
४ टन कपड्यांचे झाले संकलन
डोंबिवली: कचरा प्रश्नावर नाचक्की झालेल्या कल्याण -डोंबिवली शहरात गेल्या सहा महिन्यांपासून 'शून्य कचरा मोहिम' राबविली जात आहे. या मोहिमेला नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. महापालिकेतर्फे सुका कचरा देखील वेगळा करून त्यांचा पुनर्वापर कसा करता येईल हे पाहिले जात आहे. महापालिकेने रविवारी कपडे संकलन मोहिम राबविली होती व या मोहिमेत तब्बल ४ टन कपडे संकलित करण्यात आले.
कल्याण-डोंबिवली महापालिका, सिध्दी वेस्ट टू ग्रीन या संस्थेच्या माध्यमातून आणि रोटरी क्लब ऑफ डोंबिवली सौदामिनी यांच्या सहकार्याने शहरातील आठ ठिकाणी कपडे संकलन मोहिम राबविण्यात आली होती. त्यामध्ये डोंबिवली पश्चिमेतील भागशाळा मैदान, महापालिकेचे कल्याण डोंबिवली विभागीय कार्यालय, एमआयडीसीतील गणेश मंदिर, म्हसोबा चौक अशा विविध ठिकाणी कपडे संकलित करण्यात आले.
त्याचप्रमाणे महापालिका परिसर अधिकाधिक सुंदर आणि स्वच्छ राहावा याकरिता महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली २५ मे पासून महापालिका क्षेत्रात राबवण्यात आलेल्या 'शून्य कचरा मोहिमेंतर्गत नागरिकांनी ओला व सूका कचरा वेगवेगळा करून देण्यावर भर देण्यात आला. ओल्या कचऱ्यावर बायोगॅस व कंपोस्ट प्रक्रिया करण्यात येत आहे. परंतु सुका कचरा एकत्रित स्वरूपात संकलित होत असल्यामुळे त्यातील प्रत्येक घटक उपयुक्त ठरत नाही. याकरिता महापालिकेने विविध एन.जी.ओ. च्या माध्यमातून प्रत्येक महिन्याच्या पहिल्या रविवारी ई-वेस्ट, दुस:या रविवारी कापड, गादया,जुने कापड, तिस:या रविवारी कागद व काच आणि चौथा रविवारी चप्पल, बूट फर्निचर तसेच प्रत्येक रविवारी प्लास्टिक आदी सामान महापालिकेच्या संकलन केंद्रामध्ये आणून देण्याबाबत यापूर्वी आवाहन केले होते.