काही आठवड्यांपूर्वी या स्तंभात आपण ‘पिटबुल’ या सैतानी कुत्र्याबद्दल वाचलं होतं. आता वाचा सैतानांचा मागोवा घेणार्या आणि त्यांना खतम करणार्या लष्करी प्रशिक्षित कुत्र्यांबद्दल. असे १७ नवे कुत्रे भारतात जन्माला आले आहेत.
’इंडो-तिबेटन बॉर्डर फोर्स’ किंवा ‘आयटीबीएफ’ हे भारताच्या सात केंद्रीय सशस्त्र सुरक्षादलांपैकी एक आहे. भारताची चीनला लागून असणारी सरहद्द ही तब्बल तीन हजार ४८८ किमी इतकी लांबलचक आहे. पश्चिमेला लडाखमधील काराकोरम खिंड ते पूर्वेला अरुणाचल प्रदेशातील दीपू-लापर्यंत पसरलेल्या या सरहद्दीवरची अनेक ठाणी २१ हजार फूट उंचीवर आहेत आणि ही सरहद्द ‘आयटीबीएफ’चे बहादूर जवान सांभाळत असतात.
‘आयटीबीएफ’ गृहमंत्रालयाच्या अखत्यारीत येतं. त्यांचं प्रशिक्षण केंद्र पंचकुला या चंदिगढला लागूनच असलेल्या शहरात आहे. या पंचकुला केंद्रात गेल्या महिन्यात एक मोठाच सोहळा साजरा झाला. ‘आयटीबीएफ’च्या ओल्गा आणि ओलेशा या दोन महिला सैनिक बाळंत झाल्या आणि त्यांनी १७ बाळांना जन्म दिला. म्हणजे काय? म्हणजे असं की, संरक्षण दलांमध्ये कुत्रा आणि कुत्री यांना ‘जनावर’ म्हणून न वागवता ‘सैनिक’ म्हणून वागवलं जातं.
ओल्गा आणि ओलेशा या ‘बेल्जियन मेलिनॉईस’ (या फ्रेंच शब्दाचा योग्य उच्चार ‘मालिनवाह’ असा आहे.) जातीच्या दोन कुत्र्या आहेत. त्यांनी आणि इतरही प्रशिक्षित तरबेज कुत्र्यांनी आतापर्यंत असंख्य शस्त्रास्त्रे, पारंपरिक स्फोटक पदार्थ, अत्याधुनिक प्लास्टिक स्फोटक पदार्थ, भूसुरुंग इत्यादी शोधून अनेक प्राण वाचविले आहेत. ‘बेल्जियन मेलिनॉईस’ या जातीच्या सर्वसाधारण कुत्र्याची भारतातली किंमत साधारण २५ हजार रुपयांपासून सुरू होते. मग त्या पिल्लाचं कूळ, खानदान, लक्षणं इत्यादींनुसार ती एक लाख रुपयांपर्यंत जाऊ शकते.
अशा स्थितीत, दोन प्रशिक्षित कुत्र्यांनी एकदम १७ पिल्लांना जन्म देणं म्हणजे लॉटरी लागल्यासारखंच आहे. दिनांक १ मे, २०११ च्या मध्यरात्रीनंतर अमेरिकेच्या ‘सील-६’ या कमांडो गटाने पाकिस्तानातल्या अबोटाबाद शहरातल्या एका घरावर आकस्मिक छापा घातला. या घरात ‘अल् कायदा’चा म्होरक्या ओसामा बिन लादेन लपलेला होता. दोन ‘ब्लॅक हॉक’ जातीच्या हॅलिकॉप्टर्समधून ‘सील-६’चे कमांडो जवान ओसामाच्या घराच्या आवारात उतरले.
आवारात किंवा घराच्या म्हणजे एका तीन मजली इमारतीच्या दारांमध्ये कुठेही भूसुरुंग, फसवे सापळे, आतल्या लोकांना सावध करणारी इलेक्ट्रॉनिक यंत्रणा यापैकी काहीही असण्याची शक्यता होती. म्हणून सगळ्यात पुढे होता ‘कैरो’ नावाचा अत्यंत तरबेज, प्रशिक्षित कुत्रा आणि त्याला हाताळणारा सैनिक विली चेज्नी. ‘कैरो’ने ‘ओके’ दिल्यावर उरलेले कमांडो धडाधड आत घुसले. चकमकी सुरू झाल्या. ठार झालेल्या ओसामा आणि इतरांचे मुडदे घरातून आवारात आणण्यात आले. हे करताना एक भानगड झालीच. एक ‘ब्लॅक हॉक’ हॅलिकॉप्टर धडपडलं.
वैमानिकाने क्रॅश लँडिंग केलं. त्याचा आवाज झाला, त्यामुळे परिसरातली इतर घरं जागी झाली. अनेक लोक प्रथम हॅलिकॉप्टरचा आवाज, मग गोळ्यांचे आवाज आणि आरोळ्या, किंकाळ्या ऐकून आपापल्या घरांतून बाहेर पडून या घराकडे येऊ लागले. त्यावेळी विली चेज्नीने कैरोला पूर्ण मोकळं सोडलं. कैरो एखाद्या कर्दनकाळासारखा भुंकत घराच्या मुख्य दारावर उभा ठाकला.
बघे लोक मागे हटले. तेवढ्या अवधीत सील कमांडोंनी ओसामाचा मुडदा, घरातले कागदपत्र, चित्रं, कॉम्प्युटर्स, व्हिडिओ टेप्स, जे जे काही महत्त्वाचं वाटलं, ते सगळं धडक्या हॅलिकॉप्टरमध्ये भरलं आणि मोडकं हॅलिकॉप्टर पेटवून दिलं. मग कैरोला इशारा मिळाला. दोनच उड्यांमध्ये तो हॅलिकॉप्टरमध्ये शिरला आणि ‘सील-६’चे सर्वच्या सर्व म्हणजे, २४ मानवी कमांडो आणि २५वा कुत्रा कमांडो अफगाणिस्तानाच्या जलालाबादकडे पसार झाले.
‘ऑपरेशन नेपच्यून स्पीअर’ या नावाने जगभर गाजलेली ही छापामार कमांडो कारवाई अवघ्या ३८ मिनिटांत आटपली. ११ सप्टेंबर, २००१ ते १ मे, २०११. दहा वर्षे ज्या ओसामाला जीवंत अथवा मृत पकडण्यासाठी अमेरिकेची सर्वशक्तिमान गुप्तचर यंत्रणा जंगजंग पछाडत होती, तो ओसामा अखेर ठार झाला आणि त्या कारवाईत माणसांप्रमाणेच एका ‘बेल्जियम मेलिनॉईस’ कुत्र्याचा महत्त्वाचा सहभाग होता. त्यामुळे तेव्हापासून कुत्र्याच्या या विशिष्ट जातीला ‘ओसामा हंटर’ हेच नाव पडले आहे. राष्ट्राध्यक्ष बराक ओबामांनंतर जेव्हा ‘ऑपरेशन नेपच्यून स्पीअर’चे प्रमुख अॅडमिरल विल्यम मॅकरेवन आणि त्यांच्या एकंदर ७९ माणसांच्या चमूला भेटले, तेव्हा ते ‘कमांडो कैरो’ यालाही आवर्जून भेटले.
खरंतर कैरो या कारवाईच्या वेळी निवृत्तीच्या उंबरठ्यावर होता. या जातीच्या कुत्र्यांचं सरासरी आयुर्मान १२ ते १४ वर्षे असतं. कैरो तेव्हा ११ वर्षांचा होता. यापूर्वीही कैरोने अफगाणिस्तान आणि इराकमध्ये अनेक महत्त्वपूर्ण कामगिर्या पार पाडल्या होत्या. त्याच्या हुशारीबद्दल एक विलक्षण किस्सा विल चेज्नी सांगतो. “आम्ही अफगाणिस्तानच्या एका खेड्यातल्या एका विशिष्ट घराला वेढा घातला. आमच्या दरडावणीसरशी घरातून सात-आठ मुलं, एक बाई आणि एक बाप्या, असे बाहेर पडले.
आम्हाला पक्की खबर होती की, या घरात बरेच अतिरेकी तालिबानी लपलेत. तो बाप्या नक्कीच अतिरेकी नव्हता. कैरो आणि मी, घरात शिरलो. अनेक सटरफटर वस्तू आणि कापडाचं बोचकं समोर पडलं होतं. कैरोने त्या बोचक्यावर झडप घातली आणि क्षणभर मी हादरलो. ते बोचकं म्हणजे, खूपशा जाडजाड कपड्यात लपेटलेलं एक तान्हं मूल होतं. मला आश्चर्यही वाटलं आणि आनंदही वाटला. कैरोने त्या मुलाला काहीही इजा न करता सोडून दिलं. पुढच्याच क्षणी त्याने बाजूच्या एका कोपर्यावर झडप घातली आणि तिथे लपलेला एक अतिरेकी खेचून बाहेर काढला. कैरोने त्याच्या दंडावर घेतलेली दातांची पकड अशी जबरदस्त होती की, त्याचा हात जवळजवळ तुटलाच. लहान मूल आणि मोठा माणूस यात त्याने फरक कसा केला, हे मला कळत नाही. कारण, त्याच्या प्रशिक्षणात असं काही नव्हतं. म्हणजे हे त्याने अंतःप्रेरणेने केलं असावं.”
कुत्रा हा माणसाचा सगळ्यात इमानी असा सोबती, मित्र आहे. ‘पुरापाषाणयुग’ या नावाने इतिहासाचा जो कालखंड मानला जातो, त्या काळातली काही गुंफाचित्रं मिळाली आहेत. त्यात माणसांबरोबर कुत्र्यांच्याही प्रतिमा आहेत. ही गुंफाचित्रं किमान ५० हजार वर्षांपूर्वीची असावीत, असा अंदाज आहे. घराची राखण, शेताची राखण, शेळ्यामेंढ्यांच्या किंवा गुरांच्या कळपाची राखण, अशा कामांमध्ये कुत्रा गेली कित्येक शतकं माणसाला उपयोगी पडत आला आहे.
युद्धासाठी माणसाने कुत्र्याचा उपयोग केल्याचा पहिला पक्का पुरावा मिळतो, तो इसवी सन पूर्व सातव्या शतकातला. म्हणजे आजपासून सुमारे २७०० वर्षांपूर्वीच्या ग्रीकांच्या एका राज्याने ग्रीकांच्याच दुसर्या राज्याविरुद्ध लढताना कुत्रे वापरले. एफेशियन ग्रीक सैन्याच्या प्रत्येक भालाईत घोडेस्वाराजवळ एकेक कुत्रा होता. त्यांनी मॅग्नेशियन ग्रीक सैन्यावर प्रथम हे कुत्रे सोडले. त्यांनी मॅग्नेशियन ग्रीक सैन्याची आघाडीची फळी फोडली. मग एफेशियन भालाईत त्या भगदाडातून आत घुसले आणि त्यांनी मॅग्नेशियन ग्रीकांची कत्तल उडविली.
पाश्चिमात्य इतिहासकार प्राचीन इतिहासाबद्दल बोलताना भारताला मोजतच नाहीत. पण, काही माहितीचे कण आपल्याला सापडतात. इसवी सनापूर्वी ४८० या वर्षी पर्शियाचा म्हणजे, इराणचा सम्राट झर्झेस पहिला याने ग्रीसवर स्वारी केली. त्याच्या सैन्यात भारतीय शिकारी कुत्र्यांचे अनेक कळप होते, असा पक्का पुरावा आहे. या कुत्र्यांचा उपयोग त्याने नेमका कशासाठी केला, ते मात्र नमूद केलेलं नाही. पण, म्हणजे सन पूर्व चौथ्या-पाचव्या शतकात भारतात प्रशिक्षित शिकारी कुत्रे होते नि त्यांचे कळप परकीय राजेदेखील आपल्या दिमतीला ठेवत होते.
आज आधुनिक जगात कुत्र्यांचे युद्धासह विविध उपयोग आहेत. त्यासाठी कुत्र्यांना प्रशिक्षण देणार्या शाळा आहेत. कुत्र्यांना शिकवून कसं तयार करावं, याचं प्रशिक्षण देणार्या नामवंत संस्था आहेत. पण, हे सगळं पाश्चिमात्य देशांत आहे. ‘दि केनल क्लब’ ही कुत्र्यांबद्दल सर्वकाही शिकविणारी जगातली पहिली संस्था सन १८७३ साली म्हणजे १४७ वर्षांपूर्वी लंडनमध्ये स्थापन झाली. आता जगभरच्या प्रत्येक देशात ‘केनल क्लब’ आहेत. भारतातही आहेत. पण, इतर सर्व आधुनिक क्षेत्रांप्रमाणेच याही क्षेत्रावर छाप आहे ती युरोप आणि अमेरिकेचीच.
१९१४ ते १९१८च्या पहिल्या महायुद्धात ब्रिटन-फ्रान्स-रशिया-अमेरिका विरुद्ध जर्मनी-ऑस्ट्रिया-तुर्कस्तान या उभयपक्षांनी प्रत्यक्ष रणांगणावर कुत्र्यांचा भरपूर वापर केला. हा उपयोग मुख्यतः संदेशांच्या देवाणघेवाणीसाठी झाला. या महायुद्धात उभयपक्षांची काही कोटी माणसं ठार झाली. तसेच किमान दहा लाख कुत्रेही ठार झाले. या सगळ्या कुत्र्यांमध्ये खूप प्रसिद्धी मिळाली ती ‘स्टबी’ नावाच्या ‘अमेरिकन बुल टेरियर’ किंवा ‘बोस्टन टेरियर’ जातीच्या कुत्र्याला.
हा स्टबी अमेरिकन पायदळाच्या १०२व्या रेजिमेंटचा अधिकृत सैनिक होता. हा छावणीत, रणांगणावर, मशीनगनच्या मार्यात, तोफगोळ्यांच्या भडिमारात बेधडक हिंडायचा. जखमींना मदत करायचा. एक जर्मन हेर त्याने अचूक ओळखला आणि पकडून दिला. जर्मन सैन्याने ‘मस्टर्ड गॅस’ हा विषारी वायू सोडला आहे, हे स्टबीच्या तीक्ष्ण घ्राणेंद्रियाने प्रथम ओळखलं आणि आपल्या सैन्याला सावध केलं. अमेरिकन सेनाश्रेष्ठी त्याच्या या कामगिरीवर इतके खूश झाले की, स्टबीला चक्क ‘सार्जंट’ हा हुद्दा देण्यात आला.
दुसर्या महायुद्धात अमेरिकन मरिन्सनी जपानविरुद्धच्या पॅसिफिक महासागरातल्या युद्धात ‘डॉबरमन पिंकश्वर’ जातीचे एकूण ५४९ कुत्रे वापरले. पण, जबरदस्त मर्दुमकी गाजविली ती ‘चिप्स’ नावाच्या ‘जर्मन शेफर्ड’ जातीच्या कुत्र्याने. सिझिली बेटात इटलीविरुद्धच्या लढाईत चिप्स एका इटालियन मशीनगन मोर्चावर एकटाच तुटून पडला. त्याचा हा हल्ला इतका भयंकर होता की, हातात मशीनगन असणारे मोर्चातले चार गनर्स घाबरून गेले आणि अमेरिकन सैनिकांना शरण आले. ‘लढाई नको; पण कुत्रा आवर!’ १९४३च्या जानेवारीत उत्तर आफ्रिकेत मोरोक्को देशात काझाब्लांका या ठिकाणी चर्चिल आणि रुझवेल्ट यांच्यात एक उच्चस्तरीय बैठक झाली. या बैठकीच्या सुरक्षा यंत्रणेत चिप्स होता. ‘आयटीबीएफ’चा संबंधित अधिकारी म्हणाला की, “या नवजात १७ पिल्लांना उत्तम प्रशिक्षण दिलं जाईल आणि इतर सुरक्षादलांकडेही सुपूर्द केलं जाईल!”