कांदिवलीत दोन मुलींची हत्या करून पित्याने घेतला गळफास

    03-Dec-2020
Total Views |

Kandivali_1  H
 
 

मुलीच्या तोंडला चिकटपट्टी लावून तिची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार

मुंबई : दोन लहानग्या मुलींची हत्या करून पित्याने स्वतः आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना कांदिवली, गणेश नगर येथे घडली. कर्जबाजारी व किडनी खराब झल्याच्या कारणावरून पित्याने हे पाऊल उचलल्याचे बोलले जात आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करीत आहेत.
 
 
खान गल्ली, लालजी पाडा, गरुडा पेट्रोल पंपासमोर, गणेशनगर, कांदिवली (पश्चिम) या ठिकाणी अजगर अली जब्बार अली (४५) यांनी दोरीच्या सहाय्याने लोखंडी अँगलला गळफास लावल्याचा तसेच १२ वर्षीय मुलगी जमिनीवर व ८ वर्षीय मुलगी खुर्चीवर बेशुद्ध अवस्थेत पडल्याची माहिती गुरुवारी कांदिवली पोलिसांना मिळाली. पोलिसांनी तिघांनाही रुग्णालयात हलवले असता त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.
 
 
मिळालेल्या माहितीनुसार अजगर अली जब्बार अली हे कुटुंबासह मालवणी येथे राहतात. त्यांचा गणेश नगर येथे डाय बनवण्याचा कारखाना आहे. ते गुरुवारी दुपारी दोन मुलींसह कारखान्यावर आले. त्या ठिकाणी त्यांनी मुलींच्या तोंडाला चिकट पट्टी लावून त्यांची हत्या केली व स्वतः गळफास घेतला. अजगर यांच्या पत्नीने त्यांना फोन करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांचा फोन लागला नाही. अजगर यांना किडनीचा आजार होता. तसेच ते कर्जबाजारी झाले होते. यातूनच त्यांनी मुलींची हत्या करून आत्महत्या केल्याचे सांगण्यात येत आहे. घटनास्थळी सुसाईड नोट मिळाली असून पोलीस या प्रकरणाचा तपास करीत आहेत.