परग्रहांवरील जीवसृष्टीविषयी फार पूर्वीपासूनच मानवाला कुतूहल होते. पण, खगोलशास्त्रातील विविध प्रयोग आणि नवनव्या संशोधनामुळे परग्रहवासीयांच्या अस्तित्वाबाबत जगभरातील वैज्ञानिकांचेही हळूहळू एकमत होताना दिसते. २०२० या सरत्या वर्षातही अंतराळ विज्ञानात ही चर्चा केंद्रस्थानी राहिली. त्यानिमित्ताने...
या विश्वाची उत्पत्ती एवढ्या मोठ्या प्रमाणात कधी व कशी झाली आणि त्यात काय काय उत्पात होतात, हे सगळे जरी गौडबंगाल असले तरी मानव जातीने त्यातील काही भाग अंतराळ विज्ञान क्षेत्रातील तंत्रज्ञानाच्या जोरावर माहीत करून घेतला आहे. खरंतर मानवाचा हा शोध-अभ्यास प्राचीन काळापासून सुरू आहे. सध्या मानवाने काही ग्रहांचे सखोल अभ्यास-प्रयोग सुरू ठेवले आहेत. त्यात मंगळ, शनी, चंद्र, बाह्य ग्रह इत्यादींचा प्रामुख्याने समावेश होतो. मानवाच्या या शोध-अभ्यासात पृथ्वीवर जीवसृष्टी कशी उत्पन्न झाली इथपासून ते सूर्यमालेतील ग्रहांवर वा बाह्य ग्रहांवर तशी जीवसृष्टी आहे का, याबद्दलच्या उत्सुकतेपोटी विचार व काम सुरू झाले आहे.
बाह्य ग्रह म्हणजे, आपल्या सूर्यमालेच्या बाहेर अनेक स्वयंप्रकाशित सूर्यासारखे तारे आहेत व त्यांपैकी काहींच्या बरोबर त्याभोवती फिरणारे ग्रह आहेत. त्यांनाच आपण बाह्य ग्रह म्हणणार आहोत. हे बाह्य ग्रह कितीतरी प्रकाशवर्षे दूर आहेत व ते केवळ राक्षसी आकाराच्या म्हणजे अवाढव्य मोठ्या दुर्बिणीनेच टिपता येतात. या अभ्यासात दुसर्या ग्रहांवर उपग्रह सोडणे, तेथे मानवाचे जाणे व तेथील परिस्थिती कशी आहे व जीवसृष्टीला हितकारक आहे का, याचा अभ्यास मानवाने सुरू केला. काही ग्रहांवरून रेडिओ संदेशही आले.
पण, ते कोणत्या भाषेत आहेत, ते अद्याप कळले नाही. पण, ती भाषा मोर्सकोडमधली असावी, असा कयास आहे. त्याला खगोलतज्ज्ञांनी उत्तरेही दिली. पण, अंतर जास्त असल्यामुळे उत्तर पोहोचले की नाही, वा त्याची प्रतिक्रिया काय, ते समजायला कित्येक प्रकाशवर्षांचे अंतर असल्याने अनेक वर्षांचा काळ घालवावा लागणार, हे खगोलतज्ज्ञांच्या लक्षात आले. (एक प्रकाशसेकंद म्हणजे साधारणपणे तीन लाख किमी यावरून एक प्रकाशवर्ष म्हणजे तीन लाख ३६०० X २४ X ३६५ = सुमारे ९ X १० ची शक्ती १२ पर्यंत वाढविणे इतके किमी. (नऊ ट्रिलियन किमी).
मंगळावरच्या जीवसृष्टीची संभाव्यता
जर प्राचीन काळी म्हणजे ४.१ अब्ज ते ३.७ अब्ज वर्षांपूर्वी (नोआशिअन काळ) या ग्रहावर सृष्टी अस्तित्वात असली, तर ती सध्याच्या मंगळाच्या कित्येक किमी वितळलेल्या पृष्ठभागाखाली असणार, असा निष्कर्ष तज्ज्ञांनी अभ्यासाअंती काढला आहे. ‘नासा’च्या ‘क्युरिऑसिटी’ या रोव्हरने मंगळावर पाणी व मोठ्या प्रमाणात मिथेन वायू असल्याचा नवा पुरावा मिळविला आहे. यावरून तज्ज्ञांनी तर्क केला आहे की, सूक्ष्म जीवसृष्टीला या ग्रहावर वाव आहे. एवढेच नाही तर या जमिनीत पीकही घेता येऊ शकेल, असे तर्कही वर्तविण्यात आले आहेत.
त्या काळी म्हणजे चार अब्ज वर्षांपूर्वी जरी मंगळावर उष्णता व ओलावा असला, तरी चुंबकत्व नष्ट झाल्यामुळे व हवेचे वातावरण विरळ झाल्यामुळे काळाबरोबर तापमान खाली गेले असावे व पृष्ठभागाखाली जीव तग धरून असण्याची शक्यता नाकारता येत नाही. सध्याच्या निरीक्षणावरून या मंगळ ग्रहावर भूगर्भीय सूचक गोष्टी (पाण्याशी संबंधित खनिजे असलेल्या प्राचीन नद्या व रसायने) दिसतात.
शुक्रावरची संभाव्य जीवसृष्टी
शुक्र ग्रह हा पृथ्वीसारख्याच आकाराचा, वजनाचा, घनतेचा, गुरुत्वाचा व ग्रहाच्या मिश्रण रचनेचा असला, तरी पृथ्वीसारखी जीवसृष्टी शुक्रावर नाही. याचे कारण म्हणजे तेथील सरासरी ४०० अंश सेल्सिअस तापमान, हवेतील दाट थराचा कार्बनडाय ऑक्साईड, जे की जीवसृष्टीसाठी अनुकूल नाही. पृथ्वीवरसुद्धा प्राचीन युगात तिचे प्रथम कवच हे रेडिओ अॅक्टिव्ह उष्णता निर्माण करणार्या युरेनियम व पोटॅशियम धातूंनी व्यापलेले होते, ही गंभीर स्थिती एका ‘अॅस्टोराईड’सारख्या लघु ग्रहाने टक्कर दिल्याने नष्ट झाली व जीवसृष्टी निर्माण होण्यास व टिकून राहण्यास अनुकूल झाली.
सप्टेंबर २०२० मध्ये केलेल्या संशोधनातून असे आढळले की, शुक्राच्या वातावरणात ढगामध्ये २० भाग प्रति कोटी फॉस्फिन वायू आहे. तो टिकून राहण्यास कारणीभूत तेथील सूक्ष्मजीव असले पाहिजेत, असे तज्ज्ञांनी तर्क केले आहेत. फॉस्फिनचा स्रोत सूक्ष्मजीव असतील, याचा मात्र शोध लागलेला नाही. काही इतर ग्रहांवर मिथेन वायू सापडला आहे व त्यावरून जीवसृष्टी निर्माण होण्यास अनुकूल स्थिती असावी, असे तर्कही केले आहेत. त्याचप्रमाणे शुक्रावर फॉस्फिन वायू सापडला व तो सूक्ष्मजीवांमुळे आढळला, अशीही एक शक्यता शास्त्रज्ञांनी व्यक्त केली आहे.
शनी ग्रहावर संभाव्य जीवसृष्टीचा शोध
१९९७ सालापासून ‘कॅसिनी हाऊजिन’च्या साहाय्याने शोध सुरू आहे. सात वर्षांत कॅसिनी शुक्र, पृथ्वी, गुरू ग्रहांचा मार्ग काढीत शनीच्या कक्षेत पोहोचले. १३ वर्षे हा शोधाभ्यास सुरू होता व त्यातून खूप माहिती मिळाली ती अशी -
- पृथ्वी व मंगळ हे ग्रह सारख्याच घटक पदार्थांनी बनले आहेत व टेरेस्ट्रिअल म्हणजे सिलिकेट्स असलेले आहेत.
- दोन्ही ग्रहांच्या पृष्ठभागावर पाणी आहे.
- शनी ग्रह वेगळा आहे. या ग्रहाच्या पृष्ठभागावर टणक भाग अस्तित्वात नाही. शुक्र ग्रहाचा आतील भाग धातूचा व त्यावर दुसरे धातू व गॅस भरलेला आहे व तो पाण्यावर तरंगत राहिलेला आहे.
- या ग्रहाची घनता पाण्याच्या घनतेच्या ३० टक्क्यांहून कमी आहे.
- जरी शनी ग्रह पृथ्वीच्या घनफळाच्या ७०० पट मोठा असला, तरी त्याची घनता पृथ्वीच्या एक अष्टमांश आहे.
- आपल्या पृथ्वीवर एक चंद्र आहे, तर शनी ग्रहावर ६२ चंद्र आहेत व त्यातील ‘टायटन’ हा सगळ्यात मोठा चंद्र आहे आणि तो बुध ग्रहापेक्षाही मोठा आहे.
- आपल्याला माहीत आहे की, ‘इर्मा’ वादळ हे संकट निर्माण करणारे आहे. पण, शनीवरची वादळे दहापट ताकदीची म्हणजे १९०० किमी प्रति तास वेगाची असतात व ती आली म्हणजे कित्येक दशक वर्षे टिकतात. तेथे विजा चमकणे सतत सुरू असते व दर एक दशांश सेकंदाला चमकणे होत असते.
- शनीची एक वर्षगणना म्हणजे पृथ्वीची २९ वर्षे आहेत.
- शनीच्या ‘टायटन’ या चंद्रावर नायट्रोजन व पृष्ठभागावर थोडे आढळलेले मिथेन वायू तज्ज्ञांच्या तर्काप्रमाणे जीवसृष्टीला अनुकूल असावे. पण, तेथील तापमान अंक्र्टिकापेक्षाही थंड असून, ते वजा १८० अंश सेल्सिअस आहे व हवेचा दाब ५० टक्के जास्त आहे.
पृथ्वीवर ज्वालामुखी तप्त लाव्हा व गॅस स्वरूपात मिळतो. पण, शनीवर तो ज्वालामुखी थंड व पाणी, बर्फ व हायड्रोकार्बनच्या स्वरूपात आढळत असल्याचे शास्त्रज्ञांनी निरीक्षणावरुन नोंदवले आहे.
सूर्यमालेतील इतर ग्रहांवरचा शोध
‘अॅस्टरॉईड बेनू’वरून या वर्षी पृष्ठभागावरील एक नमुना पृथ्वीवर मागविलेला आहे व त्यातून जीवसृष्टीचा काहीतरी उलगडा होऊ शकतो, असा अंदाज आहे. गुरू ग्रहावरील ‘युरोपा’ चंद्रावरून व ‘प्लेटो’ ग्रहावरून जीवसृष्टीचा शोध घेणे सुरू आहे. बाह्य ग्रहावरील जीवसृष्टीकरिता शोध-प्रयोग
१. बाह्य ग्रहावर ज्वालामुखीमधून निघालेल्या हायड्रोजन वायू व उष्ण तापमानामुळे जीवसृष्टीची दाट संभाव्यता आहे.
२. ४०० प्रकाशवर्षे दूर असलेल्या सूर्यमालेसारख्या बाह्य ग्रहावर जीवाणू आढळला.
३. सूर्याच्या जवळच्या जगातील १२ प्रकाशवर्षे दूर असलेल्या ‘ताऊ सेटी’मधील दोन ग्रहांवर जीवसृष्टीची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
४. १११ प्रकाशवर्षे दूर असलेल्या व कधी न टिपलेल्या बाह्य ग्रहावर जीवसृष्टीची संभाव्यता.
५. ‘नासा’च्या ‘केपलर’ दुर्बिणीच्या टिपण्यातून २० ग्रहांवर जीवसृष्टीची संभाव्यता आढळली.
६. ‘नासा’च्या उपग्रहामुळे २४०० परग्रहवासी वास्तव्यास असतील अशा ग्रहांची शक्यताही वर्तविण्यात आली आहे.
७. जीवसृष्टीला अनुकूल असे १०० प्रकाशवर्षे दूर असणारे २४ ग्रह (जास्त उष्णता असलेले गुरू ग्रहासारखे जग) टिपले आहेत.
८. बाह्य ग्रहावरील परग्रहवासी आपल्या पृथ्वीचे निरीक्षण करून न्याहाळत आहेत. त्यामुळे ‘लोक हो, संभाळा’ असा इशारा खुद्द तज्ज्ञांनीही दिला आहे.
९. पुढील दहा ते १५ वर्षांत जीवसृष्टी असलेल्या बाह्य ग्रहाचा शोध नक्की घेणार असल्याचा विश्वास तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.
१०. चीनने दहा हजार लोकवस्ती हटवून गिझहाऊ प्रांतात २०१६ मध्ये एक राक्षसी रेडिओ दुर्बीण (अॅपर्चर ५०० मी असलेली) बाह्य ग्रहांचे व जीवसृष्टी शोधण्याच्या कामाकरिता बसवायचे काम सुरू केले आहे.
११. जवळच्या सूर्यमालेमधील १२ प्रकाशवर्षे दूर असणार्या परग्रहवासीयांशी संपर्क साधण्यासाठी नॉर्वेमधून ऑक्टोबर २०१७ मध्ये एक रेडिओ संदेश पाठविला गेला. त्यावरची प्रतिक्रिया दूर असल्याने २५ वर्षांनी मिळण्याची शक्यता आहे.
१२. ५१ प्रकाशवर्षे दूर असणार्या ‘ताऊ बूट’ प्रणालीचा बाह्य हॉट गुरू ग्रहाकडून (बायनरी सूर्यावरील) पहिला रेडिओ सिग्नल नेदरलँडच्या शास्त्रज्ञांना मिळाला आहे. त्याच्या डिकोडिंगचे काम सुरू आहे.
परग्रहवासी कसे असतील?
माणसांसारखेच हात, पाय व डोके असलेले परग्रहवासी अंगापिंडाने पृथ्वीवरील मानवापेक्षा धिप्पाड असतील, तसेच त्यांचे वजन ३०० किग्रॅमहून अधिक असण्याची शक्यता शास्त्रज्ञांनी वर्तविली आहे. ‘नासा’, ‘इस्रो’, चीन, युरोप, रशिया व इतर देशातील खगोलतज्ज्ञ मोठ्या प्रमाणात जीवसृष्टीचे प्रयोग-शोध घेत आहेत व त्यांना लवकरच यश मिळो, हीच सदिच्छा.