अमरीश पटेलांचा विजय खडसेंना पहिला दणका !

    03-Dec-2020
Total Views |

eknath khadse_1 &nbs



धुळे :
नंदूरबार विधान परिषद निवडणुकीत काँग्रेसला धूळ चारत भाजपनं दणदणीत विजय मिळवला आहे. भाजप उमेदवार अमरीश पटेल यांनी ३३२ मतं घेत विजयी गुलाल लावला. तर काँग्रेसचे उमेदवार अभिजित पाटील यांना ९८ मतांवर समाधान मानावं लागलं. या विजयाने महाविकास आघाडी आणि नुकतंच भाजपमधून पक्षांतर करून राष्ट्रवादीत गेलेल्या एकनाथ खडसेंनादेखील पहिला दणका मिळाला असल्याचे बोलले जातं आहे. एकनाथ खडसे (eknath khadse) हे भाजपमधून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेल्यांनतर आगामी काळात खडसेंच्या साथीने सहकारी बँकांपासून ते पालिका आणि नगरपरिषदेतील भाजपचं वर्चस्व मोडीत काढण्यासाठी  महाविकास आघाडीला फायदा होईल अशी चर्चा राजकीय वर्तुळात होती. मात्र अमरीश पटेल (amrish patel) यांच्या विजयाने खडसेंना पहिला दणका दिला आहे.



दरम्यान राज्यात पदवीधर, शिक्षक मतदारसंघ निवडणुकीची आज मतमोजणी सुरु झाली असून सोलापूरमध्ये मतमोजणीसाठी दोन दिवस लागणार असल्याचे सांगितले जात आहे. भाजपचे उमेदवार अमरीश पटेल विरोधकांची ११५ मतं फोडण्यात यशस्वी झाले आहेत. भाजपाच्या १९९ मतदारांनी तर महाविकास आघाडीच्या २१३ मतदारांनी मतदान केलं होते. त्यात काँग्रेसच्या किमान ५७ मतदारांनी क्रॉस व्होटिंग केल्याचे स्पष्ट झाले आहे. काँग्रेसचे संख्याबळ १५७ असतानाही अभिजित पाटील यांना फक्त ९८ मतं मिळाली आहेत. तर महाविकास आघाडीच्या किमान ११५ मतदारांनी क्रॉस व्होटिंग केले आहे. महाविकास आघाडीकडे २१३ मतं असतानाही पाटील यांना ९८च मतं मिळाल्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे. अमरीश पटेल यांनी आपल्या विजयाचं श्रेय कार्यकर्त्यांना दिले आहे. धुळे आणि नंदुरबारमधील भाजपचे आमदार, खासदार, सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी घेतलेल्या परिश्रमामुळेच आपण विजयी झालो, अशी प्रतिक्रिया पटेल यांनी दिली आहे.



अमरिश पटेल यांचा या मतदारसंघातील हा सलग तिसरा विजय आहे. यापूर्वी त्यांनी २००९, २०१५ आणि आता २०२०मध्ये विजय मिळवला.अमरिश पटेल यांनी पहिल्यांदा २००९ मध्ये बिनविरोध विजय मिळवला होता. मग २०१५ मधील विधानपरिषद निवडणुकीत अमरिश पटेल हे ३२१ मतांनी विजयी झाले. त्यानंतर २०२०च्या पोटनिवडणुकीत अमरिश पटेल यांनी २३४ मतांनी विजयी मिळवून, आपली ताकद दाखवून दिली.राज्यात महाविकासआघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर ही पहिली मोठी निवडणूक असल्यामुळे महाविकास आघाडी आणि भाजपने ताकद पणाला लावली होती. विधानपरिषदेच्या निकालाचा महाराष्ट्रातील आगामी राजकारणावर परिणाम दिसून येतील.