‘कोरोना’ रूग्णांसाठीचे शेकडो बेड विद्यालयाच्या मैदानात धूळखात

    13-Dec-2020
Total Views | 206

thane_1  H x W:



ठाणे :
कोरोना हॉस्पिटल व ‘क्वारंटाईन सेंटर’साठी खरेदी करण्यात आलेले शेकडो नवे कोरे बेड शिवसमर्थ विद्यालयाच्या मैदानात पडून असल्याचे आज उघडकीस आले. तर वीर सावरकरनगरमधील शाळेतही रुग्णांसाठी खरेदी केलेल्या विविध वस्तू वापराविना आढळल्या आहेत. भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक नारायण पवार यांनी हा प्रकार उघड करून कोरोना आपत्तीत केलेली विविध साहित्याची जम्बो खरेदी कोणाचे पोट भरण्यासाठी केली होती, असा सवाल केला आहे. त्याचबरोबर या प्रकरणी तत्काळ कारवाई करण्याची मागणी केली आहे.


ठाणे महापालिकेने कोरोना सेंटरसाठी विविध साहित्य खरेदी केले. महासभेपुढे सादर करण्यात आलेल्या गोषवार्‍यानुसार महापालिकेने आतापर्यंत २७ हजार उशी कव्हर्स, २१ हजार बेडशीट्स, २१ हजार टॉवेल्स, १८हजार नॅपकीन्स, १४ हजार बादल्या, ३ हजार कचर्‍याची सुपडी आदी साहित्यांबरोबर बेड व मॅट्रेस खरेदी केल्या आहेत. मात्र, या साहित्याचा उपयोग न करता ते पडून असल्याच्या तक्रारी होत्या. त्यावर आज प्रकाश पडला. गडकरी रंगायतनसमोरील शिवसमर्थ विद्यालयात ‘क्वारंटाईन सेंटर’ उभारण्यात येणार होते. मात्र, तेथे ‘क्वारंटाईन सेंटर’ उभारले गेले नाही. परंतु, त्याठिकाणी पाठविण्यात आलेले नवे कोरे बेड मैदानात पडून आहेत. ऊन-पावसामुळे काही बेडला गंजही लागला आहे.


thane_1  H x W:


अवघ्या दोन मीटर सफेद कपड्याची झाली बेडशीट!

महापालिकेच्या वीर सावरकर नगर येथील शाळा क्र. १२०मधील एका खोलीत कोरोना रुग्णांसाठी ठेवलेल्या बेडवर टॉवेल व बेडशीट आढळली. भाजपचे नगरसेवक नारायण पवार यांच्यासह कार्यकर्त्यांनी बेडशीट पाहिल्यावर तो अवघ्या दोन मीटरचा सफेद कपडा असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे महापालिकेने आपत्तीच्या काळात खरेदी केलेल्या साहित्याच्या गुणवत्तेचाही प्रश्न निर्माण झाला, याकडे नारायण पवार यांनी लक्ष वेधले आहे.



कोरोनाची आपत्ती लक्षात घेऊन महापालिकेच्या काही अधिकार्‍यांनी अनिर्बंध खरेदी केली. आवश्यकतेनुसार वस्तू खरेदी करण्याची गरज होती. मात्र, केवळ लूट करण्यासाठी साहित्याचे आकडे फुगविण्यात आले, असा आरोप नगरसेवक नारायण पवार यांनी केला. संबंधित कंत्राटदारांना बेडच्या आवश्यकतेनुसार कार्यादेश देण्याची गरज होती. विविध साहित्य साठविण्यासाठी महापालिकेकडे गोदामही नव्हते. मात्र, एकाच वेळी साहित्य खरेदीचा अट्टाहास का करण्यात आला, असा सवाल नारायण पवार यांनी केला. या प्रकरणी तत्काळ कारवाई करण्याची मागणी पवार यांनी आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांच्याकडे केली आहे.
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121