महाराष्ट्रातील आत्महत्याग्रस्त शेतकर्यांच्या मुलांचे संगोपन करणारा व त्यांच्या जीवनात नवी उमेद जागृत करणारा नाशिकजवळील त्र्यंबकेश्वर येथील ‘आधारतीर्थ’ आश्रम. या आश्रमाच्या कार्याचा घेतलेला हा मागोवा...
बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेली त्र्यंबकनगरी ही अवघ्या विश्वात सुप्रसिद्ध आहे. ज्ञानेश्वर माऊली यांचे गुरु संत निवृत्तिनाथ महराज यांची तपोभूमी म्हणूनदेखील त्र्यंबकनगरी ओळखली जाते. या नगरीची ओळख ‘अनेक निराधार मुलांना आधार देणारी नगरी’ म्हणूनदेखील होत आहे. बारा वर्षांनी भरणारा कुंभमेळा जसा आध्यात्मिकतेची अनुभूती देतो, तसेच कार्य दु:खितांचे अश्रू पुसून त्यांना जीवनात नव्या उभारीने पुढे जाण्यास साथ देण्यासाठी येथील ‘आधारतीर्थ’ आश्रमाच्या माध्यमातून अविरत सुरु आहे.
याबाबत आश्रमाचे अध्यक्ष त्र्यंबकराव गायकवाड यांनी सांगितले की, ”महाराष्ट्रातील आत्महत्याग्रस्त शेतकर्यांच्या मुला-मुलींचे वास्तव्य येथे आहे. ‘आधारतीर्थ आश्रमा’ची स्थापना ऑगस्ट २००७ मध्ये झाली. त्र्यंबकनगरीत येणारे ९० टक्के वारकरी हे शेतकरी आहेत. तत्कालीन स्थितीत राज्य हे शेतकरी आत्महत्या घटनांनी ग्रासले गेले होते. जीवनाला नवीन उमेद प्राप्त व्हावी, व संकटातून मार्ग निघावा, यासाठी अनेक शेतकरी हे संत निवृत्तिनाथ व त्र्यंबकराजाच्या दर्शनास येत. त्यामुळे ज्या शेतकर्यांनी आत्महत्या केली आहे, त्यांचे कुटुंब हलाखीच्या परिस्थितीत जीवन व्यतीत करत आहे, अशा राज्यातील सर्व शेतकर्यांना ‘आधारतीर्थ’ आश्रमाची माहिती व्हावी यासाठी त्र्यंबकनगरीत हा आश्रम सुरु करण्यात आला.”
बळीराजा हा जगाचा पोशिंदा आहे. बळीराजा स्वत:ला संपवत आहे. अशा वेळी बळीराजाच्या कुटुंबाला मायेचा आधार मिळावा, त्यांना नव्याने जीवन जगण्याची उमेद जागृत व्हावी व त्यांना स्वाभिमानाने आपला जीवनप्रवास व्यतित करता यावा, यासाठी हा आश्रम कार्य करत आहे. या आश्रमाच्या स्थापनेतदेखील अडचणींचा डोंगर त्र्यंबकराव गायकवाड यांना पार करावा लागला.
सुरुवातीच्या काळात नऊ मुले व तीन मुली, यवतमाळ येथील लक्ष्मी चौधरी या आत्महत्याग्रस्त शेतकर्याच्या पत्नी यांच्या समवेत आश्रमाची मुहूर्तमेढ रोवली गेली. त्यावेळी शेतकरी संघटनेचे नेते शरद जोशी यांच्या साक्षीने कार्यास प्रारंभ झाला. सुरुवातीच्या काळात येथे दाखल होणार्या विद्यार्थ्यांना भोजन मिळणेदेखील दुरापास्त होते. अशा वेळी गायकवाड यांनी वर्षश्राद्ध, नारायण नागबली विधी करणार्या नागरिकांना जेवणासाठी आवाहन केले.
विद्यार्थ्यांची क्षुधातृप्ती केली. पत्र्याची शेड, जमिनीतून वर येणारे पाणी, अंगाला झोंबणारा गारवा तसेच कडक ऊन, डासांचा हैदोस अशा वातावरणात आश्रमाच्या कार्याची सुरुवात झाली. येथे राज्यातील सुमारे ३० जिल्ह्यांतील आत्महत्याग्रस्त शेतकर्यांचे १८२ मुली व १८१ मुले, तसेच नऊ शेतकर्यांच्या विधवा पत्नी असे एकूण ३७२ सदस्य कायमस्वरूपी निवासास आहेत. या सर्व मुलांसाठी भोजनव्यवस्था आजही मंगलकार्य व वर्षश्राद्धप्रसंगी दानाच्याच व आवहानाच्याच आधारे सुरु आहे.
कोरोना ‘लॉकडाऊन’ काळात एक दिवस भोजनच उपलब्ध न झाल्याने या आश्रमातील विद्यार्थी केवळ पाणी पिऊन झोपी गेले. आतापर्यंत १७१ आमदार, ५३ खासदार, ३४ कॅबिनेट मंत्री, दोन माजी मुख्यमंत्री, तीन राज्यपाल, शेतकरी नेते राजू शेट्टी, बच्चू कडू यांनी भेट दिली. संस्थेला कार्यानिमित्त ‘कर्मयोगिनी पुरस्कार’ही प्राप्त आहे. मात्र येथै सर्व मुले आत्महत्याग्रस्त शेतकर्यांची आणि जातीय समिकरणामध्ये खुल्या प्रवर्गातली असल्याने या मुलांसाठी वसतिगृह किंवा आश्रमशाळा याची परवानगी देता येत नाही, असा शासन निर्णय आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांना भोजनासाठी प्रतीक्षेतच राहावे लागते.
विशेष म्हणजे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २०१७ मध्ये विशेष बाब म्हणून या आश्रमाला आश्रमशाळेची परवानगी द्यावी, असे आदेशित केले असूनही केवळ भाजप सरकार सत्तेत नसल्याने आजही ती फाईल प्रलंबित आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनीदेखील आश्रमाचे काम समजून घेत कार्यास शुभेच्छा दिल्या. तसेच आजवर या आश्रमास पद्मश्री अण्णा हजारे, अभिनेते नाना पाटेकर, ‘मागेसेसे पुरस्कार’विजेते नीलिमा मिश्रा, भय्युजी महाराज, अभिनेत्री माधुरी दीक्षित आदी मान्यवरांसह काही राजकीय नेत्यांनी भेट दिली आहे.
या आश्रमात कोणीही व्यवस्थापक नसून आत्महत्याग्रस्त शेतकर्यांच्या विधवा पत्नी याच दैनंदिन कामकाज पाहत आहेत. त्यामुळे येथील मुलांना आईची माया मिळण्यास नक्कीच मदत होते. आगमी काळात शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी दरवर्षीच्या जानेवारी महिन्यात १५ जिल्ह्यांत आणि ५८ तालुक्यांत गायकवाड यांच्या समवेत आश्रमातील मुले प्रत्यक्ष भेट देतात. शेतकर्यांच्या बांधावर जाऊन त्यांना आत्महत्या न करण्याची शपथ देतात.
तसेच, आषाढी एकादशीच्या वारीप्रसंगी आळंदी ते पंढरपूरपर्यंत ही निराधार मुले पायी चालत वारकरी शेतकर्यांना आमच्या वडिलांनी जी चूक केली ती आपण करू नये, आत्महत्या व व्यसन करू नये, आमच्यासारख्या मुलांना निराधार करू नका, स्वच्छता बाळगा, असे आवाहन विविध सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून करत असतात. भारतीय संस्कृतीची जोपसना ही हरिपाठ वाचन, आतिथ्यशीलता, पडेल ते काम करण्याची ऊर्मी या माध्यमातून आश्रमात जोपासली जाते.
येथील विद्यार्थी हे आपल्या आश्रमाच्या छोटेखानी परसबागेत रमत भाजीपाल्याची लागवड करण्यात कायमच व्यग्र असल्याचे दिसून येते. ‘आधारतीर्थ’ आश्रमाच्या कार्याची माहिती सह्याद्री वाहिनीवर ‘तपस्या’ या मालिकेच्या माध्यमातून मांडण्यात आली आहेच. तसेच, भाजपचे माजी मंत्री व आमदार आशिष शेलार, प्रवीण दरेकर, यांनी आर्थिक मदत केली. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानभवनात आश्रमातील मुलांना बोलावून त्यांचा वाढदिवस साजरा केला व वस्त्रे भेट दिली. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आश्रमास फरशी बसवून दिली आहे. शेतकर्यांच्या आत्महत्या बंद होऊन असे आश्रम बंद होणे आवश्यक असल्याचे मत गायकवाड नमूद करतात.
कितीही मिष्टान्न भोजन मुलांना दिले तरी, आई-वडिलांची माया मुलांना देता येत नाही, याचीच खंत गायकवाड व्यक्त करतात. तसेच, भोजनव्यवस्थेची कोणतीही ठोस उपाययोजना नसल्याने आत्महत्याग्रस्त शेतकर्यांच्या १,८९१ मुलांना ‘आधारतीर्थ’मध्ये प्रवेश देता येत नसल्याची खंत गायकवाड व्यक्त करतात. पर्यायाने या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसानदेखील होत आहे. ‘आधारतीर्थ’ हे तीर्थक्षेत्री खरा आधार, निराधारांना देत आहे. आश्रमात अनेक मान्यवर येऊन गेले. कौतुक केले, छायाचित्रे काढली, आश्वासनांची खैरात केली.
मात्र, प्रत्यक्ष मदत शून्य. तसेच, जंतरमंतर येथील शेतकरी आंदोलनातदेखील या विद्यार्थ्यांचा सहभाग नोंदविला गेला. ‘जाणत्या राजा’च्या वाढदिवसाला या मुलांची शोभादेखील करण्यात आली. अनेक मंत्री, मुख्यमंत्री, पक्षांचे सर्वेसर्वा यांना या मुलांचा त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी कनवळा आला. यापुढेही येईल. मात्र, येथील मुलांचे दैनदिन आयुष्य सुकर व सुखमय व्हावे यासाठी केवळ संस्थापकच व इतर सदस्य झटताना दिसत आहेत. या आश्रमाच्या माध्यमातून १५ मुलींचे यथायोग्य विवाह पार पडले असून ६५ मुले व १९ मुलींना ‘एचएएल’, ‘महिंद्रा’, ‘टेल्को’ अशा नामांकित कंपन्यात कायमस्वरूपी नोकरी प्राप्त झाली आहे.
२००७ ते २०२० पर्यंत ६६९ मुले त्यात ३३७ मुली यांना शिक्षण देण्यात आले असून त्या आज स्वतःच्या पायावर उभ्या आहेत. या आश्रमाची धुरा त्र्यंबक गायकवाड यांच्यासह धनंजय बोडारे, रेवजी पाटील वाळूंज, पुष्पा मराठे, लता अवतार, अशोक पाटील, जयश्री खडांगळे, वंदना मतसागर आदी कार्यकर्त्यांच्या शिरावर आहे. आत्महत्या हा एक उत्तम पर्याय नसून तो मार्ग आपल्या पश्चात आपल्या कुटुंबाला कायमस्वरूपी दुखात लोटणारा आहे. हीच भावना या आश्रमातील मुलांची आहे. संकटांचा सामना करण्याचे बाळकडूच हा आश्रम आपल्या छायेत येथील विद्यार्थ्यांना देत आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.