यांचे वाटप करण्यात आले. तब्बल तीन ते चार हजार मास्कचेही वाटप करण्यात आले. रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी काय काय करण्याची आवश्यकता आहे, याची माहितीही लोकांना देण्यात आली. स्थानिकांचा प्रश्न तर काहीसा सुटला होता. मात्र, परराज्यांतून आलेले मजूर, हातावर पोट असणारी स्थानिक रहिवासी मंडळी यांचे रोजगार बंद पडल्याने रोजच्या जेवणाचा प्रश्न निर्माण झाला होता. त्यांनाही हातभार लावण्याचा निर्धार गवते यांनी केला. मजूर आपल्या राज्यांमध्ये परत जाईपर्यंत आणि स्थानिकांच्या रोजच्या जेवणाचा प्रश्न सुटेपर्यंत नवी मुंबई महापालिकेच्या सहकार्याने ‘कम्युनिटी किचन’ सुरू ठेवण्यात आले होते. प्रतिदिन पाच हजार जेवणाचे डबे महिनाभर या किचनमधून त्या मजुरांसाठी पाठवण्यात आले होते. या सर्व मदतकार्यात ‘सोशल डिस्टन्सिंग’चे भान राखले जाईल, ‘कम्युनिटी किचन’मध्ये स्वच्छता ठेवूनच काम पाहिले जाईल, याची काळजीही गवते यांनी आपल्या कार्यकर्त्यांना घेण्यास सांगितली होती. मजुरांना आपल्या राज्यांमध्ये पाठविण्यासाठी सरकारी यंत्रणांकडे नोंदणी करून देणे, पोलिसांमार्फत मजुरांना श्रमिक रेल्वेसाठी फॉर्म भरून देणे, या गोष्टींची पूर्तता करण्यासाठी आपल्याकडील कार्यकर्त्यांची टिम उभी केली. या भागातील सुमारे सात हजार मजुरांना परत पाठविण्याचे काम त्यांच्यामार्फत करण्यात आले होते. शिवाय, इतर ठिकाणांहून पायी जाणाऱ्या मजुरांना जेवण आणि पाण्याच्या बाटल्यांचेही वाटप करण्यात आले. ‘सूरज सोल्जर पंप’ या कंपनीच्या सहकार्यानेही अन्नधान्य वाटप मोहीम राबविण्यात आली होती.
 
 

Navin Gavte_1   
 
 

"कोरोना ही महामारी जगावर ओढावलेलं एक भीषण संकट आहे. अशा परिस्थितीत आपला कोण, परका कोण, ही भावना न ठेवता, जो गरजवंत असेल त्याची समस्या लोकप्रतिनिधी म्हणून सोडविण्याची जबाबदारी मी पूर्ण करण्याचा प्रयत्न केला. या सर्व कार्यात माझे वरिष्ठ आणि घरच्यांचे मला पाठबळ मिळाले, मी त्या सर्वांचे आभार मानतो आणि माझ्याकडून पुढेही असेच काम होत राहो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना..."

  
 
 
कोरोना रुग्णांची संख्या हळूहळू वाढतच होती. कुणाच्या घरी कोरोना रुग्ण आढळला की, आता पुढे काय करायचे, असे प्रश्न नागरिकांसमोर उपस्थित होत होते. रोजच्या वाढत्या आकडेवारीच्या बातम्या आणि अनेकांच्या निधनाचे धक्के यामुळे एकूणच वातावरण चिंतेचे बनत होते. गवते यांनी ही परिस्थिती पाहून आपल्या मतदारांच्या पाठीशी उभे राहण्याचा निर्धार केला होता. त्यांनी कार्यकर्त्यांच्या माध्यमातून कोरोना रुग्णांना वेळेत बेड उपलब्ध होतो की नाही, याची दक्षता घेण्यास सांगितली. त्यानंतर रुग्णांच्या वाढत्या बिलांचा प्रश्न मार्गी लावत, महात्मा फुले जनआरोग्य योजनेतून उपचार कसे होतील, यावर भर दिला होता. तसेच कोरोना रुग्णाच्या ‘क्वारंटाईन’ झालेल्या कुटुंबीयांनाही आवश्यक मदत पोहोचविण्याची जबाबदारी उचलली होती. आपल्या प्रभागात पालिकेतर्फे कोरोनाच्या संदर्भात दिल्या जाणाऱ्या सोयी-सुविधा उपाययोजना पोहोचविण्याची जबाबदारीही त्यांनी पार पाडली. क्वारंटाईन सेंटर सुरू करणे, कोरोना चाचणी केंद्राची मागणी करणे, तसेच घरोघरी जाऊन थर्मल स्क्रीनिंग करण्यावरही त्यांनी भर दिला. धूरफवारणी केली. खासगी रुग्णालयातील रुग्णांनी मदतीची मागणी केल्यानंतर त्यांची बिले माफ करून दिली. तसेच रुग्णांना बेड मिळवून देण्यासाठी प्रयत्नही केले. रुग्ण आढळल्यानंतर सोसायटीमध्ये सॅनिटायझेशन करणे, तसेच अन्य प्रभागांमध्ये सॅनिटायझेशन करण्याची मोहीमही गवते यांच्या माध्यमातून सुरू करण्यात आली. ‘लॉकडाऊन’च्या काळात पोलीस यंत्रणेवर येणारा ताण गवते यांनी पाहिला होता. झोपडपट्टीतील भागात कंटेनमेंट झोनमध्ये व्यवस्था पाहण्यासाठी पोलिसांचा कस लागत होता. गवते यांनी कार्यकर्त्यांच्या माध्यमातून या भागात जनजागृती करण्याचा प्रयत्न केला.
 
 
 
मजबूत कार्यकर्त्यांच्या फळीशिवाय हे मदतकार्य शक्य नव्हते. गवते यांच्यासोबत कोरोनाशी दोन हात करण्यासाठी विरेश सिंह, अमोल यादव, हरिओम डडवाल, अनिल गवते, दामोदर कोटीयन, चंद्राम सोनकांबळे, संतोष मुळये, अजित ठोंबे, अंकुश झोरे, राजेश गवते या सहकाऱ्यांची मदत लाभली. या एकूण मदतकार्यात ७० ते ८० लाखांचा निधी खर्च झाला. या सोबतच मदतीसाठी कुटुंबाचेही पाठबळ महत्त्वाचे ठरले. बाहेर कोरोनाचे संकट असताना मदतकार्यासाठी उतरणे, त्यासाठी कुटुंबाला तयार करणे हे प्रत्येकाला आव्हान असते. मात्र, गवते यांना कुटुंबातूनच समाजसेवेचा वारसा लाभला असल्याने सर्व जण तन, मन, धन अर्पून या सेवाकार्यात उतरले होते. त्यांच्या पत्नी माजी नगरसेविका अपर्णा गवते, माजी नगरसेविका दीपा गवते यांच्यासह अन्य मंडळींचाही सक्रिय सहभाग होता. जोपर्यंत कोरोनाची परिस्थिती निवळत नाही आणि भविष्यातही अशाप्रकारची परिस्थिती कुणावर आली, तरीही लोकांच्या पाठीशी कायम उभे राहण्याचा संकल्प गवते यांनी सोडला आहे. या परिस्थितीत डगमगून न जाता त्याला धीराने सामोरे जायला हवे. समाजातील इतर घटकांनीही नव्या दमाच्या तरुणांनी या सेवाकार्यात सहभागी व्हायला हवे, असे आवाहनही त्यांनी केले आहे.
 
@@AUTHORINFO_V1@@