ठाणे : गडचिंचले साधू हत्या प्रकरणात तब्बल २०१ आरोपीना पोलिसांनी बेड्या ठोकल्यानंतर सोमवारी ठाणे जिल्हा विशेष मॉब लिचिंग न्यायालयाने आणखीन ४७ आरोपीना जामीन मंजूर केला आहे.यापूर्वी याच न्यायालयाने तब्बल ५८ जणांची जामिनावर मुक्तता केलेली आहे.त्यामुळे पालघर गडचिंचले प्रकरणात आतापर्यंत जामिनावर सुटका झालेल्यांची संख्या १०५ वर पोहचली आहे.पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींमध्ये १२ आरोपी हे अल्पवयीन होते. तर न्यायालयाने ३६ आरोपींचा जामीन अर्ज फेटाळला आहे.या प्रकरणाची पुढील सुनावणी १८ डिसेंबर रोजी होणार आहे. दरम्यान, तब्बल १०५ जणांची मुक्तता झाल्याने झुंडबळी घेणाऱ्यांना अभय तर, मिळत नाही ना? असा सवाल केला जात आहे.
१६ एप्रिल २०२० रोजी जुना आखाड्याचे दोन साधू वाहन चालकासह महंत रामगिरी महाराज यांच्या अंत्यसंस्कार विधीसाठी चारचाकी गाडीने सुरतला जात होते.लॉकडाऊन काळात जिल्ह्यांच्या सीमा बंद असल्याने गडचिंचले या खुष्कीच्या मार्गाने ही मंडळी निघाली होती.तेव्हा,जमावाने लाठ्याकाठ्या दगडांसह केलेल्या हल्ल्यात या तिघांचा जागीच मृत्यू झाला होता.याप्रकरणी,ठाणे जिल्हा मॉब लिचिंग विशेष न्यायालयाचे न्यायमूर्ती पी.पी. जाधव यांनी ४७ आरोपीना १५ हजाराच्या जातमुचलक्यावर जामिन मंजूर केला. सोमवारी न्यायालयात आरोपींच्यावतीने अॅड.अमृत अधिकारी आणि अतुल पाटील यांनी न्यायालयात युक्तीवाद केला.पोलिसांनी निरपराध लोकांना अटक केली. त्यांना संशयित म्हणून ताब्यात घेण्यात आलेले होते तेव्हा त्यांची जामिनावर सुटका करावी. असा युक्तीवाद करण्यात आला. तर विशेष न्यायालयाने यापूर्वीच याच प्रकरणातील तब्बल ३६ आरोपीना जामीन नाकारला.कारण सदर ३६ आरोपींचा गुन्ह्यात थेट सहभाग असल्याचे तपासात आढळल्याने न्यायालयाने त्यांचा जामीन नाकारला.या प्रकरणात तीन स्वतंत्र गुन्हे १६ एप्रिल, २०२० रोजी दाखल केले.
या प्रकरणात दोन जुना आखाडा साधू चिकणे महाराज कल्पवृक्षागिरी (७०), सुशीलगिरी महाराज (३५) आणि त्यांच्यासोबत असलेला चालक निलेश तेलंगडे हे गावातून आपल्या गुरु असलेल्या महंत रामगिरी यांच्या अंत्ययात्रेत सामील होण्यासाठी सुरतकडे निघाले होते.त्यावेळी त्यांची गाडी वनविभागाच्या तपासणी नाक्यावर अडविण्यात आलेली होती.त्याचवेळी त्यांच्यावर लाठ्या-काठ्यांनी हल्ला करण्यात आला.लहान मुले पळविणारे असल्याच्या संशयातून हा हल्ला झाला होता.या प्रकरणी कासा पोलीस ठाण्यातील आनंदराव काळे याना सेवेतून निलंबित करण्यात आले.त्यांच्यासोबत अन्य दोन पोलीस कर्मचारीही निलंबित झाले होते.त्यातील एक सब इन्स्पेक्टर हा सेवानिवृत्त झाला.याच प्रकरणात अनेक पोलीस कर्मचारी यांचे इन्क्रिमेंटही गोठवलेले आहेत. तर,पोलिस अधिक्षक गौरव सिंह यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले होते.
साधू हत्या प्रकरणाचा तपास करणाऱ्या महाराष्ट्र सीआयडीने डहाणू न्यायालयात तब्बल ११ हजार पानाचे दोन स्वतंत्र आरोपपत्र दाखल केले होते.सीआयडीच्या तपासात या हत्या प्रकरणात कुठलाही जातीय कारण नसून केवळ अफवा असल्याचे स्पष्ट मत तपास अहवालात मांडले.या प्रकरणात आतापर्यंत २२८ जणांना अटक करण्यात आलेली आहे.तर पोलिसांनी जवळपास ८०८ जणांची संशयित म्हणून चौकशी केलेली आहे.