आई आणि बहिणीला वाचविण्यासाठी
गेलेल्या तरुणीचा बुडून मृत्यू
डोंबिवली कोळेगाव नजीकच्या खदाणीतील घटना

कल्याण : डोंबिवली नजीक असलेल्या कोळेगाव परिसरातील एका पाण्याने भरलेला खदानीत एक महिला कपडे धुण्यासाठी गेली असता त्याठिकाणी तिची चार वर्षाची मुलगी पाण्यात पडली. तिला वाचविण्यासाठी महिलनेही उडी घेतली. दोघी बुडत असताना तिच्या १६ वर्षाच्या मुलीने बहिण व आईला वाचविण्यासाठी पाण्यात उडी घेतली. आई व बहिण वाचली मात्र तरुणीचा बुडून मृत्यू झाला आहे. ही घटना आज सकाळी ११ वाजता घडली आहे. बुडूत तरुणीच्या मृतदेहाचा शोध अग्निशमन दल ग्रामस्थांच्या मदतीने घेत आहे. तरुणीचा मृतदेह सायंकाळर्पयत हाती लागला नव्हता. सायंकाळी शोधकार्य थांबविण्यात आले आहे.
कोळेगावात राहणारे विवेकानंद शेट्टी हे रिक्षा चालक आहे. त्यांची पत्नी गीता, मुलगी परी, लावण्या आणि दोन मुले असा परिवार आहे. कोळेगावातील खदाणीत गिता शेट्टी या सकाळी अकरा वाजता कपडे धुण्यासाठी गेल्या होत्या. त्यांच्यासोबत असलेली चार वर्षाची मुलगी परी ही पाण्यात पडली. पाण्यात पडलेल्या परीला वाचविण्यासाठी गीता यांनी पाण्यात उडी घेतली. परी व गीता या दोघी पाण्यात बुडत असल्याचे पाहून त्यांच्या सोबत असलेल्या लावण्याने पाण्यात उडी घेतली. या घटनेत परी व गीता या दोघी वाचल्या आहेत. मात्र लावण्याचा पाण्यात बुडून दुदैवी मृत्यू झाला आहे.
लावण्याचे फारसे शिक्षण झालेले नव्हती. ती आईला घर कामात मदत करीत होती. घटनेच्या वेळी त्यांच्यासोबत लावण्याचा भाऊ बबलू देखील उपस्थित होता. बहिणीला बुडताना त्याने पाहिले. हा प्रकार कळताच घटनास्थळी अग्नीशमन दलाने घाव घेतली. कोळेगावीतील खदानीत अग्नीशमन दलाच्या जवानांनी ग्रामस्थांच्या मदतीने तरुणीचा मृतदेह शोधण्याचे काम सुरु केले. त्यासाठी बोटीचा आधार घेतला आहे. मात्र सायंकाळर्पयत तरुणीचा मृतदेह मिळून आला नव्हता. या घटनेची नोंद मानपाडा पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.