तेलंगणा : देशाचं लक्ष लागलेल्या हैदराबाद महापालिका निवडणुकीची आज मतमोजणी होत आहे. हैदराबाद महापालिकेच्या (GHMC) १५० जागांवर एकूण ११२२ उमेदवार रिंगणात आहेत. या निवडणुकीवर संपूर्ण देशाचे लक्ष आहे. तेलंगणा राष्ट्र समिती (TRS) आणि एमआयएमच्या बालेकिल्ल्यात भारतीय जनता पक्ष (BJP) मुसंडी मारत असल्याचं चित्र समोर येत आहे.
सुरुवातीला आलेल्या कलानुसार भाजपाने जोरदार मुसंडी मारलेली आहे. एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांच्या गडामध्ये भाजपा ४० जागांवर आघाडीवर असून सत्ताधारी टीआरएस १४ जागांवर आघाडीवर आहे. भाजप प्रवक्ते संबित पात्रा यांनी प्रारंभीच्या ट्रेंडविषयी ट्विट केले. यात त्यांनी भाग्यनगर लिहिले. योगी आदित्यनाथ यांनी हैदराबादचे नाव बदलून भाग्यनगर असे म्हटले होते.हैदराबाद महानगरपालिका निवडणुकीत सुरुवातीच्या कलांमध्ये भाजपानं टीआरएसच्या जागांवर आघाडी मिळवली आहे. हैदराबाद निवडणूक निकालाची सध्या मतमोजणी सुरू आहे, त्यामध्ये सध्या भाजप आघाडीवर आहे. १ डिसेंबर रोजी झालेल्या निवडणुकीत ७४.६७लाख नोंदणीकृत मतदारांपैकी केवळ ३४.५० लाख (४६.५५ टक्के) मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला होता.३० ठिकाणी मतमोजणी केंद्रे सुरू केली गेली आहेत. मतमोजणीसाठी ८,१५२ कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. मतमोजणीची संपूर्ण प्रक्रिया प्रत्येक मतमोजणी केंद्रात लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांत कैद केली जात आहे. निवडणुकांमध्ये मतपत्रिका वापरली जात होती, त्यामुळे निकालाबाबत संध्याकाळी किंवा रात्रीपर्यंत चित्र स्पष्ट होण्याची शक्यता आहे.