शून्यातून ‘सुपर्ब’ बनलेला उद्योजक

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    03-Dec-2020   
Total Views |

waghmare _1  H


भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ‘शिका, संघटित व्हा, संघर्ष करा’ हा मूलमंत्र सर्वच भारतीयांना दिला. विशेषत: वंचित घटकासाठी ही आयुष्याची त्रिसूत्री ठरली. ज्यांनी हा मूलमंत्र अंमलात आणला त्यांच्या आयुष्याचं सोनं झालं. सुगत वाघमारे यांनी तर आपलं अवघं आयुष्य ‘सुपर्ब’ केलं आहे.
 
 
 
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सुमारे ८० वर्षांपूर्वी तत्कालीन दलित समाजाला मंदिर प्रवेश मिळावा, यासाठी अनेक आंदोलने केली होती. निव्वळ देवाचं दर्शन हा त्यामागचा हेतू नव्हता, तर अस्पृश्य म्हणून हिणवल्या गेलेल्या या समाजाला कुठेतरी समानतेची वागणूक मिळावी, हाच त्या मागचा उद्देश होता. काळाराम मंदिराचा सत्याग्रह हा त्यातील एक गाजलेला सत्याग्रह होय.
 
 
अशाच सत्याग्रहापैकी एक होता अमरावतीमधल्या अंबादेवीच्या मंदिराचा सत्याग्रह. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि पंजाबराव देशमुख यांनी हे आंदोलन केले होते. त्यानंतर तिथे अस्पृश्यांना प्रवेश सुरु झाला. सोबतच एक चांगली प्रथा सुरु झाली. या देवीचा दरवर्षी सोहळा साजरा होतो. त्याची पूजा एखाद्या मंत्र्याच्या हस्ते होते, तर समारोप अनुसूचित जातीतील प्रतिष्ठीत व्यक्तीच्या हस्ते होते. २०१५ रोजी हा बहुमान एका अशा तरुणास मिळाला ज्याने विदर्भातील बांधकाम व्यवसायात एक आपलं अढळ स्थान निर्माण केलं आहे. तो युवक म्हणजे ‘सुपर्ब हौसिंग अ‍ॅण्ड इन्फ्रास्ट्रक्चर प्रा. लि.’चे अध्यक्ष सुगत वाघमारे.
 
 
 
सुगत यांच्या या संघर्षमय कथेचे खरे नायक आहेत ते ग्यानेश्वर खंडुजी वाघमारे. सुगतचे बाबा. आपल्यापैकी अनेकांना अमिताभ बच्चनचा ‘त्रिशूल’ चित्रपट आठवत असेल. ग्यानेश्वर हे त्यांच्या ‘त्रिशूल’ चित्रपटाचे खरे नायक. मूळच्या हिंगोलीतल्या सेनगावचा हा मुलगा काहीएक शिक्षण नसताना अकोल्यात आला. लोकांची गुरंढोरं सांभाळली. घराच्या बांधकामासाठी मजूर म्हणून काम केलं. भिंती बांधणारा मिस्त्री झाला. त्यानंतर स्वत:च ठेकेदार होऊन मजुरांना काम देऊ लागला. कालांतराने बांधकाम व्यावसायिक बनून हा पठ्ठ्या इमारतीसुद्धा बांधू लागला. गुंफाबाई ही ग्यानेश्वरांची बायको. अगदी गृहकृतदक्ष गृहिणी. ग्यानेश्वर एकीकडे यशाची शिखरं पादाक्रांत करत असताना ही माऊली घरची आघाडी सांभाळत राहिली. या दाम्पत्यास एक मुलगा आणि पाच मुली झाल्या. हा एकुलता एक मुलगा म्हणजेच सुगत होय.
 
 
सुगत यांचे सारं शालेय शिक्षण विविध शाळेत झालं. होली क्रॉस हायस्कूल, एन. आर. देशपांडे हायस्कूल आणि आगरकर हायस्कूलमधून त्यांचं दहावीपर्यंतचं शिक्षण झालं. पुढे खामगावच्या गव्हर्नमेंट पॉलिटेक्निकमधून सुगत यांनी तीन वर्षांचा सिव्हील इंजिनिअरिंगचा डिप्लोमा केला. सुगत १४-१५ वर्षांचे असल्यापासून आपल्या बाबांसोबत इमारतीच्या बांधकाम चालू असलेल्या साईट्सवर जायचे. तेव्हापासून त्यांना बांधकाम व्यवसायाचे बाळकडू मिळाले. शिक्षण पूर्ण झाल्यावर त्याने स्वत:ला या क्षेत्रात पूर्णपणे झोकून दिले. दरम्यान, सुगत यांच्या आयुष्यात एक असा प्रसंग घडला की, त्यांचं पूर्ण आयुष्यच बदलून गेलं. त्यांनी शून्यातून स्वत:चं साम्राज्य तयार करण्याचं ठरवलं. वडिलांचा बांधकाम क्षेत्रातला वरदहस्त न घेता स्वत:चं वेगळं अस्तित्व निर्माण करण्याची त्यांनी जिद्द उराशी बाळगली.
 
 
त्यांनी बांधकाम व्यवसायाची स्वत:ची स्वतंत्र कंपनी सुरु केली. अल्पावधीतच प्रामाणिकपणा, गुणवत्ता या जोरावर अकोल्यामध्ये सुगतची कंपनी नावारुपास आली. ५०च्या आसपास इमारतींसंबंधी विविध प्रकल्प त्यांनी पूर्ण केले. सर्व काही सुरळीत सुरु असताना पुन्हा त्यांच्या आयुष्यात एक बॅडपॅच आला. आर्थिक अडचणीत कंपनी सापडली. अंगावर काही व्यावसायिक कर्ज झालं. मात्र, म्हणतात ना जिथे संकट तिथे मार्ग पण असतो.
 
 
सुगत यांना मुंबईमध्ये बांधकामासंबंधी एक संधी मिळाली. २००५ मध्ये सुगत मुंबईला आले. एका वर्षांत प्रचंड मेहनत केली. अंगावर असलेले सर्व कर्ज फेडले. इतकंच नव्हे तर मुंबईतल्या मुलुंड, पवईमध्ये आणि अकोल्यामध्ये इमारती उभारल्या. औरंगाबादमध्ये तर ३०० घरांची एक मोठी वसाहत उभारली. सध्या पनवेलमध्ये तीन हजार घरांचा मोठा प्रकल्प सुगत यांची कंपनी उभारत आहे. यातील १५०० घरे ही आयुर्विमा महामंडळ आणि उर्वरित १५०० घरे मुंबई महानगरपालिकेच्या कर्मचार्‍यांसाठी नियोजित आहेत. प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष ते शेकडो कामगारांना रोजगार देत आहेत.
 
 
सुगत वाघमारे यांचं सामाजिक योगदानसुद्धा प्रचंड आहे. गेली १७ वर्षे लहान मुलांसाठी जे सामाजिक कार्य करतात ते वाखाणण्यासारखे आहे. ‘१०९८’ ही भारतातील लहान मुलांसाठी ‘चाईल्ड हेल्पलाईन’ आहे. अकोला जिल्ह्यातील या हेल्पलाईनचे सुगत वाघमारे संचालक आहेत. त्याचप्रमाणे ‘रेल्वे चाईल्ड हेल्पलाईन’चे सुद्धा ते प्रमुख आहेत. ‘राईट टू एज्युकेशन’ या प्रकल्पाच्या अकोला विभागाचे ते जिल्हा सदस्य आहेत. ‘तीक्ष्णगत मल्टिपर्पझ वेल्फेअर सोसायटी’ या संस्थेचे ते संस्थापक अध्यक्ष आहेत.
 
 
या संस्थेच्या माध्यमातून महिला, युवा, लहान मुले, वृद्ध अशा विविध घटकांसाठी ते काम करतात. ‘दलित इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अ‍ॅण्ड इंडस्ट्री’ अर्थात ‘डिक्की’ या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी ४३ हून अधिक तरुणांना उद्योजक म्हणून उभे केले आहे. त्यांना उद्योजकीय पायाभूत सुविधा उभारण्यास सर्वतोपरी मदत केली आहे. अकोला आणि अन्य जवळच्या जिल्ह्यांतील ‘डिक्की’ची कार्यप्रणाली ते हाताळतात. ते ‘डिक्की’च्या मुंबई विभागाचे वरिष्ठ उपाध्यक्ष आहेत, तसेच ‘नॅशनल कौन्सिल’ सदस्यसुद्धा आहेत.
 
ग्यानेश्वर वाघमारे यांनी ‘सम्यक संबोधी’ संस्था १९७८ साली उभारली. या संस्थेअंतर्गत बुद्धविहार, तब्बल १७ हजार पुस्तके असलेले अवाढव्य ग्रंथालय, लग्नाचा हॉल, विवाह संस्था आदींचे संचालन ही संस्था करते. सुगत वाघमारे यांच्या नेतृत्वाखाली ही संस्था उत्तम पद्धतीने बहरत आहेत. ‘अदु-तिशू प्रॉडक्शन्स अ‍ॅण्ड म्युझिक’ ही संगीत क्षेत्रातील कंपनीसुद्धा ते चालवतात. सुगत वाघमारे हे युवा वर्गाच्या उत्कर्षासाठी सतत काही न काही उपक्रम राबवत असतात. यामुळेच अकोल्यातील शेकडो युवकांचे ते प्रेरणास्थान आहेत.
 
अकोल्याला आले की तरुणांचा त्यांच्याभोवती नेहमीच गराडा असतो. या संपूर्ण प्रवासात त्यांना मोलाची साथ दिली ती त्यांची पत्नी तनुजा वाघमारे यांनी. सुगत व तनुजा १९९६ साली विवाहबद्ध झाले. तीक्ष्णगत आणि अद्वयी अशी दोन मुले त्यांना आहेत. तीक्ष्णगत याने जय हिंद महाविद्यालयातून ‘मास मीडिया’ विषयामध्ये पदवी प्राप्त केली. त्यानंतर ‘कन्स्ट्रक्शन मॅनेजमेंट’ या विषयातसुद्धा त्याने पदवी प्राप्त केली आहे. अद्वयी ही आर्किटेक्चरच्या दुसर्‍या वर्गात शिकत आहे. तीक्ष्णगत सध्या आपल्या बाबांच्या व्यवसायास हातभार लावत आहे. ‘डिक्की’चे संस्थापक पद्मश्री मिलिंद कांबळे यांचा देखील आपल्या व्यावसायिक जीवनात मोलाचा वाटा आहे असे सुगत वाघमारे मानतात.
 
 
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ‘शिका, संघटित व्हा, संघर्ष करा’ हा मूलमंत्र सर्वच भारतीयांना दिला. विशेषत: वंचित घटकासाठी ही आयुष्याची त्रिसूत्री ठरली. ज्यांनी हा मूलमंत्र अंमलात आणला त्यांच्या आयुष्याचं सोनं झालं. सुगत वाघमारे यांनी तर आपलं अवघं आयुष्य ‘सुपर्ब’ केलं आहे.



@@AUTHORINFO_V1@@